सामना अग्रलेख – मोदी आणि नंतर…

मोदी हे येत्या सप्टेंबर महिन्यात 75 वर्षे पूर्ण करतील व स्वतःच्याच नियमाप्रमाणे निवृत्ती घेतील. आपल्या निवृत्तीनंतर पुन्हा संघ स्वयंसेवकाचे काम करायचे की एखाद्या संघ प्रकल्पाची जबाबदारी घेऊन कार्य करायचे यावर सल्लामसलत करण्यासाठीही मोदी संघ मुख्यालयात गेले असावेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशभक्तांची संघटना आहे. हिंदू धर्माविषयी त्यांच्या मनातल्या भावना तीव्र आहेत. गेल्या दहा वर्षांत संघाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न झाला. आध्यात्मिक, नैतिक आणि सामाजिक जाणिवेतून निर्माण झालेल्या या संघटनेला मानसिक गुलामीच्या बेड्यांत जखडण्याचा प्रयत्न दहा वर्षांत झाला. त्या बेड्या तुटणार असतील तर स्वागत आहे!

मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यातून झाली. ते संघाचे प्रचारक म्हणून काम करत होते. हेच संघाचे प्रचारक पुढे 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान झाले. त्यानंतरच्या दहा वर्षांच्या काळात मोदी कधीच नागपुरातील संघ मुख्यालयाच्या आसपास फिरकले नव्हते, पण कालच्या गुढीपाडव्याच्या दिवशी मोदी हे नागपुरातील संघ मुख्यालयात पोहोचले. त्यांनी काही कार्यक्रमांना हजेरी लावली. मुख्य म्हणजे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सोबत बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी स्वतःला संघाचे स्वयंसेवक म्हणून घोषित केले आहे व बऱयाच कालखंडानंतर त्यांनी संघाबाबत गौरवोद्गार काढले. मोदी नागपुरात गेले व संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. मोदी नंतर म्हणाले, ‘‘देश इतकी वर्षे मानसिक गुलामगिरीत होता. त्यातून आता बाहेर पडत आहे. आम्हाला देशासाठी जगायचे आहे ही भावना युवा पिढीमध्ये आहे. डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजींच्या प्रेरणेनेच विकसित भारताचा संकल्प पूर्ण होईल.’’ मोदी यांनी हे सांगितले व त्यात चुकीचे काहीच नाही, पण संघाने मानसिक गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या असे मोदी म्हणतात त्याचा नेमका अर्थ काय? संघ सामाजिक व सांस्कृतिक कार्यात पुढे आहे व गेल्या दहा वर्षांत संघाने राजकीय कामातही बाळसे धरले. मोदी आज सत्तेवर आहेत त्यात संघ स्वयंसेवकांचा त्याग आणि कष्ट सर्वात जास्त आहेत. गेल्या दहा वर्षांत मोदी यांनी देशात ‘मोदी की जय’ म्हणणाऱया अंधभक्तांचे तांडे उभे केले. ही मानसिक गुलामगिरी आहे. संघाला याच मानसिक गुलामगिरीच्या बेडय़ा तोडायच्या आहेत व बहुधा त्यासाठीच संघ मुख्यालयात सरसंघचालक व मोदी

