सामना अग्रलेख – बदला घेणार; पण कसा?

आपली लढाई पाकिस्तानशी आणि दहशतवादी टोळ्यांशी आहे. या लढाईत कोणी भारतीय मुसलमान आणि कश्मिरी जनतेला बदनाम करणार असतील तर देशातील समस्या त्यांना सोडवायच्या नाहीत व पुलवामाप्रमाणे पहलगामचेही राजकारण करायचे आहे, असेच मानावे लागेल. सरकारने आता फक्त राष्ट्रीय हिताचा विचार करावा. हिंदू-मुसलमान आपसांत काय ते बघून घेतील.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या धक्क्यातून देश अद्यापि सावरलेला नाही. कश्मीरमधून दहशतवाद आम्ही संपवला, असा प्रचार झाल्यामुळे देशभरातून पंचवीस लाख पर्यटक कश्मीरला पोहोचले व हे असे अघटित घडले. कश्मीरात सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा आणि अश्रूंचा बदला घ्या, पाकिस्तानला अद्दल घडवा, असा जन आक्रोश आहे. पहलगामच्या घटनेचे राजकारण करू नये, अशी समज पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून दिली जात आहे. पहलगाम हल्ल्याने सरकारी दाव्याचा फुगा फुटल्याने या विषयाचे राजकारण करू नका असे ते बोलू लागले आहेत. एखाद्या दुःखद घटनेचे राजकारण करू नये हे पथ्य या मंडळींनी मागच्या दहा वर्षांत पाळले असते तर आज अशी विनवण्या करण्याची वेळ आली नसती. पहलगाम हल्ला अमानुष, निर्घृण आहे व त्याचा बदला घ्यावाच लागेल, पण बदला घेणे म्हणजे काय? निवडणुकीत भाजपला मतदान करा, मोदी यांनाच पंतप्रधान करा व तसे केल्यानेच ‘बदला’ पूर्ण होईल, पाकडे बिळात लपतील, असे ज्यांना वाटते त्या सगळ्यांपासून देशाला खरा धोका आहे. बदला पाकिस्तानचा व दहशतवाद्यांचा घ्यायचा आहे. देशातील मुसलमानांना आव्हान देऊन, त्यांच्या मशिदी-मदरशांवर हल्ले करून पहलगामचा बदला पुरा होईल काय? काही लोकांना तसे करण्याची खुमखुमी जडली आहे. लढाई पाकिस्तानविरोधात आहे, भारतीय नागरिक असलेल्या राष्ट्रप्रेमी मुसलमानांविरोधात नाही. उरी आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ‘बदला घेऊ, अद्दल घडवू’ अशी भाषणे झाली. संसदेत व जाहीर सभांतून मांड्या ठोकल्या. उरीचा बदला म्हणून पाकव्याप्त कश्मीरवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यात आला. तेव्हा असे सांगितले की, पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले असून पाकड्यांना जन्माची अद्दल घडली, पण तसे झाले नाही. इंदिरा गांधी यांनी

