दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला चारली धूळ; WTC Final मध्ये स्थान निश्चित, अंतिम फेरीसाठी तीन संघात चुरस

टी20 वर्ल्डकपमध्ये ज्या टेम्बा बवुमाला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. त्याच टेम्बा बवुमाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सेंच्युरियन कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा दोन विकेटने पराभव करत ही ऐतिहासिक कामगिरी केली.

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा दोन विकेटने पराभव केला आहे. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला 148 धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी झालेली पहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेचे 99 या धावसंख्येवर 8 गडी बाद झाले होते. त्यामुळे पाकिस्तान हा सामना जिंकणार असे सर्वांना वाटले होते. परंतु दक्षिण आफ्रिकेला या कठीण परिस्थितीतून सावरलं ते मार्को यान्सन आणि कागिसो रबाडा यांनी. दोघांनीही संयमी फलंदाजी करत पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले. रबाडाने 31 धावा आणि मार्को यान्सनने 16 धावा करत संघाला दोन विकेटने विजय मिळवून दिला. त्यांची ही 51 धावांची भागी संघाला WTC फायनलचे तिकीट देऊन गेली.

जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने एन्ट्री मारली आहे. परंतु दक्षिण आफ्रिकेला भिडणारा संघ अद्याप गुलदस्त्यात आहे. WTC च्या फायनलमध्ये पोहचण्यासाठी सध्या तीन संघांमध्ये चढाओढ पहायला मिळत आहे. यामध्ये हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे. तसेच न्यूझीलंड, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि पाकिस्ताने हे संघ यापूर्वीच फायलनच्या शर्यतीमधून बाहेर फेकले गेले आहेत.