शांततेसाठी प्रयत्न करा, अन्यथा देश गमावून बसाल; ट्रम्प यांचा झेलेन्स्कींना इशारा

रशिया युद्ध झाले, त्याकाळात आपण राष्ट्राध्यक्ष असतो तर हे युद्धच होऊ दिले नसते, असा दावा डोनाल्ड ट्रम्प करत होते. आता त्यांनी युद्ध रोखण्यासाठी थेट युक्रेनला इशारा दिला आहे. युद्ध थांबवून शांततेसाठी प्रयत्न करा, अन्यथा देश गमावून बसाल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना दिला. त्यावर ट्रम्प रशियाची भाषा बोलत असून ते रशियाचा दुष्प्रचाराला बळी पडल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले होते.

रशियाला युक्रेनमधील संघर्ष थांबवायची इच्छा असल्याचे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले. झेलेन्स्की यांच्यामुळे हे युद्ध सुरू झाले असून ते निवडणुकीशिवाय झालेले हुकूमशहा नेते आहेत. झेलेन्स्की या कॉमेडियनने माजी अध्यक्ष बायडेन यांना इशाऱ्यावर नाचवले होते. जे युद्ध कधीच जिंकणार नाही, त्यासाठी बायडेन यांनी पैसा खर्च केल्याचा आरोप करत ट्रम्प यांनी झेलेन्स्की आणि बायडन या दोघांवरही निशाणा साधला.

फेब्रुवारी 2022मध्ये रशियाने केलेल्या आक्रमणाला युक्रेनच जबाबदार असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. युक्रेनने रशियाशी युद्ध सुरू करण्याची गरज नव्हती. रशियाला हे युद्ध थांबवण्याची इच्छा आहे. आता झेलेन्स्की यांनी शांततेसाठी प्रयत्न करावेत, अन्यथा ते देश गमावून बसतील, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला. हे कधीच व्हायला नको होते. माझे नेतृत्व असते, तर हे युद्ध झाले नसते, असेही ते म्हणाले. एका छोटा कॉमेडियन वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेला 350 बिलियन डॉलर्स खर्च करण्यासाठी तयार केले, तेही एका अशा युद्धासाठी जे कधीही जिंकता येणार नाही. हे युद्ध अमेरिका आणि ट्रम्पशिवाय कधीही थांबवले जाऊ शकत नाही, असा दावाही ट्रम्प यांनी केला.