सामना अग्रलेख – बारामतीचे नवे विष्णुदास!

महाराष्ट्राचे नाटय़प्रेम सर्वश्रुत आहे, पण विष्णुदास भावे यांनी .. 1843 मध्ये स्थापन केलेली रंगभूमी आणि आता या दिल्लीदासांनी स्थापन केलेली रंगभूमी यात फरक आहे. दिल्लीला वेष आणि नाव बदलून प्रवास करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री नटवर्य अजित पवार यांना त्यांच्या नाटकीय कारकीर्दीसाठी विष्णुदास भावे सुवर्णपदक द्यावे, अशी शिफारस महाराष्ट्राचे सरकार उद्या करू शकते, पण . . पवार या नटवर्यांनी अमित शहांच्या मदतीने राष्ट्रीय सुरक्षेचा जो फज्जा उडवला त्याची चौकशी व्हायलाच हवी. लडाखमध्ये चीन कश्मीरात पाकडे अतिरेकी का घुसत आहेत त्याचा हा नमुना आहे. देशाच्या गृह मंत्रालयाचे कुंपणच शेत खात आहे!

महाराष्ट्राला रंगभूमीची मोठी परंपरा आहे. नाटक आणि राजकारण याचा छंद पूर्वीपासून मराठी मनाला आहे. नाटय़कर्मी व राजकीय लोकांनी मराठी माणसांचे हे छंद जोपासून मन रिझविले आहे. या नाटय़ मंडळात आता भर पडली आहे ती अजित पवार यांच्या नाटक कंपनीची. नटवर्य अजित पवार यांनी ‘काकांच्या पाठीत खंजीर’, ‘मी कुणाचाच नाही’, ‘ज्याचे खावे मीठ त्याची…’, ‘घराबाहेर’ अशा नाटकांची निर्मिती अलीकडच्या काळात केली. मात्र त्यांच्या ‘राजभवनातील पहाटवारा’, ‘बारामतीत स्वाभिमानाचे गवत झाले’ अशा नाटकांना गुजरातचा व नागपूरचा दर्दी रसिक वर्गदेखील मिळाला. अर्थात आपल्या पिटातल्या करामती आता खुद्द नटवर्य अजित पवार यांनीच सांगितल्या आहेत. अजित पवार हे महायुतीच्या ‘घोडा बाजार’ व ‘माझेच वस्त्रहरण’ या दोन नाटकांत सध्या साईड रोल अदा करीत आहेत. या भूमिका त्यांना कशा मिळाल्या व त्यासाठी दिल्लीच्या ‘राष्ट्रीय अभिनय केंद्रा’त जाऊन कशा प्रकारे ‘स्क्रीन टेस्ट’ वगैरे करावी लागली याचा खुलासा नटवर्य अजित पवार यांनी केला. दिल्लीतील ‘तटकरे’ फिरत्या रंगमंचावरील गप्पांच्या कार्यक्रमात त्यांनी आपल्या नाटय़जीवनाचे अनेक किस्से पत्रकारांना सांगितले. ‘काकांच्या पाठीत खंजीर’ या नाटकाचा प्रयोग सुरू होण्याआधी अजित पवार यांना सातत्याने तालमीसाठी दिल्लीत जावे लागत असे. तालीम मास्तर अमित गुजराती यांच्या नेतृत्वाखाली अजित पवारांना कठोर तालमी कराव्या लागल्या. त्यासाठी ते दिल्लीत वेष बदलून आणि नाव बदलून जात होते. या तालमी गुप्त पद्धतीच्या होत्या. अनेकदा काळय़ा रंगाचा मास्क, अनेक प्रकारच्या टोप्या, नकली दाढी-मिशा वगैरे लावून त्यांनी सामान्य विमानाने मुंबई-दिल्ली, दिल्ली-मुंबई असा प्रवास केला.

