सामना अग्रलेख – ‘चिरडा व पळा’ योजना, वडिलांचे नाव चंद्रशेखर बावनकुळे

संकेत बावनकुळे (वडिलांचे नाव चंद्रशेखर बावनकुळे) हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याचा तपास संशयास्पद आहे. संपूर्ण सीताबर्डी पोलीस ठाणेच बडतर्फ करावे असे हे प्रकरण आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत तोपर्यंत राज्यात सुख-शांती येणार नाही. लोक रस्त्यावर चिरडून मारले जातील व फडणवीस गुन्हेगारांना वाचवत राहतील. संकेत बावनकुळे (वडिलांचे नाव चंद्रशेखर बावनकुळे) हे सरकारचे लाडके सुपुत्र असून त्यांच्या नावानेही ‘मिंधे-फडणवीस’ सरकारने ‘लाडक्या पोरां’च्या नावाने ‘चिरडा व पळा’ योजना सुरू करून हिट अ‍ॅण्ड रनमधील सर्व गुन्हेगारांना माफी द्यायला हवी. कशी आहे ही योजना?

 

एकेकाळी आपले महाराष्ट्र राज्य हे उत्तम प्रशासन व कायदा- सुव्यवस्थेसाठी ओळखले जात असे. आता तसे चित्र दिसत नाही. भ्रष्टाचारास खुली सूट दिल्यामुळे राज्याची अशी अवस्था झाली आहे. नागपूरच्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणातील मुख्य आरोपींना ज्या प्रकारे वाचवले जात आहे ते पाहता राज्यात कायद्याचे राज्य राहिलेले नाही हे स्पष्ट दिसते. नागपूरचे प्रकरण साधे नाही. बडे बाप के बेटे दारूच्या नशेत महागड्या गाड्या भरमसाट वेगाने चालवतात व रस्त्यावरील वाहने, माणसे यांना किड्या-मुंग्यांसारखे चिरडून फरार होतात. पुढे मग सागर बंगल्यावरील त्यांचे बॉस अशा गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न करतात. रस्त्यावर माणसे तडफडून मरतात. त्यांना मरू द्या. हा सध्याचा कायदा-सुव्यवस्थेचा ताळेबंद आहे. संकेत बावनकुळे (वडिलांचे नाव चंद्रशेखर बावनकुळे) व त्यांच्या मित्रांनी नागपूरच्या ‘लाहोरी’ बारमध्ये दारू पार्टी केली व झोकांड्या देत ते गाडीत बसले. धरमपेठ भागात गेल्यावर गाडीवरील नियंत्रण सुटले व वाहनांना जोरदार धडका देत हे तीन नशेबाज पुढे गेले. या अपघातात 17-18 जण गंभीर जखमी झाले. म्हणजे मानवी हत्या घडविण्याचाच हा गुन्हा मानायला हवा व गाडीतील त्या तिन्ही नशेबाजांना अटक करून पोलिसांनी कोठडीत डांबायला हवे होते, पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अपार कृपादृष्टीमुळे गुन्हा नोंदविण्यापासून साक्षी, जबान्या, तपासात, सर्वच पातळय़ांवर संकेत बावनकुळे (वडिलांचे नाव चंद्रशेखर बावनकुळे) यास वाचविण्याचा प्रयत्न झाला. ‘एफआयआर’ अशा पद्धतीने बनवला गेला की, नशेबाज आरोपी सुटायलाच हवेत. गाडीचे मालक स्वतः युवराज संकेत बावनकुळे (वडिलांचे नाव चंद्रशेखर बावनकुळे), पण