भेटीचे प्रयोजन

असावे, असे दिसते. संघ ही भाजपची मातृसंस्था आहे. 1978 मध्ये जनता पक्षाचे सरकार पडले ते याच मातृसंस्थेच्या वादातून. मोरारजी मंत्रिमंडळात असूनही वाजपेयी-आडवाणी वगैरे नेते आपल्या मातृसंस्थेशी, म्हणजे रा. स्व. संघाशी संवाद व संबंध तोडायला तयार नव्हते. या सगळ्यांनी सत्ता सोडली, पण मातृसंस्थेच्या प्रतिष्ठेवर आच येऊ दिली नाही. आता मात्र संघाला ‘फाट्या’वर मारण्याचे काम होत आहे. जे.पी. नड्डांसारखे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ‘‘आम्हाला संघाची गरज नाही. त्यांच्याशिवाय चारशे पार करू’’ असे बोलू लागले व संघाने लोकसभा निवडणुकीत मोदींचा उधळलेला वारू 240 वर रोखला. नड्डा हे अध्यक्ष आहेत व त्यांच्या अध्यक्षपदाची मुदत कधीच संपली आहे. तरीही भाजप अद्यापि आपला नवा अध्यक्ष निवडू शकलेला नाही. सर्वशक्तिमान मोदी, अमित शहांसारख्या भाजपातील बाहुबलींना नवा अध्यक्ष नेमण्यापासून संघाने रोखले हे उघड आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी संघाला थेट त्यांचा माणूस हवा आहे. आता हा त्यांचा माणूस कोण व तो माणूस मोदी-शहांना चालतोय का? या चक्रात भाजप अडकला आहे. नितीन गडकरी हे 2010-2013 पर्यंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. अध्यक्षपदाची दुसरी ‘टर्म’ मिळू नये म्हणून गडकरी यांच्या विरोधात पडद्यामागे कारस्थाने झाली. गडकरींना रोखण्यासाठी त्यांच्या ‘पूर्ती’ उद्योगसमूहावर धाडी घातल्या गेल्या व त्यांना बदनाम केले गेले. अरुण जेटली यांच्या माध्यमातून हे घडवले गेले व त्या कारस्थानाचा केंद्रबिंदू गुजरातमध्येच होता. गडकरी हे पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष झाले असते तर नरेंद्र मोदींचा राष्ट्रीय राजकारणात उदय झालाच नसता व देशात आज जे राजकारण दिसत आहे ते दिसले नसते. गडकरी हे थेट राष्ट्रीय स्वयंसेवक

संघाने नियुक्त केलेले

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, पण त्यांचाच काटा काढण्यात आला. हा काटा संघाच्या काळजात आजही टोचत आहे. त्यामुळे भाजपचा अध्यक्ष या वेळी शंभर टक्के नागपुरातूनच ठरणार आहे. संघाने त्यांचा अध्यक्ष नेमला तर काटा मोदी-शहांच्या काळजात घुसेल. त्यामुळे मोदी संघ मुख्यालयात आले काय? वयाच्या 75 वर्षांपर्यंतच राजकीय सत्तेच्या पदावर राहावे हा एक नियम स्वतः मोदी यांनीच करून ठेवला आहे. त्यामुळे लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक बुजुर्गांना मोदी यांनी नियमावर बोट ठेवून मोडीत काढले. ‘नियम म्हणजे नियम, त्यातून कोणीही सुटणार नाही’ असा मोदींचा खाक्या आहे. मोदी हे येत्या सप्टेंबर महिन्यात 75 वर्षे पूर्ण करतील व स्वतःच्याच नियमाप्रमाणे निवृत्ती घेतील. आपल्या निवृत्तीनंतर पुन्हा संघ स्वयंसेवकाचे काम करायचे की एखाद्या संघ प्रकल्पाची जबाबदारी घेऊन कार्य करायचे यावर सल्लामसलत करण्यासाठीही मोदी संघ मुख्यालयात गेले असावेत. पंतप्रधान मोदींच्या निरोपाची घडी आली आहे. मोदी हे ईश्वराचे अवतार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर निवृत्तीचे बंधन नाही असे त्यांचे अंधभक्त बोलतीलही, परंतु त्यांनी हिंदू धर्माचा नीट अभ्यास केला पाहिजे. ‘राम ते राष्ट्र’ हा मंत्र मोदींनी नागपुरात दिला. ते ‘राम-कृष्णही आले गेले, तयाविना जग का अडले?’ हाच हिंदू धर्म आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशभक्तांची संघटना आहे. हिंदू धर्माविषयी त्यांच्या मनातल्या भावना तीव्र आहेत. गेल्या दहा वर्षांत संघाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न झाला. आध्यात्मिक, नैतिक आणि सामाजिक जाणिवेतून निर्माण झालेल्या या संघटनेला मानसिक गुलामीच्या बेडय़ांत जखडण्याचा प्रयत्न दहा वर्षांत झाला. त्या बेड्या तुटणार असतील तर स्वागत आहे!