सामना अग्रलेख – युद्ध किती लांबणार?

ट्रम्प त्यांच्या व्यापार धोरणाला ‘अमेरिका फर्स्ट’चा मुखवटा चढवीत आहेत, तर चीनदेखील आपल्या भूमिकेला राष्ट्राभिमानाचा रंग देत आहे. ट्रम्प आणि शी जिनपिंग हे दोघेही हटवादी आणि साहसवादी असल्याने अमेरिका-चीनवरील हे व्यापार युद्ध किती लांबेल? त्याचा भडका आणखी वाढणार की कमी होणार? चीनशिवाय इतर देशांना अमेरिकेकडून मिळालेल्या तात्पुरत्या स्थगितीचा दिलासा किती दिवस टिकणार? या व्यापार युद्धाचे चटके भारत आणि जगाला किती काळ सहन करावे लागणार? असे अनेक प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरे ‘हे’ युद्ध किती लांबणार? या प्रश्नाच्या उत्तरात दडली आहेत.

युक्रेन युद्धाप्रमाणे अमेरिका आणि चीन यांच्यातील ‘व्यापार युद्ध’ थांबण्याची चिन्हे नाहीत. दिवसेंदिवस त्याचा भडका जास्तच होताना दिसत आहे. आता अमेरिकेकडून चीनवर 245 टक्क्यांपर्यंत कर आकारणीची घोषणा करण्यात आली आहे. त्याआधी चीनने अमेरिकेवर 125 टक्के कर आकारणार, असे जाहीर केले होते. त्यावर प्रतिक्रिया म्हणून ट्रम्प प्रशासनाने कराचा आकडा 245 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यापासूनच त्यांनी चीनसह जगातील सुमारे 60 देशांविरुद्ध ‘टॅरिफ वॉर’ छेडले आहे. त्याचा फटका भारतालाही बसला. आजही बसतो आहे. ‘अमेरिका प्रथम’ हे ट्रम्प यांचे व्यापार धोरण आहे. त्यामागे अमेरिकेची अर्थव्यवस्था रुळावर आणणे, अधिक सक्षम बनविणे हे कारण असल्याचा दावा ट्रम्प करीत असतात. त्यातूनच त्यांच्या या व्यापार युद्धाला तोंड फुटले आहे. ट्रम्प यांच्या या धोरणाला जसा जगातून विरोध होत आहे तसा अमेरिकेतूनदेखील होत आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकी जनता ठिकठिकाणी त्याविरोधात रस्त्यावरही उतरली होती; परंतु ट्रम्प महाशय

ना ऐकायला तयार

आहेत ना थांबायला. नाही म्हणायला, चीनचा अपवाद वगळता इतर देशांवरील शुल्कास ट्रम्प प्रशासनाने तूर्तास स्थगिती दिली आहे. मात्र चीनविरोधातील आक्रमकता कमी करण्याची ट्रम्प यांची तयारी नाही. चीनदेखील जशास तसे धोरण राबवीत आहे. अमेरिकेच्या प्रत्येक ‘आरे’ला चीन ‘कारे’ने उत्तर देत आहे. अमेरिकेने चिनी निर्यातीवर 145 टक्के कर लादला. त्याला उत्तर म्हणून चीनने अमेरिकी आयातीवरील अतिरिक्त शुल्क वाढवून 125 टक्के केले. शिवाय जागतिक व्यापार संघटनेत अमेरिकेविरोधात खटलादेखील दाखल केला. त्याचा वचपा अमेरिकेने चीनवरील कर आकारणी 245 टक्क्यांपर्यंत वाढवून काढला आहे. आता या 245 टक्क्यांना चीन किती टक्क्यांनी उत्तर देतो हे पाहावे लागेल. चीनचा एकूण पूर्वानुभव पाहता तो नक्कीच जशास तसे उत्तर देण्याचाच प्रयत्न करेल. मात्र हे अखेर कुठवर चालणार? एकीकडे ट्रम्प हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत तर दुसरीकडे चीनदेखील

मागे हटायची चिन्हे

नाहीत. चीनसारख्या विरोधकांसोबतच्या व्यापार युद्धात आपण आपल्या देशाचे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्याचा निर्धार केला आहे, असा तात्त्विक मुलामा ट्रम्प त्यांच्या धोरणाला चढवीत आहेत. आपल्याकडे मोदी सरकार जसे अनेक निर्णयांना हिंदुत्वाचा, राष्ट्रवादाचा मुलामा चढवते आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते तसेच सध्या अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाच्या निमित्ताने सुरू आहे. ट्रम्प त्यांच्या व्यापार धोरणाला ‘अमेरिका फर्स्ट’चा मुखवटा चढवीत आहेत, तर चीनदेखील आपल्या भूमिकेला राष्ट्राभिमानाचा रंग देत आहे. ट्रम्प आणि शी जिनपिंग हे दोघेही हटवादी आणि साहसवादी असल्याने अमेरिका-चीनवरील हे व्यापार युद्ध किती लांबेल? त्याचा भडका आणखी वाढणार की कमी होणार? चीनशिवाय इतर देशांना अमेरिकेकडून मिळालेल्या तात्पुरत्या स्थगितीचा दिलासा किती दिवस टिकणार? या व्यापार युद्धाचे चटके भारत आणि जगाला किती काळ सहन करावे लागणार? असे अनेक प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरे ‘हे’ युद्ध किती लांबणार? या प्रश्नाच्या उत्तरात दडली आहेत.