
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या वतीने ग्रामीण भागातील शिक्षकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गात महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमधील शिक्षकांनी सहभाग घेतला होता. इतिहास, विज्ञान, संस्कृती आणि कला यांसारख्या विषयांमध्ये ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांची रुची वाढावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या (CSMVS) वतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या शिक्षण वर्गाचे मुख्य उद्दिष्ट हे संग्रहालयात उपलब्ध असणारी माहिती शिक्षकांनी त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी ही होती.
शालेय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (DIET) सहकार्याने, या कार्यक्रमात महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांतील 20 शाळांमधून 35 शिक्षक सहभागी झाले होते. यामध्ये सातारा, यवतमाळ, धुळे, अलिबाग (रायगड), नाशिक, अमरावती, रत्नागिरी, आणि अहिल्यानगर येथील शिक्षकांचा समावेश होता. संवादात्मक कार्यशाळा, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालील सत्रे आणि प्रत्यक्ष क्रियाकलापांच्या माध्यमातून शिक्षकांना संग्रहालयातील वस्तू आणि सांस्कृतिक वारसा स्थळे यांचा शिक्षणात कशाप्रकारे उपयोग करता येईल याचे प्रशिक्षण शिक्षकांना यावेळी देण्यात आले. या प्रशिक्षणाचा भाग म्हणून शिक्षकांनी भाऊ दाजी लाड संग्रहालय, नेहरू विज्ञान केंद्र आणि एलिफंटा लेणी या स्थळांना भेट दिली. हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 शी सुसंगत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संग्रहालयातील अभ्यासाची उत्सुकता, तर्कशुद्ध विचार आणि सांस्कृतिक जागरूकता वाढवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.