भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा तंतोतंत वापर करून लोकांचा लोकशाही मूल्यांवरील, निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास वृद्धिंगत करावा. पारदर्शी व भयमुक्त वातावरणात आगामी विधानसभा निवडणूक पार पाडण्यासाठी सर्वांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे. राज्याच्या सरासरी मतदानापेक्षा कमी टक्केकारी असणारे विधानसभा मतदारसंघ शोधून त्याची मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. मतदार यादीतून नावे वगळताना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिले.
सातारा जिह्यातील विधानसभा निवडणूक तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यालेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्यासह प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, नोडल अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.
एस. चोक्कलिंगम म्हणाले, जिह्यात काही विधानसभा मतदारसंघांमध्ये मागील निवडणुकीपेक्षा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. यासाठी राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, प्रसारमाध्यमांची मदत घ्यावी. सर्व मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात. प्रत्येक पात्र मतदाराला मतदान ओळखपत्र मिळेल, याची दक्षता घ्यावी. क्हीक्हीपॅट व पॉवर पॅक पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील, याची खबरदारी घ्यावी. महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून, निवडणुकीमध्ये तपासणी पथकांकडून जप्त करण्यात येणाऱया मुद्देमालांची संख्या अत्यंत कमी असते. या निवडणुकीमध्ये एफएसटी, एसएसटी पथकांनी सतर्क राहून कारवाई करावी. सर्व मार्गांवरील तपासणी नावे कार्यरत ठेकावेत. लक्झरी बसेस, प्रचार कालावधीमध्ये सामाजिक सलोखा बिघडवणारी वक्तव्ये झाल्यास त्वरित कारवाई करावी, अशा सूचना चोक्कलिंगम यांनी दिल्या.
जिल्हा पोलीसप्रमुख समीर शेख यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. दरम्यान, आचारसंहिता कक्ष, मनुष्यबळ आदींचा आढावा घेतला.
70 टक्क्यांहून अधिक मतदान झाले पाहिजे – जिल्हाधिकारी डुडी
z विधानसभा निवडणुकीत 70 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान व्हावे, यासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील. बोगस मतदार नोंदणीसंदर्भात घेण्यात आलेल्या आक्षेपांचे विहित मुदतीत निराकरण करण्यात येईल. जिह्यात करण्यात आलेल्या निवडणूकविषयक तयारीचा आढावा सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या.