सामना अग्रलेख – शिवसेनाप्रमुख नसते तर…

भाजपास डोक्यावर नेण्याचे औदार्य ज्या बाळासाहेबांनी दाखवले त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेवर घाव घालणाऱ्यांच्या पायाशी शिवसेनेतलेच बेइमान बसलेले दिसतात तेव्हा शिवरायांशी बेइमानी करणाऱ्या इतिहासातील अवलादीची आठवण येते. महाराष्ट्राची धुळीस मिळालेली प्रतिष्ठा, मराठी माणसाचा गहाण पडलेला स्वाभिमान, कष्टकऱ्यांची उडालेली धूळधाण सावरून पुन्हा नवा महाराष्ट्र उभा करणे हीच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खरी आदरांजली ठरेल. नाहीतरउडाले शब्दांचे बुडबुडेअसेच घडेल. चला मग, उचला तो बेलभंडारा आणि लागा स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्याच्या कामाला!

महाराष्ट्राने निरंतर अभिमान बाळगावा असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व होते. ते फक्त नावाचे नव्हे तर कृतीने हिंदुहृदयसम्राट होते. त्यामुळे त्यांच्या कीर्तीचे चौघडे भारतात आणि भारताबाहेर वाजत होते. भारताच्या इतिहासात महात्मा गांधी, नेहरू, वीर सावरकर, लोहिया, टिळक, श्रीपाद अमृत डांगे आणि जगाच्या इतिहासात सिसरो, बर्क, शेरिडन असे वक्तृत्व कलेचे नामांकित कंठमणी होऊन गेले. त्याच मालिकेतले ‘ठाकरे’ हे एक तेजस्वी मणी होत. सामान्य, पण महाराष्ट्रभक्त कुटुंबात ते जन्मले आणि आयुष्यभर सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी ते झगडत राहिले. बाळ गंगाधर टिळक व बाळ केशव ठाकरे यांना देशात मिळालेली लोकमान्यता थक्क करणारी आहे. सुरुवातीला मराठीची आघाडी बाळासाहेबांनी झुंजविली. त्यासाठी कुंचला, वाणी व लेखणीचा वापर त्यांनी हत्यार म्हणून केला. बाळासाहेबांची महाराष्ट्राला सर्वात मोठी देणगी म्हणजे त्यांनी छत्रपती शिवरायांनंतर मराठी माणसाला अन्यायाविरुद्ध लढायला प्रवृत्त केले. मराठी स्वाभिमानाची मशाल पेटवली. पाच वर्षांच्या संघर्षानंतर मुंबईसह महाराष्ट्र मिळाल्यावरही अन्यायाच्या लाथा खात मराठी माणूस थंड लोळागोळा होऊन पडला होता. त्याच्या मनात असंतोषाची ठिणगी टाकून भडका उडवण्याचे काम बाळासाहेबांनी केले. छत्रपती शिवरायांविषयी कवी कुलभूषण लिहितो,

काशी की कला जाती

मथुरा की मस्जिद होती

अगर शिवाजी होते

तो सुन्नत सबकी होती

बाळासाहेब ठाकरे नसते व त्यांनी शिवसेना जन्मास घातली नसती तर काय झाले असते?

महाराष्ट्राचे दिल्लीच्या वाटेवरील

पायपुसणे झाले असते,

मराठी माणूस लाचार आणि

हतबल झाला असता,

महाराष्ट्र हा शिवरायांचे

मऱ्हाठी राष्ट्र राहिले नसते

आणि महाराष्ट्राच्या शौर्याची

आणि मर्दानगीचीसुंताझाली असती

हे सर्व थांबवले ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या शिवसेनारूपी कवचकुंडलांनी, पण महाराष्ट्राची आजची अवस्था स्वाभिमानाची ‘सुंता’ झाल्यासारखीच दिसत आहे. महाराष्ट्राचे

