सामना अग्रलेख – मराठी माणूस तुडवला जातोय! मिंध्यांनो, पेढे वाटा!

आज मुंबई, ठाण्यात, पुण्यात, नाशिकात मराठी माणसांवर हल्ले सुरू आहेत. उद्या हे लोण नागपूर, अमरावती, जळगावपर्यंत पोहोचेल व महाराष्ट्र कमजोर करून मोदीशहाफडणवीसांचा दास बनून पायाशी पडेल. शिवसेना तोडून सत्तेसाठी सरकारसोबत गेलेले मिंधे पेढे वाटण्यासाठी त्याच क्षणाची वाट पाहत आहेत. कल्याणचा हा शुक्ला कोण? त्याचा बाप कोण? कोणाच्या जिवावर तो मराठी माणसांना धमक्या देत आहे? मुख्यमंत्री कार्यालयातील त्याचा दलाल कोण? श्रीमान फडणवीस, मिंधे याचा खुलासा करा. करावाच लागेल. सरकार तुमचे असेल, पण हे राज्य मऱ्हाटीआहे हे लक्षात ठेवा. शुक्ला मंत्रालयातला तुमचा नोकर असेल तर त्याच्यावर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून बडतर्फ करा, की त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागेल? मिंध्यांनो, पेढे वाटा, पेढे वाटा, महाराष्ट्र खरेच कमजोर झालाय!

महाराष्ट्रात भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना पाशवी बहुमत मिळाले. त्या पाशवी बहुमतातून आलेले सरकार हे नपुंसक आहे. बहुमत आहे, पण ते बहुमत खरे नाही. तसे नसते तर मुंबई, ठाणे, कल्याण, अंबरनाथ परिसरात मराठी माणसांवर निर्घृण हल्ले झाले नसते. मराठीद्वेष्टय़ांना वाटते, महाराष्ट्रात आता आपले सरकार आले आहे. त्यामुळे मराठी माणसाला लाथाडले, तुडवले तरी आपले कोण काय वाकडे करणार? या मस्तीत ते आहेत. कल्याणच्या उच्चभ्रू वस्तीत कोणी अखिलेश शुक्ला नामक उपऱ्याने गुंड टोळ्यांच्या मदतीने मराठी कुटुंबावर हल्ला केला. मराठी माणसे मच्छी-मटण खातात, ती घाणेरडी आहेत या सबबीखाली शुक्ला व त्याचे गुंड कल्याण परिसरात झुंडशाही करतात आणि फडणवीसांचे पोलीस त्या शुक्लासमोर नांगी टाकतात. हा जो कोणी शुक्ला आहे, तो महाराष्ट्राच्या मंत्रालयात काम करतो व मंत्रालयाचा अधिकार वापरून पोलिसांवर दबाव आणतो. त्यामुळे रक्तबंबाळ मराठी कुटुंबाची फिर्याद घ्यायला फडणवीसांचे पोलीस तयार नाहीत. ‘‘मला हात लावाल तर याद राखा, मुख्यमंत्री कार्यालयातून तुम्हाला फोन येईल,’’ अशी धमकी हा शुक्ला देतो. म्हणजे मराठी माणसांवरील हल्ल्यांना मुख्यमंत्री कार्यालयाचे समर्थन आहे असे समजायचे काय? मराठी माणूस माझ्यासमोर झाडू मारतात, अशी गुर्मीची मस्तवाल भाषा करण्यापर्यंत या लोकांची मजल गेली आहे. त्यास मोदी-शहा-फडणवीस यांचे महाराष्ट्र कमजोर करण्याचे धोरण कारणीभूत आहे. मराठी माणूस व महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठीच या त्रिकुटाने शिवसेना फोडली. मराठी माणसांच्या  न्याय्य हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली व मराठी माणसाला

