दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यामध्ये सुरू असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना डरबनमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को यान्सनने अक्षरश: श्रीलंकेच्या बत्त्या गुल केल्या आहेत. चार फलंदाजांना तर त्याने भोपळाही फोडू दिला नाही. त्यामुळे श्रीलंकेचा पहिल्या डावात फक्त 42 धावांमध्ये खुर्दा झाला आहे. तसेच कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील श्रीलंकेची ही सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे.
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना सर्वगडी बाद 191 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या फलंदाजांना धावांचा डोंगर उभा करण्याची संधी होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को यान्सनने श्रीलंकेचे सर्व मनसुबे उधळून लावले. मार्को यान्सनच्या धारधार गोलंदाजीपुढे श्रीलंकेचे फलंदाज पत्त्यांसारखे कोसळत होते. पाच फलंदाजांना तर भोपळाही फोडता आला नाही. यापैकी चार फलंदाजांना मार्को यान्सनने तंबुचा रस्ता दाखवल तर एकाला जिराल्ड कोत्झीने आल्या पावली माघारी पाठवले. मार्को यान्सनने 13 धावा देत 7 विकेट घेतल्या, जेराल्डने 18 धावा देत 2 विकेट घेतल्या आणि रबाडाने 10 धावा देत 1 विकेट घेतली. त्यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव फक्त 42 धावांमध्ये आटोपला. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. टोनी डी झॉर्झी (16 चेंडू 14 धावा) आणि मार्कराम (20 चेंडू 9 धावा) सध्या फलंदाजी करत असून संघाने बिनबाद 28 धावांपर्यंत मजल मारली आहे.