सामना अग्रलेख – अमेरिकेत जनतेचे बंड, भारतात काय?

अमेरिकेत स्वातंत्र्य आणि महागाई, बेरोजगारीविरोधात लोक रस्त्यावर उतरले असताना भारतातील जनता रामनवमीचे जुलूस काढून ‘जय श्रीराम’चे नारे देत होती. सर्व प्रश्नांवर रामबाण उपाय म्हणजे ‘जय श्रीराम’ असे सत्ताधाऱ्यांनी ठरवले आहे. तरीही अमेरिकेप्रमाणे भारतीय जनतेच्या मनातही असंतोषाची ठिणगी पडेल, अशी आम्हाला आशा आहे. अमेरिकेत आत्मसन्मानाची लढाई सुरू आहे. ट्रम्प यांची अरेरावी, विदूषकी चाळे व उद्योगपती मस्कशी भागीदारी याविरोधात जनतेने बंड पुकारले आहे. भारतीय जनतेला आता बुळ्यांप्रमाणे थंड बसणे परवडणार नाही.

प्रे.ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्या धोरणांना अमेरिकेची जनता वैतागली आहे. पंतप्रधान मोदी आणि अदानी यांच्या युतीस आणि धोरणांना भारतीय जनता ज्या प्रकारे कंटाळली आहे, अगदी त्याचप्रमाणे अमेरिकन जनता ट्रम्प यांच्या धोरणांना कंटाळली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांना विरोध करण्यासाठी अमेरिकेतील 50 राज्यांत लोक रस्त्यांवर उतरले, त्यात दीडशेहून जास्त संघटना सहभागी आहेत. देशभरात 1200 ठिकाणी भव्य मोर्चे निघाले. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेऊन सहा महिने झाले नाहीत तोच त्यांच्या विरोधात हा भडका उडाला. अमेरिकेत लोकशाही जिवंत आहे व त्यासाठीच जनता रस्त्यावर येऊन ट्रम्प-मस्क यांच्या देशबुडव्या धोरणांविरोधात उभी ठाकली आहे. अमेरिकेतील जनतेत असंतोष का आहे? ट्रम्प यांच्या काळात आमचा आत्मसन्मान नष्ट झाला आहे, असे जनतेला वाटते. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराचा सर्व भार उद्योगपती मस्क यांनी उचलला व त्याची पुरेपूर किंमत मस्क वसूल करीत आहेत. मस्क हे ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात आहेतच. शिवाय अमेरिकेच्या प्रशासकीय क्षमतावृद्धीसाठी स्थापन केलेल्या ‘डोगे’ (डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी-DOGE) प्रमुख म्हणून मस्क यांची नेमणूक करण्यात आली. एका भांडवलदाराच्या हाती सूत्रे दिल्यावर दुसरे काय होणार? मस्क यांनी सरकारी खात्यातून कर्मचारी कपात चालवली. अमेरिकेत असलेल्या इतर देशांतील नागरिकांची अपमानास्पदरीत्या हकालपट्टी केली. ट्रम्प यांनी अनेक देशांच्या व्यापारांवर आयात शुल्क वाढवले. त्याचा फटका अमेरिकेच्या व्यापार-उद्योगांना बसत आहे. परिणामी महागाई, बेरोजगारी भडकली. अमेरिकेची आरोग्य व्यवस्था कोसळली आहे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. त्यात सामाजिक सुरक्षा विभाग ट्रम्प यांनी बंद केला. त्यामुळे लोक भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. ट्रम्प हे एक उद्योगपती आहेत व त्यांचे मित्र इलॉन मस्क हेसुद्धा बडे व्यापारी आहेत. दोघांनी मिळून अमेरिका लुटण्याचे ठरवले आहे व त्या

