सुप्रसिद्ध चित्रकार एस. एच. रझा यांच्या बॅलार्ड पिअर येथील ऑक्शन हाऊसमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या चित्राची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी माता रमाई आंबेडकर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एस. एच. रझा यांचे चित्र इंद्रजित यांनी विकत घेतले होते. त्यानंतर इंद्रजित यांनी ते चित्र रझा यांच्या बॅलार्ड पिअर येथील पंटा स्ट्रीट येथील ऑक्शन हाऊसमध्ये ठेवले होते. 24 मार्च 2022 पासून ते चित्र 30 मे 2024 पर्यंत ऑक्शन हाऊसमध्ये होते. मात्र चित्रांचे ऑडिट केले असता ते चित्र ऑक्शन हाऊसमध्ये नसल्याचे आढळून आले. त्यामुळे एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात चित्र चोरीला गेल्याचा तक्रार अर्ज देण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत चित्र चोरीला गेल्याचे समोर आल्याने त्याप्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळपास अडीच कोटी किमतीचे ते चित्र असल्याचे समजते. ‘प्रकृती’ नावाचे ते चित्र असून 1992 साली रेखाटण्यात आले होते असेही सांगण्यात येते. एमआरए मार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.