रशियन ‘अतिथी’चा पोलिसांना त्रास, भावाच्या स्वाधीन करत पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला

एका 22 वर्षीय रशियन तरुणाने कुलाबा पोलिसांचा अक्षरशः अंत पाहिला. ड्रग्जच्या आहारी गेलेल्या त्या तरुणाने ससून डॉक येथे समुद्रात उडी मारली होती. तेव्हापासून कुलाबा पोलीस त्याचा ‘अतिथी देवो भव’ म्हणत सांभाळ करत होते. अजिबात सहकार्य न करता उलट त्रास देणाऱ्या त्या तरुणाला दहा दिवस सांभाळून घेतले. अखेर मोठ्या कष्टाने त्याच्या भावाचा शोध घेतला आणि त्याला भावाच्या ताब्यात देत पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

13 फेब्रुवारीच्या सकाळी एका परदेशी नागरिकाने ससून डॉक येथील समुद्रात ड्रग्जची नशा करून उडी मारली होती, पण त्यावेळी मच्छीमारांनी त्याला पाण्यातून सुखरूप बाहेर काढले होते. त्यानंतर एका टॅक्सीत बसून तो निघाला, पण चालकाला त्याचा संशय आल्याने त्याने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. मग वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक अरुणा सानप व त्यांच्या पथकाने एलिया उरयिन सेवा (22) या रशियन तरुणाला ताब्यात घेतले.

एलिया उरयिन याला स्वतःबद्दल काहीच सांगता येत नव्हते. उलट तो पोलीस ठाण्यात विक्षिप्तपणे वागत होता. मनोरुग्णासारखा करू लागल्यामुळे  त्याला जे. जे. इस्पितळात नेण्यात आले. त्याला रशियन वगळता दुसरी भाषाच समजत नव्हती. दरम्यान, गोव्यातील एका चर्चमधील  ब्रदरच्या माध्यमातून पोलिसांनी त्याच्या भावाशी अचूक संवाद साधला आणि त्याला त्याच्या भावाच्या ताब्यात देण्यात आले.