सामना अग्रलेख – ‘असत्या’चे वारसदार

जगावर आपण लादलेल्या टॅरिफ युद्धामुळे अमेरिकेचे रोजचे उत्पन्न कसे दोन अब्ज डॉलर्स वाढले, असे ‘अर्धसत्य’ प्रे. ट्रम्प सांगत आहेत. मात्र टॅरिफ युद्धाची झळ पोहोचलेल्या चीनसह इतर देशांनी दिलेल्या ‘ईट का जवाब पत्थर’मुळे अमेरिकेचा खर्च किती अब्जांनी वाढला, किती संभाव्य उत्पन्नावर अमेरिकेला पाणी सोडावे लागले, अमेरिकन उद्योग-व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर त्याचे दुष्परिणाम होत आहेत हे ‘सत्य’ ते लपवून ठेवत आहेत. कारण ते त्यांच्यासाठी गैरसोयीचे आहे. भारतात जे पंतप्रधान मोदी करीत आले, तेच प्रे. ट्रम्प अमेरिकेत करीत आहेत. सोयीचे तेवढे बोलायचे आणि गैरसोयीचे झाकून ठेवायचे. त्यावर ‘मौनीबाबा’ व्हायचे. दोघेही त्याअर्थाने ‘असत्या’चे वारसदार आहेत.

प्रे.डोनाल्ड ट्रम्प हे विचारी राज्यकर्ते म्हणून कधीच परिचित नव्हते. एककल्ली आणि विक्षिप्त राजकारणी असाच त्यांचा बदलौकिक आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या टर्ममध्ये त्याचा अनुभव आला होता. आता दुसऱ्या टर्ममध्ये तर त्यांच्या अविचारी धोरणांनी उच्छाद मांडला आहे. संपूर्ण जगात त्याविरोधात संताप आहे. खुद्द अमेरिकेतही तेथील जनता ट्रम्पविरोधात रस्त्यावर उतरली. मात्र एवढे सगळे असूनही ट्रम्प महाशय आपल्या आर्थिक धोरणांचे खुले समर्थन करीत आहेत. आपण सुरू केलेल्या ‘टॅरिफ युद्धा’त अमेरिकेचीच कशी सरशी होत आहे, पूर्वी नव्हता एवढा प्रचंड पैसा कसा अमेरिकन सरकारच्या तिजोरीत येत आहे, अशा वल्गना ते करीत आहेत. ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेला रोजची दोन अब्ज डॉलर्सची कमाई होत आहे. जी याआधी कधीच झाली नव्हती. या वाढीव उत्पन्नाचे विवरण आणि कुठल्या टॅरिफमुळे किती उत्पन्न वाढले याचा तपशील अर्थातच ट्रम्प यांनी दिलेला नाही. मात्र आपल्या धोरणांमुळे अमेरिकेचे आर्थिक नुकसान होत नसून फायदाच होत आहे असे रस्त्यावर उतरलेल्या अमेरिकन जनतेला भासविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, हे उघड आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ युद्धामुळे आणि इतर आर्थिक धोरणांमुळे अमेरिकेचा काही प्रमाणात

आर्थिक फायदा

होणार हे उघड आहे. कारण तब्बल 60 देशांविरोधात या महाशयांनी टॅरिफ लादला आहे. त्यामुळे त्या प्रमाणात अमेरिकेचे उत्पन्न वाढणार हे उघडच आहे. मात्र टॅरिफ युद्धाची झळ बसलेल्या देशांनी बदललेल्या त्यांच्या आयात कर धोरणामुळे अमेरिकादेखील दररोज अब्जावधी डॉलर्स गमावतच आहे. जे लाखो डॉलर्स एरवी मिळू शकले असते त्यावर अमेरिकेला पाणी सोडावे लागत आहे. मात्र त्यावर ट्रम्प महाशय ‘ब्र’देखील काढणार नाहीत. कारण ते कबूल करणे म्हणजे स्वतःच्या चुकीची कबुली देण्यासारखेच आहे. म्हणून रोजच्या दोन अब्ज डॉलर्स कमाईचे तुणतुणे ते वाजवीत आहेत. चीनसह इतर अनेक देशांनी अमेरिकेला होणारी निर्यात कमी केली आहे किंवा रोखली आहे. त्याचे मूल्यदेखील अमेरिकेसाठी अब्जावधी डॉलर्सच आहे. टॅरिफ युद्धामुळे अमेरिकेच्याही शेअर बाजारावर परिणाम झाला आहेच. अमेरिकेचा विकास दर घसरणार, असा इशाराही तज्ञांनी दिला आहे. अमेरिकेतील महागाईच्या बातम्या तेथील आर्थिक-सामाजिक संकटाची जाणीव करून देत आहेत. अंड्यांपासून सोयाबीनपर्यंत अनेक पदार्थ आणि वस्तूंचे दर नजीकच्या भविष्यात प्रचंड वाढणार, हे निश्चित आहे. मात्र ते गांभीर्याने घेण्याऐवजी ट्रम्प महाशय कान पाडून बसले आहेत आणि आपल्याच ‘नंदनवनात’ मग्न आहेत. कुठलाही

एककल्ली सत्ताधारी

त्याचेच धोरण देशासाठी कसे भल्याचे आहे, असे तुणतुणे वाजवीत असतो. या धोरणाचे देशाला भोगावे लागणारे दुष्परिणाम, त्यामुळे तेथील आर्थिक-सामाजिक घडी विस्कटण्याचा असलेला धोका एकतर त्यांना मान्य नसतो किंवा त्याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे सध्या हेच सुरू आहे. जगावर आपण लादलेल्या टॅरिफ युद्धामुळे अमेरिकेचे रोजचे उत्पन्न कसे दोन अब्ज डॉलर्स वाढले, असे ‘अर्धसत्य’ प्रे. ट्रम्प सांगत आहेत. मात्र टॅरिफ युद्धाची झळ पोहोचलेल्या चीनसह इतर देशांनी दिलेल्या ‘ईट का जवाब पत्थर’मुळे अमेरिकेचा खर्च किती अब्जांनी वाढला, किती संभाव्य उत्पन्नावर अमेरिकेला पाणी सोडावे लागले, अमेरिकन उद्योग-व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर त्याचे दुष्परिणाम होत आहेत, विकास दर घटण्याची धोक्याची घंटा… हे ‘सत्य’ ते अमेरिकन जनतेपासून लपवून ठेवत आहेत. कारण ते सांगणे त्यांच्यासाठी गैरसोयीचे आहे. भारतात जे पंतप्रधान मोदी करीत आले आहेत, तेच प्रे. ट्रम्प अमेरिकेत करीत आहेत. सोयीचे तेवढे बोलायचे आणि गैरसोयीचे झाकून ठेवायचे. त्यावर ‘मौनीबाबा’ व्हायचे. दोघेही त्याअर्थाने ‘असत्या’चे वारसदार आहेत. बहुदा त्यामुळेच मोदी हे ट्रम्प यांचे ‘जवळचे मित्र’ असावेत आणि मोदीही ट्रम्प भारताला देत असलेल्या तडाख्यांबाबत अवाक्षर काढत नसावेत!