
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱयांच्या पीएफच्या रकमेत गोलमाल झाल्याचे उघडकीस आले आहे. तीन हजारांहून जास्त एसटी कर्मचाऱयांच्या पगारातून कापलेली 1200 कोटी रुपयांची रक्कम पीएफ ट्रस्टमध्ये भरलेली नाही. ट्रस्टकडे गुंतवणुकीव्यतिरिक्त काहीच रक्कम शिल्लक नसल्याने राज्यातील तीन हजारांहून अधिक कर्मचाऱयांना ऑक्टोबरपासून पीएफची ऍडव्हान्स रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचारी विवंचनेत सापडले आहेत. एसटी कर्मचाऱयांच्या पीएफ रकमेच्या घोळासह इतर प्रश्न आणि प्रलंबित मागण्यांकडे एसटी महामंडळाचे नवीन अध्यक्ष संजय सेठी यांचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने लक्ष वेधले आहे. एसटी महामंडळाने कर्मचाऱयांच्या पगारातून कापलेले 1200 कोटी रुपये पीएफ ट्रस्टमध्ये भरलेले नसल्यामुळे ट्रस्टकडे गुंतवणुकीव्यतिरिक्त काहीच रक्कम शिल्लक नाही. आधीच कमी पगार, त्यात पीएफची ऍडव्हान्स रक्कम मिळत नसल्याने कुटुंबीयांचे आजारपण, मुलामुलींची लग्ने, शैक्षणिक खर्च याचा आर्थिक भार पेलणे कठीण जात आहे.