
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या युद्ध संपवण्याच्या इच्छेवर शंका व्यक्त केल्यानंतर रशियाने युक्रेनवर पुन्हा हल्ला चढवला. रविवारी रात्री रशियाने केलेल्या ड्रोन हल्ल्यात किमान चार लोक ठार झाले. रशियाने कुर्स्क प्रदेशाच्या उर्वरित भागांवर पुन्हा ताबा मिळवल्याचा दावा केल्याच्या काही तासांनंतर हे हल्ले झाले. युक्रेनच्या सैन्याने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अचानक घुसखोरी करून हा प्रदेश ताब्यात घेतला होता. कुर्स्कमधील लढाई अद्याप सुरू असल्याचे सांगून युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी रशियाला इशारा दिला. दरम्यान, ट्रम्प मागील मोठ्या कालावधीपासून रशिया-युक्रेन युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मात्र, शांतता करारात होत नसलेल्या प्रगतीचे खापर त्यांनी पुतीन यांच्यावर फोडले.