रशियाचा युक्रेनच्या चेर्नोबिलमधील अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला, झेलेन्स्की रशियावर भडकले

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी रशिया-युक्रेनला शांततेचे आवाहन केले असतानाच दुसरीकडे रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे. रशिया-युक्रेन युद्धाने आता घातक वळण घेतले आहे. रशियाने युक्रेनच्या चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ला केला आहे. यामुळे जागतिक अणु सुरक्षा धोक्यात असल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे. रशियाचा हा हल्ला जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चेर्नोबिल येथील हे विशेष युनिट युक्रेन, युरोप, अमेरिका आणि इतर देशांच्या मदतीने रेडिएशनचे धोके टाळण्याच्या उद्देशाने बांधण्यात आले आहे.

चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर ड्रोन हल्ल्यानंतर लागलेली आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले आहे. ड्रोन हल्ल्यानंतर अणुऊर्जा प्रकल्पातील रेडिएशनची पातळी सामान्य असल्याचे सांगण्यात आले आहे.

झेलेन्स्की यांनी या हल्ल्याला दहशतवादी हल्ला, असे म्हटले आहे. रशियाने आंतरराष्ट्रीय नियम डावलून अणुस्थळांना लक्ष्य केल्याचा आरोपही झेलेस्की यांनी केला आहे. असे हल्ले जागतिक सुरक्षेला धोका निर्माण करू शकतात. त्यामुळे त्यांना त्वरित रोखण्याची आवश्यकता असल्याचेही झेलेन्स्की यांनी नमूद केले.