या पेहरावात

त्यांना कोणीच ओळखत नव्हते. आचार्य अत्रे यांच्या ‘तो मी नव्हेच’ या गाजलेल्या नाटकात प्रभाकर पणशीकर यांनी अशा विविधरंगी ठगाच्या भूमिका वठवून रंगभूमीवर एकेकाळी बहार आणली होती. पणशीकरांचे ‘लखोबा लोखंडे’ हे पात्र त्यामुळे सर्वमुखी झाले होते. अजित पवार यांनी लखोबा लोखंडेचा आदर्श ठेवला काय? अजित पवार यांनी विमान प्रवासात आपले नाव बदलले. नाव बदलले म्हणजे ओळखपत्रासाठी लागणारे आधार कार्ड, पॅन कार्ड हेसुद्धा ‘नकली’ केले व येथेच खरा रहस्यभेद आहे. पवार हे ए. ए. पवार या नावाने प्रवास करीत होते व त्यासाठी त्यांनी नकली ओळखपत्रे बनवली असतील तर तो विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्थेला छेद आहे. एक व्यक्ती आपली ओळख लपवून प्रवास करू शकते व त्यांनी हा प्रवास आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केला. त्यात मुंबई, दिल्लीसारखी संवेदनशील आंतरराष्ट्रीय विमानतळे सामील आहेत. जर ए. ए. पवार अशा नावाने ओळख लपवून राज्याचे उपमुख्यमंत्री प्रवास करीत असतील व देशाच्या गृहमंत्र्यांना अशा पद्धतीने वारंवार भेटत असतील, तर याचा अर्थ गृहमंत्री शहा हेदेखील राष्ट्रीय सुरक्षेशी खेळत आहेत. आपल्या राजकीय स्वार्थासाठी व राजकारणासाठी देशाच्या गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा बाजार मांडला आहे. अजित पवार यांना झेड दर्जाची सुरक्षा आहे. त्यामुळे गृहमंत्री फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवरही संशय निर्माण होतो. फडणवीस, पवार व अमित शहा यांनी मिळून राष्ट्रीय सुरक्षा धाब्यावर बसवली. अशाच ‘नकली’ पद्धतीने मुंबई-दिल्लीतून नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी प्रवास केला नसेल कशावरून? अमित शहा,

फडणवीसांच्या कारकीर्दीत

दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, छोटा शकील, झाकीर नाईक हेदेखील नाव बदलून वगैरे ये-जा करीत असतील, तर काय सांगावे? अजित पवार म्हणजे ए. ए. पवार यांना अशा प्रवासाची मुभा देणारे देशातील अशा भगोडय़ांना विमानतळावर कसे रोखतील? पवारांच्या नाटकावरील पडदा उडताच राष्ट्रीय सुरक्षेचा बोजवारा उडाल्याची धोक्याची घंटा वाजली. याआधी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि श्रीमान मिंधे हे मध्यरात्रीनंतर वेष पालटून भेटत होते, हे या दोघांनीच सांगितले. फडणवीस यांचे वेषांतर इतके पक्के होते की, सौ. फडणवीसही त्यांना ओळखू शकल्या नाहीत. नाटय़कलेतले हे प्रावीण्य वाखाणण्यासारखेच आहे. महाराष्ट्र फडणवीस-मिंध्यांना ओळखून असला तरी सौ. फडणवीस यांनी आपल्या पतीराजांना ओळखले नाही व त्यामुळे ‘संशयकल्लोळ’ नाटकाचा प्रयोग चालला नाही. मिंधे यांनीदेखील दिल्लीत जाऊन लपूनछपून नाटके केली व त्यांचेही तालीम मास्तर अमित गुजरातीच होते. मिंधे हेदेखील त्या काळात मौलवीच्या वेषात दिल्लीत जात होते, असे त्यांचे लोक सांगतात. महाराष्ट्राचे नाटय़प्रेम सर्वश्रुत आहे, पण विष्णुदास भावे यांनी इ.स. 1843मध्ये स्थापन केलेली रंगभूमी आणि आता या दिल्लीदासांनी स्थापन केलेली रंगभूमी यात फरक आहे. दिल्लीला वेष आणि नाव बदलून प्रवास करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री नटवर्य अजित पवार यांना त्यांच्या नाटकीय कारकीर्दीसाठी विष्णुदास भावे सुवर्णपदक द्यावे, अशी शिफारस महाराष्ट्राचे सरकार उद्या करू शकते, पण ए. ए. पवार या नटवर्यांनी अमित शहांच्या मदतीने राष्ट्रीय सुरक्षेचा जो फज्जा उडवला त्याची चौकशी व्हायलाच हवी. लडाखमध्ये चीन व कश्मीरात पाकडे अतिरेकी का घुसत आहेत त्याचा हा नमुना आहे. देशाच्या गृह मंत्रालयाचे कुंपणच शेत खात आहे!