
बंगळुरूमध्ये एस. सतीश नावाच्या एका व्यक्तीने वूल्फडॉगसाठी तब्बल 50 कोटी रुपये मोजले आहेत. सतीशने फेब्रुवारी महिन्यात हा वूल्फडॉग खरेदी केला आहे. हा वूल्फडॉग म्हणजे लांडगा आणि कुत्रा यांचे मिश्रण आहे. अमेरिकेत जन्मलेला वूल्फडॉग केवळ 8 महिन्यांचा असून त्याचे वजन 75 किलो आहे. त्याला दररोज 3 किलो कच्चे मांस खायला लागते. कॅडाबोम्स ओकामी असे या वूल्फडॉगचे नाव आहे. हा कुत्रा वेगळा आणि अत्यंत दुर्मिळ आहे. लांडगा आणि कुत्रा यांचे मिश्रण असलेला हा वूल्फडॉग हिंदुस्थानातील पहिलाच वूल्फडॉग आहे. यासारखा प्राणी केवळ जॉर्जिया आणि रशियात पाहायला मिळतो, असेही एस. सतीशने सांगितले. माझ्या कुत्र्यासोबत सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. या कुत्र्याच्या देखभालीची विशेष काळजी घेतली जाते. त्याला सध्या सात एकरच्या फार्ममध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्यासाठी 20 फुटाचे खास घर बांधले आहे. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी 24 तास सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. लांडगा आणि कुत्रा यांच्यातील संकरीकरणामुळे वूल्फडॉग तयार होतो. जंगली लांडग्यासारखा दिसणारा हा वूल्फडॉग त्याचा आकार आणि ताकदीमुळे इतर पाळीव कुत्र्यांच्या जातींपेक्षा वेगळा आहे. कॅडाबॉम्स ओकामी अल्पावधीतच कर्नाटकात एक सेलिब्रिटी बनला आहे. तो मालकासोबत हाय-प्रोफाइल कार्यक्रमांमध्ये नेहमी उपस्थित राहतो.