
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांना अमेरिकेत आमंत्रित केले होते. ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये झालेली बैठक वादग्रस्त ठरली. कॅमेऱ्यासमोर जागतिक स्तरावरील या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. शांततेसाठी तयार असाल तेव्हाच परत या, असे ठणकावून सांगत संतापलेल्या ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना हुसकावून लावले.
झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमधून आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, अमेरिकेचा सहभाग असेल तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की शांतता प्रस्थापित करण्यासाठी तयार नाहीत हे माझ्या लक्षात आले आहे. आमच्या सहभागामुळे त्यांना वाटाघाटीमध्ये मोठा फायदा होतो असे त्यांना वाटते. मला फायदा नाही, केवळ शांतता हवी आहे. झेलेन्स्की यांनी ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकेचा अनादर केला. त्यामुळे ते जेव्हा शांततेसाठी तयार असतील तेव्हाच त्यांनी परत यावे.
युक्रेनने कोणत्याही परिस्थितीत युद्ध रोखण्यासाठी तयार व्हावे अशी ट्रम्प यांची इच्छा होती. त्यामुळेच त्यांनी झेलेन्स्की यांना अमेरिका दौऱ्यावर बोलावले होते. पण, सध्या तरी झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांचा शांतता प्रस्ताव नाकारल्याचे दिसते. झेलेन्स्की रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी कोणत्याही प्रकारच्या तडजोडीसाठी तयार नसल्याचे बैठकीत दिसले. विशेष म्हणजे संभाषणादरम्यान त्यांनी पुतीन यांचा उल्लेख खुनी असा केला. झेलेन्स्की यांच्या या वर्तनावरून ट्रम्प संतापले.
झेलेन्स्की यांना मारले नाही याचे नवल वाटते – रशिया
ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्या बाचाबाचीवरून रशियाने झेलेन्स्की यांना टोला लगावला. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जखारोव्ह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, व्हाईट हाऊसमध्ये झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्यासमोर असत्य कथन केले. हे ऐपून ट्रम्प व व्हॅन्स यांनी झेलेन्स्की यांना मारले कसे नाही याचे आम्हाला नवल वाटते.
रशियाबद्दलचा दृष्टिकोन लगेच बदलू शकत नाही
ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्या वादग्रस्त बैठकीची बरीच चर्चा रंगली आहे. यावेळी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हॅन्सदेखील उपस्थित होते. व्हाईट हाऊसमध्ये घडलेल्या प्रकारानंतर झेलेन्स्की यांनी जोपर्यंत युक्रेनला हल्ल्याविरुद्ध सुरक्षा हमी मिळत नाही तोपर्यंत त्यांचा देश रशियासोबत शांतता चर्चेत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच ट्रम्प यांच्याशी झालेला वाद दोन्ही देशांसाठी योग्य नाही. युक्रेन रशियाबद्दलचा आपला दृष्टिकोन एका क्षणात बदलू शकत नाही. हे ट्रम्प यांनी समजून घेतले पाहिजे, असेही झेलेन्स्की म्हणाले.
तिसऱ्या महायुद्धाचा जुगार
आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोरच ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात बाचाबाची झाली. ‘तुम्ही लाखो लोकांच्या जीवाशी जुगार खेळत आहात. तिसऱ्या महायुद्धाचा जुगार सुरू आहे. तुम्ही जे करत आहात ते देशाचा अपमान करणारे आहे. युक्रेन सध्या मोठय़ा संकटात असून तुम्ही हे युद्ध जिंकताना दिसत नाही. यातून बाहेर पडण्याची तुम्हाला एक चांगली संधी आहे’, अशा शब्दांत ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना सुनावले.
…अन् झेलेन्स्की यांना सोडावे लागले व्हाईट हाऊस
ट्रम्प यांच्यासोबतची बैठक वादग्रस्त ठरल्याने झेलेन्स्की यांच्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये बनवलेले जेवण रोस्टेड चिकन, स्प्रिंग ग्रीन सलाड आणि क्रीम ब्रुले तसेच राहिले. ते न जेवताच बाहेर पडले. वादानंतर ट्रम्प संतापले आणि झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊस सोडण्यास सांगण्यात आले. बाहेर पडण्याचा आदेश येताच झेलेन्स्की यांनी तडकाफडकी व्हाईट हाऊस सोडले. त्यामुळे त्यांच्यासाठी बनवलेले जेवण तसेच राहिले.