लूटशाहीविरुद्ध

अमेरिकेच्या जनतेने ‘हॅण्डस् ऑफ’ आंदोलन पुकारले आहे. आंदोलक म्हणतात, ट्रम्प यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमध्ये इलॉन मस्क यांचा हस्तक्षेप आहे. मस्क यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी हे निर्णय लादले आहेत. त्यामुळे जनता संतप्त आहे. आम्हाला अशी अमेरिका नको आहे. आम्हाला आमची सुरक्षा, आत्मसन्मान आणि स्वातंत्र्य हवे आहे. त्यामुळे आमच्या लोकशाहीला आणि सुरक्षेला सरकारने हात लावू नये, ‘हॅण्डस् ऑफ’ अशी भूमिका निदर्शकांनी घेतली. अमेरिकेच्या जनतेला ट्रम्प नकोसे झाले आहेत. ट्रम्प व मस्क यांची हकालपट्टी व्हावी असे निदर्शकांचे म्हणणे आहे. ट्रम्पविरोधात नागरी हक्क संघटना, कामगार युनियन व अमेरिकेतील अनेक दिग्गज उभे आहेत. ट्रम्प यांची धोरणे अमेरिकेलाच नाही तर जगाला दिवाळखोरीकडे ढकलणारी आहेत. ट्रम्प यांनी लावलेल्या 26 टक्के टॅरिफविरोधात चीन, कॅनडासारख्या देशांनी प्रतिहल्ला केला. अमेरिकेपुढे झुकणार नसल्याचे सांगून टाकले. ट्रम्प यांनी कॅनडा गिळणार असल्याचे सांगितले व कॅनडाने ट्रम्प यांना चोख उत्तर दिले. पुतीन यांच्याशी सौदा करून युव्रेनला चिरडण्याचा प्रयत्न केला, पण युव्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ‘व्हाईट हाऊस’मध्येच प्रे. ट्रम्प यांना सुनावले. इस्रायल गाझा पट्टीत निर्घृण अत्याचार करीत असताना प्रे. ट्रम्प यांनी गाझा पट्टी अमेरिका ताब्यात घेईल असे जाहीर केले. हा मूर्खपणाच आहे. या मूर्खपणाचा अमेरिकेच्या जनतेला वीट आला व त्या जनतेने आंदोलन छेडले. ठिकठिकाणी हजारो लोक मोर्चे व निदर्शनांत सामील झाले आहेत. यापासून भारतातील राज्यकर्त्यांनी धडा घ्यायला हवा. अमेरिकेत आंदोलन सुरू असताना भारताचा शेअर बाजार कोसळून पडला. सोमवारी शेअर बाजार असा कोसळला की, लोकांचे 19 लाख कोटी बुडाले व अर्थमंत्री, पंतप्रधान वगैरे मंडळी काहीच करू शकली नाहीत. अमेरिकेतील जनता ज्या कारणांसाठी रस्त्यावर उतरली आहे

ते सर्व प्रश्न भारतात

आहेत. उलट जास्त तीव्र आहेत. मोदी यांचेही एक इलॉन मस्क आहेत. भारतातील सार्वजनिक संपत्ती त्यांच्या घशात गेली आहे. या ‘मस्क’ला खाण उद्योग दिल्याने छत्तीसगड, झारखंडची जंगलतोड चालली आहे व जंगलात आंदोलन करणाऱ्या आदिवासींना नक्षलवादी ठरवून गोळ्या घातल्या जात आहेत किंवा अटका सुरू आहेत. महागाई, बेरोजगारी विरोधातील आंदोलने दडपली जात आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण सुरू झाले आहे. न्यूनतम समर्थन मूल्य मिळत नाही म्हणून पंजाबचा शेतकरी 150 दिवसांपासून रस्त्यावर होता. त्याची सरकारने साधी दखलही घेतली नाही. देशात एकप्रकारे सामाजिक आणि धार्मिक अराजक निर्माण झाले आहे. होळीच्या दिवशी मशिदी झाकून ठेवण्याचे आदेश निघतात. मुस्लिमांच्या धर्मादाय जमिनी विकता याव्यात म्हणून वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणांचा डाव टाकला जातो. भारतीय ‘मस्क’च्या घशात दोन लाख कोटींच्या जमिनी जाव्यात यासाठी ही तरतूद आहे. भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिल्लक राहिलेले नाही. स्पष्ट बोलणाऱ्यांचे गळे कापले जात आहेत किंवा त्यांच्या घरादारांवर निर्घृण हल्ले सुरू आहेत. जनतेची प्रतिकारशक्ती मारण्यासाठी त्यांना धर्मांध बनवले जात आहे व त्याच धुंदीत देशात राज्य चालले आहे. अमेरिकेत स्वातंत्र्य आणि महागाई, बेरोजगारीविरोधात लोक रस्त्यावर उतरले असताना भारतातील जनता रामनवमीचे जुलूस काढून ‘जय श्रीराम’चे नारे देत होती. सर्व प्रश्नांवर रामबाण उपाय म्हणजे ‘जय श्रीराम’ असे सत्ताधाऱ्यांनी ठरवले आहे. तरीही अमेरिकेप्रमाणे भारतीय जनतेच्या मनातही असंतोषाची ठिणगी पडेल, अशी आम्हाला आशा आहे. अमेरिकेत आत्मसन्मानाची लढाई सुरू आहे. ट्रम्प यांची अरेरावी, विदूषकी चाळे व उद्योगपती मस्कशी भागीदारी याविरोधात जनतेने बंड पुकारले आहे. भारतीय जनतेला आता बुळ्यांप्रमाणे थंड बसणे परवडणार नाही.