स्वाभिमानाने जगता यावे

यासाठी शिवसेना लढे देत राहिली. त्या लढवय्या वृत्तीनेच मुंबई व मराठी माणूस टिकून राहिला, पण मोदी-शहांना मुंबई अदानीच्या घशात घालायची आहे व शिवसेना आहे तोपर्यंत हा डाव यशस्वी होणार नाही, म्हणून शिवसेना तोडण्याचे कारस्थान तडीस नेले. त्यामुळे मुंबईतील सर्व संपत्ती आता अदानी व इतर उपऱ्यांना सहज हडप करता येईल. फडणवीसांचे सरकार हा काही लोकमताचा कौल नाही. विधानसभेतील भाषणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी बहुमत दिल्याबद्दल राज्याच्या 14 कोटी जनतेचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी बहुमत मिळाल्याबद्दल ईव्हीएम, पैसा, ईडी, सीबीआयचे आभार मानायला हवे होते. मराठी माणसाने, शेतकरी, कष्टकऱ्याने मतदान करून हे सरकार निवडून दिले असते, तर ‘मारकडवाडी’प्रमाणे लोक रस्त्यावर येऊन पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घ्या, असे त्यांनी सांगितले नसते. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार हे मराठी मातीच्या व मराठी अस्मितेच्या गर्भातून आलेले नाही. हे जुमलेबाजी व जुगाडबाजीतून, अनैतिक मार्गाने सत्तेवर आलेले सरकार आहे. त्यामुळे विजयाचा जल्लोष नसून एक प्रकारे महाराष्ट्राला सुतक लागल्याचे वातावरण आहे. मराठी माणसांचे दिवसाढवळय़ा मुडदे पडत आहेत. मुंबई-ठाण्यासारख्या शहरांत गुजराती, मारवाडी लोक मराठी बोलणाऱ्यांना दमबाजी करीत आहेत. मराठी भाषिकांना मुंबईतच जागा नाकारल्या जात आहेत. हे चित्र मुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या दोन ‘उप’ना विचलित करीत नसेल तर त्यांच्या रक्तातले मराठीपण नष्ट झाले आहे. स्वतः फडणवीस हे महाराष्ट्र तोडण्याच्या म्हणजे स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने आहेत. आज महाराष्ट्राची सत्ता त्यांना मिळाली म्हणून ते गप्प आहेत. त्यांच्या राज्यात मराठी माणूस

अपमानीत व भयभीत

आहे आणि ‘आमचीच खरी शिवसेना’ असे बोलणारे भाजपचे गुलाम मनगटे चावीत बसले आहेत. मोदी-शहांना हेच हवे होते व तसे त्यांनी घडवून घेतले. मराठी माणूस व महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा कचरा डोळय़ांसमोर होत असताना ‘मिंधे’ वगैरे लोक हे संघ मुख्यालयात बौद्धिके पचविण्यासाठी जातात. त्या बौद्धिकात महाराष्ट्राची अस्मिता व मराठी स्वाभिमानास स्थान नाही. कल्याणमधील घटनेवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटलेले तीव्र पडसाद व संतापाचा उद्रेक पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषिक कुटुंबाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्ला या एमटीडीसीच्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची घोषणा केली. मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसांचाच होता, आहे आणि राहील, असे मुख्यमंत्र्यांनी आता सांगितले. ‘अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला असला तरी हे सरकार सत्तेवर आल्यापासूनच या माजोरड्या उपऱ्यांची मराठी भाषकांवर हल्ले करण्याची हिंमत कशी काय वाढीस लागली, हा प्रश्न उरतोच. आज मुंबई, ठाण्यात, पुण्यात, नाशिकात मराठी माणसांवर हल्ले सुरू आहेत. उद्या हे लोण नागपूर, अमरावती, जळगावपर्यंत पोहोचेल व महाराष्ट्र कमजोर करून मोदी-शहा-फडणवीसांचा दास बनून पायाशी पडेल. शिवसेना तोडून सत्तेसाठी सरकारसोबत गेलेले मिंधे पेढे वाटण्यासाठी त्याच क्षणाची वाट पाहत आहेत. कल्याणचा हा शुक्ला कोण? त्याचा बाप कोण? कोणाच्या जिवावर तो मराठी माणसांना धमक्या देत आहे? मुख्यमंत्री कार्यालयातील त्याचा दलाल कोण? श्रीमान फडणवीस, मिंधे याचा खुलासा करा. करावाच लागेल. सरकार तुमचे असेल, पण हे राज्य ‘मऱ्हाटी’ आहे हे लक्षात ठेवा. शुक्ला मंत्रालयातला तुमचा नोकर असेल तर त्याच्यावर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून बडतर्फ करा, की त्यासाठी उत्तर प्रदेश सरकारची परवानगी घ्यावी लागेल? मिंध्यांनो, पेढे वाटा, पेढे वाटा, महाराष्ट्र खरेच कमजोर झालाय!