गेल्या वर्षी ढेपाळलेल्या रुपयाला नवीन वर्षातही तेज लाभलेले नाही. त्यामुळे देशातील महागाई ‘गगनाला’ भिडली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरगुंडी झाल्यामुळे विमान प्रवास महागणार आहे. देशांतर्गत विमान पंपन्यांचा खर्च वर्षभरात तब्बल 10 टक्क्यांनी वाढला आहे. विमान पंपन्यांना निम्म्याहून अधिक खर्च डॉलरमध्ये करावा लागत आहे. डॉलरसाठी जास्त रुपये मोजावे लागत असल्याने विमान प्रवाशांच्या खिशाला याची झळ बसणार आहे.
रुपयाच्या घसरगुंडीचा लक्षणीय परिणाम हवाई वाहतूक क्षेत्रावर झाला आहे. हिंदुस्थानी विमान कंपन्यांची कमाई रुपयात होते, परंतु 50 टक्क्यांहून अधिक खर्च डॉलरमध्ये करावा लागतो. या खर्चामध्ये लीजवर दिलेल्या विमानांचे भाडे, देखभाल, विमा यांचा समावेश आहे. नजीकच्या काळात रुपयाची घसरण थांबली नाही तर विमान तिकीट दरात मोठी वाढ करावी लागणार आहे. विमान कंपन्यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. हिंदुस्थानात 80 टक्के विमाने लीजवर असून आंतरराष्ट्रीय पातळीवर ही सरासरी 53 टक्के आहे.
विमान कंपन्यांचा खर्च 10 टक्क्यांच्या घरात वाढल्याने पंपन्यांच्या तोटय़ात मोठी वाढ झाली आहे. ‘इक्रा’च्या म्हणण्यानुसार, हिंदुस्थान एव्हिएशन इंडस्ट्रीचा तोटा दोन ते तीन हजार कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.
विमान कंपन्यांच्या 66 टक्के खर्चावर रुपयाच्या घसरणीचा परिणाम झाला आहे. यात इंधनापासून ते कामगारांच्या पगारावरील खर्चाचा समावेश आहे.