
रशियाने युक्रेनवर शनिवारी रात्री एकाचवेळी तब्बल 267 ड्रोन्स डागले. तीन वर्षे पूर्ण होण्याच्या बरोबर एक दिवस आधी हा हल्ला करण्यात आला. रशियाने पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणावर ड्रोन्स डागल्याचा दावा युक्रेनच्या हवाई दल कमांडचे प्रवक्ते युरी इग्नात यांनी केला आहे. दरम्यान, रशियाने तीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रही डागल्याचे इग्नात म्हणाले.
युक्रेनच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार खार्किव्ह, पोल्तावा, सुमी, कीव्हसह कमीत कमी 13 शहरांवर ड्रोनहल्ला करण्यात आला. रशियाच्या हल्ल्यात अनेक इमारतींचे प्रचंड नुकसान झाले. हल्ल्यात आतापर्यंत तिघे जखमी झाले आहेत. खेरसॉनमध्ये दोन नागरिक ठार झाले. याशिवाय क्रीव्ही रीहमध्येही एकजण मारला गेला. क्रीव्ही रीह हे औद्योगिक शहर असून या ठिकाणी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांचा जन्म झाला होता. रशियाच्या हल्ल्याला युक्रेननेही उत्तर दिले. युक्रेनने 20 ड्रोन हल्ले केले, परंतु सर्व ड्रोन हल्ले परतवून लावल्याचा दावा रशियाने केला आहे.
एका आठवडय़ात 35 क्षेपणास्त्र डागली
रशियाचे 138 ड्रोन पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. मात्र यात 119 डिकॉय ड्रोन होते. या ड्रोन्समध्ये शस्त्रास्त्रs नसतात. या ड्रोन्सचा वापर शत्रूचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी करण्यात येतो. दुसरीकडे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युद्ध अद्याप सुरूच असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आठवडाभरात रशियाने युक्रेनवर 1 हजार 1150 ड्रोन, 1 हजार 400 बॉम्ब आणि 35 क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ला केला आहे.