करारीपण

संपले आहे. हिमालयाच्या मदतीस जाणाऱ्या सह्याद्रीचे शिखर आणि पाय दिल्लीश्वरांनी छाटले आहेत. अमित शहांसारखे लोक महाराष्ट्रात येतात. भाषणे करतात. आपल्या भाषणात ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नाइलाजाने घेतात, पण बाळासाहेबांनी महाराष्ट्र रक्षणासाठी निर्माण केलेली शिवसेनारूपी कवचकुंडले याच अमित शहांनी ‘मोडून’ ती मोड कुणा तोतया शिंदेच्या हाती सोपवली. पानिपतात मात खाल्लेल्या युद्धभूमीतून काही मतलब्यांनी एक तोतया सदाशिवरावभाऊ उभा केला होता व त्याने राज्यावर दावा सांगितला होता. ही तोतयेगिरी नंतर उघड झाली होती. अमित शहांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेस शह देण्यासाठी एकनाथ शिंदेसारखे ‘तोतये’ सदाशिवभाई निर्माण केले. शिवसेना फोडण्यासाठी बारभाई कारस्थाने करून महाराष्ट्र विकलांग, गलितगात्र केला, पण ही तात्पुरती स्थिती आहे. पानिपताच्या राखेतून महाराष्ट्र आणि मऱ्हाठा पुन्हा उठला व लढत राहिला. त्याचे शौर्य अटकेपार गेले हे तोतयांचे राज्य महाराष्ट्रात निर्माण करणाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. महाराष्ट्राला आज बाळासाहेब ठाकरे यांची पदोपदी आठवण येत आहे. महाराष्ट्र आज दरोडेखोरांच्या हातात आहे. 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून आणि शिवसेनाप्रमुखांच्या संघर्षातून निर्माण झालेले व टिकवलेले मराठी राज्य ते हेच काय? मराठी माणूस जाती-पोटजातीत फाटला आहे. इतका फाटला आहे की, त्यास ठिगळही लावता येत नाही. मराठी म्हणून ज्यांना एक केले ते मराठा-मराठेतर, ओबीसी, धनगर, माळी, वंजारी, दलित अशा तुकड्याताकड्यांत फुटून एकमेकांशी वैर घेऊन लढत आहेत. मराठी म्हणून भक्कम एकजूट उभारणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र भाजपच्या शहा-फडणवीसी राजकारण्यांनी गलितगात्र केला. महाराष्ट्रात शेतकरी मरत आहे. मराठी तरुण बेरोजगारीच्या खाईत होरपळत आहे. महिलांवर बलात्कार आणि खुनी हल्ले सुरूच आहेत. महाराष्ट्राचा उद्योग लुटून

बाजूच्या गुजरातेत

नेला जात आहे व स्वतःस राज्यकर्ते म्हणवून घेणारे ‘मराठे’ शिवरायांच्या महाराष्ट्राची लूट उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या धमन्यांत भरलेला स्वाभिमान आणि शौर्य दिल्लीतील गुजराती राज्यकर्त्यांनी जणू ‘पंक्चर’ केले. ‘जय श्रीराम’ बोला व स्वाभिमान विसरा. मराठीपण चुलीत घाला. धर्माची चिलीम फुंकून महाराष्ट्राची प्रतिष्ठा आणि मानसन्मान धुराच्या वलयात सोडून द्या, पण त्या ‘जय श्रीरामा’चा नारा आणि गर्वाने हिंदू म्हणून मिरवण्याचा वारसा त्याच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता. आज त्या वारशावर दिल्लीचे भाजपाई आयत्या बिळावर नागोबासारखे बसले आहेत. त्याग, स्वाभिमान आणि राजकीय चारित्र्य हे महाराष्ट्राचे गुण आता देशोधडीस लागले आहेत. ते पाहून स्व. बाळासाहेबांचा आत्मा आजच्या महाराष्ट्रावर पुष्पवृष्टी करील की महाराष्ट्राची मान दिल्लीपुढे झुकवणाऱ्यांना शाप देईल? बाळासाहेबांची तपस्या व कष्ट सध्याच्या राज्यकर्त्यांनी मातीमोल केले. सत्ता व पैसा यासाठी स्वाभिमान गहाण टाकलाच, पण महाराष्ट्राची प्रतिष्ठाही खुंटीला टांगून ठेवली. निवडणुका जिंकण्यासाठी कोणतेही विधिनिषेध बाळगले नाहीत. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात टाचेएवढाही नव्हता. त्या भाजपास डोक्यावर नेण्याचे औदार्य ज्या बाळासाहेबांनी दाखवले त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेवर घाव घालणाऱ्यांच्या पायाशी शिवसेनेतलेच बेइमान बसलेले दिसतात तेव्हा शिवरायांशी बेइमानी करणाऱ्या इतिहासातील अवलादीची आठवण येते. महाराष्ट्राची धुळीस मिळालेली प्रतिष्ठा, मराठी माणसाचा गहाण पडलेला स्वाभिमान, कष्टकऱ्यांची उडालेली धूळधाण सावरून पुन्हा नवा महाराष्ट्र उभा करणे हीच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खरी आदरांजली ठरेल. नाहीतर ‘उडाले शब्दांचे बुडबुडे’ असेच घडेल. चला मग, उचला तो बेलभंडारा आणि लागा स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्याच्या कामाला!