पाकिस्तानला जन्माची अद्दल

घडवली व 1971 साली थेट युद्ध करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले. तरीही पाकड्यांचे शेपूट वाकडेच राहिले. आता मोदी सरकार नक्की काय करणार आहे? सरकारने कृती करावी, प्रचार करू नये. हे एवढे पथ्य पाळले तरी खूप होईल. पंतप्रधान मोदी यांनी कॅबिनेट बैठक बोलावून काही तातडीचे निर्णय घेतले. भारतातील पाकिस्तानी वकालत त्यांनी बंद केली. भारतातील सर्व पाकिस्तानी नागरिकांना चोवीस तासांत देश सोडण्याचे फर्मान जारी केले. अगदी वाघा बॉर्डर सध्या बंद केली. म्हणजे पाकिस्तानशी राजनैतिक संबंध तोडण्याची ही सुरुवात आहे. मग क्रिकेटचे काय करणार? दुबईत भारत-पाक क्रिकेटचे सामने खेळवले जातात व भारतातील अनेकजण त्या सामन्यासाठी साग्रसंगीत हजर असतात. जय शहा हे जागतिक क्रिकेटचे प्रमुख आहेत. पाकिस्तानशी यापुढे क्रिकेट खेळणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. इकडे भारतात पाक मुर्दाबादचे नारे द्यायचे व भारताबाहेर पाकड्यांबरोबर क्रिकेट खेळायचे हे धंदे बंद केले पाहिजेत. मोदी हे पहलगाम हल्ल्याने हादरले आहेत व सौदी अरेबियाचा दौरा टाकून ते परत आले. राहुल गांधी अमेरिका दौरा टाकून परत येत आहेत. सरकारने ‘पहलगाम’ हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बैठक बोलावली हे नेहमीचेच आहे. जे सरकार एरव्ही विरोधकांचे आवाज दडपत असते, कश्मीरपासून मणिपूरपर्यंत कोणत्याच विषयांवर संसदेत चर्चा करायला तयार नाही ते सरकार सर्वपक्षीय बैठक बोलावून काय दिवे लावणार? देशाचे गृहमंत्री राष्ट्रीय सुरक्षेबाबत गंभीर नाहीत. जनतेच्या जीविताचे रक्षण करण्याबाबत ते अपयशी ठरले. त्यांना हटवा ही सर्वपक्षीय मागणी आहे. त्या मागणीचा विचार सरकार करणार नसेल तर बैठकांचे फार्स हवेतच कशाला? 370 कलम हटवले हे बरेच झाले, पण जम्मू-कश्मीरचा

संपूर्ण राज्याचा दर्जा काढून

काय मिळवले याचे उत्तर सरकार देणार नाही. सरकारने प्रचंड सैन्यकपात केली, संरक्षण खात्याच्या आर्थिक तरतुदीत घट केली. हा खेळ खतरनाक आहे. पुलवामा येथे सैन्य तुकड्यांना विमान उपलब्ध करून दिले नाही व पहलगाम येथे हजारो पर्यटकांच्या सुरक्षेला वाऱ्यावर सोडले. आता हल्ला झाला व निरपराध माणसे मारल्यावर लोकांत संताप उसळल्यावर सरकार धावपळ करीत आहे. पहलगामचा हल्ला अमानुष आहे, पण या प्रकरणात हिंदू-मुसलमान संघर्षाची काडी लावणे हे त्यापेक्षा अमानुष आहे. पहलगाम येथील गावकऱ्यांनी जखमी व त्यांच्या कुटुंबियांना तत्काळ मदत सुरू केली. सईद हुसैन शाह या स्थानिक तरुणाने दहशतवाद्यांशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याने अतिरेक्याच्या हातातून बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा दहशतवाद्यांनी त्याला गोळय़ा घालून ठार केले. ‘हे लोक आपले पाहुणे आहेत, त्यांना मारू नका,’ अशी विनवणी सईद करीत होता. अखेर त्यालाही प्राण गमवावे लागले. सईद हिंदू नव्हता तरीही त्याला अतिरेक्यांनी मारले. पहलगाम व आजूबाजूस अडकलेल्या पर्यटकांना स्थानिकांनी मदत केली, असे सर्व पर्यटक सांगत असताना भाजपचा ‘आयटी’ सेल या घटनेतही हिंदू-मुसलमानांचा चुना लावतो हे धक्कादायक आहे. पहलगाममधील हल्ला हा फक्त पर्यटकांवर झालेला नसून आमच्यावर झाला. आम्ही त्यात घायाळ झाल्याची मानवी भावना कश्मिरी जनतेने व्यक्त केली, याची दखल घ्यावी लागेल. आपली लढाई पाकिस्तानशी आणि दहशतवादी टोळय़ांशी आहे. या लढाईत कोणी भारतीय मुसलमान आणि कश्मिरी जनतेला बदनाम करणार असतील तर देशातील समस्या त्यांना सोडवायच्या नाहीत व पुलवामाप्रमाणे पहलगामचेही राजकारण करायचे आहे, असेच मानावे लागेल. सरकारने आता फक्त राष्ट्रीय हिताचा विचार करावा. हिंदू-मुसलमान आपसांत काय ते बघून घेतील.