युक्रेनची एक चूक त्यांना जगाच्या नकाशातून पुसून टाकेल, अण्वस्त्र हल्ल्याची रशियाची धमकी

युक्रेन आणि रशियामध्ये गेली दोन वर्षे युद्ध सुरु आहे. याबाबत रशियात नुकतीच सुरक्षा परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीनंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. युक्रेनची एक चूक देशाला जगाच्या नकाशातून गायब करेल, असे पुतीन म्हणाले. गेल्या दोन वर्षांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे.

अणुबॉम्बच्या वापराबाबत अनेक बदल केले आहेत. नियोजित सुधारणांनुसार, रशियावर कोणताही क्षेपणास्त्र हल्ला झाल्यास त्याला अणुबॉम्बने प्रत्युत्तर दिले जाईल, असे पुतीन यांनी म्हटले आहे.

पाश्चिमात्य देशांनी रशियावर हल्ला करण्यासाठी युक्रेनला अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे दिली आहेत. दरम्यान, युक्रेनला स्टॉर्म शॅडो क्रूझ क्षेपणास्त्राचा वापर करून रशियाच्या आत हल्ला करण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटनकडून परवानगी मिळाली आहे. यामुळे रशिया चक्रावून गेला आहे.

स्टॉर्म शॅडो क्रूझ क्षेपणास्त्र 500 किमी अंतरापर्यंत मारा करू शकते. युक्रेनने चुकूनही मिसाईल हल्ला केला तर पाश्चिमात्य देश आमच्याविरोधात रणांगणात उतरल्याचे आम्ही समजू, असेही पुतिन यांनी पुढे नमूद केले.

रशियाकडे जवळपास 6, 372 अण्वस्त्रे आहेत. अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीनंतर जगभरात चिंता वाढली आहे. कारण, रशियाने 2020 मध्ये अण्वस्त्रांच्या वापरात बदल केले आहेत. त्यानुसार, देशाच्या अस्तित्वाला धोका वाटला तर रशिया अण्वस्त्र हल्ला करेल, असेही व्लादिमीर पुतीन म्हणाले.