एफआयआरमध्ये

तसा संदर्भच टाळला. गाडी कोण चालवत होते व अपघातानंतर गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर पुणास बसवले? हे सर्व उघड असताना त्या काळातले सीसी टीव्ही फुटेज गायब केले. संकेत बावनकुळे (वडिलांचे नाव चंद्रशेखर बावनकुळे) हे स्वतः नशेत धूत असताना त्यांचा वैद्यकीय रिपोर्ट दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. संकेत बावनकुळेच्या जागी दुसरा कोणी सामान्य इसम असता तर एव्हाना पोलीस, भाजपच्या फौजा एकत्र येऊन माकडाचा बैल करून मोकळे झाले असते, पण आता फडणवीसांच्या गृहखात्यासह संपूर्ण भाजप मौनात गेली आहे. महाराष्ट्रात गेल्या तीनेक वर्षांत भ्रष्टाचारास मोकळे रान मिळाल्याने न्याय आणि कायदा विकत घेण्याची प्रवृत्ती वाढली आहे. महाराष्ट्राच्या ‘मिंधे’ सरकारात कायद्याची प्रतिष्ठा उरलेली नाही. गुन्हा करा व पैसे देऊन सुटा, नाही तर गुन्हा करून वर्षा किंवा सागर बंगल्यावर जाऊन स्वतःची सुटका करून घ्या. हे सर्रास चालले आहे. हे दोन्ही सरकारी बंगले म्हणजे अपराधी व भ्रष्टाचाऱ्यांचे अड्डेच बनले आहेत. ‘लाडके गुन्हेगार’ योजना सुरू करून सरकारने महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची वाट लावली आहे. पुण्यातील पोर्शे हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात गाडीचालक बदलला गेला. नशेबाजाचे रक्त बदलले गेले व शेवटी दोन निरपराध्यांचा बळी घेणाऱ्या अग्रवाल पुत्राला रस्ते सुरक्षेवर एक निबंध लिहिण्याची शिक्षा ठोठावून न्याय देवतेने कायद्याची व्याख्याच बदलली. त्यामुळे नागपूर प्रकरणातील संकेत बावनकुळे (वडिलांचे नाव चंद्रशेखर बावनकुळे) हे आतापासून निबंध लेखनाच्या सरावास लागले आहेत. नागपूरचे पोलीस आयुक्त या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडून

न्यायाची अपेक्षा

करता येत नाही. कारण त्या वैचारिकदृष्टय़ा आरोपींच्या ‘ताई-माई’च्या नात्याने बांधल्या आहेत. त्यामुळे तीन दारूडे नागपूरच्या रस्त्यावर बेफाम गाडी चालवून मोठे अपघात करतात व सहज सुटतात याकडे जनतेने जणू काही घडलेच नाही अशा भावनेने पाहायला हवे, अशीच राज्यातील सत्ताधाऱ्यांची अपेक्षा असावी. संकेत बावनकुळे (वडिलांचे नाव चंद्रशेखर बावनकुळे) हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याचा तपास संशयास्पद आहे. त्यांच्याकडून लपवाछपवीचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. संपूर्ण सीताबर्डी पोलीस ठाणेच बडतर्फ करावे असे हे प्रकरण आहे. ऑडी गाडी दीड कोटीची आहे असे म्हणतात. अपघातानंतर त्या गाडीत दारूच्या बाटल्या सापडल्या व खाण्या-पिण्याचे एक बिल सापडले. त्यात ‘बीफ’ कटलेटचा उल्लेख आहे. आता पोलीस आणि संबंधित हॉटेलवाल्यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये अशा काही पदार्थांची विक्री होत नाही, असे म्हटले आहे. तथापि सापडलेल्या बिलात ‘बीफ’ कटलेटचा उल्लेख आहे म्हणजे संघ कथावाचक फडणवीस गृहमंत्री असताना नागपुरात बीफ म्हणजे गोमांसाचे पदार्थ मिळत आहेत आणि त्याचा आस्वाद घेणारेही तेथे आहेत. मात्र बीफ प्रकरणात झुंडगिरीचे बळी जातात ते निरपराध लोक. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत तोपर्यंत राज्यात सुख-शांती येणार नाही. लोक रस्त्यावर चिरडून मारले जातील व फडणवीस गुन्हेगारांना वाचवत राहतील. संकेत बावनकुळे (वडिलांचे नाव चंद्रशेखर बावनकुळे) हे सरकारचे लाडके सुपुत्र असून त्यांच्या नावानेही ‘मिंधे-फडणवीस’ सरकारने ‘लाडक्या पोरां’च्या नावाने ‘चिरडा व पळा’ योजना सुरू करून हिट अॅण्ड रनमधील सर्व गुन्हेगारांना माफी द्यायला हवी. कशी आहे ही योजना?