![rupee-fall rupee-fall](https://www.saamana.com/wp-content/uploads/2018/10/rupee-fall-696x447.jpg)
रुपयाची घसरण सुरुच आहे. आज अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 44 पैशांनी घसरून 88.94 वर पोहोचला आहे. आतापर्यंतची ही ऐतिहासिक घसरण आहे. या ऐतिहासिक घसरणीनंतर रुपया आशियातील सर्वात खराब कामगिरी करणारे चलन बनले आहे, असे वृत्त ‘ब्लूमबर्ग’ने ब्रोकरेश फर्म नोमुराचा हवाला देत दिले आहे.
रुपया का पडतोय?
हिंदुस्थानी चलनातील घसरणीमागे अनेक कारणे आहेत. यात सर्वात पहिले कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेले टेरिफ वॉर आहे. ट्रम्प यांनी स्टिल आणि अॅल्युमिनियमच्या आयातीवर 25 टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. यामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून याचा दबाव रुपयावरही पडतोय. शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदार सातत्याने विक्री करत असल्याचा फटकाही रुपयाला बसत आहे. यासह आरबीआय परकीच चलनाचा साठा करत असल्याने आगामी काळात रुपया आणखी पडण्याची शक्यता ‘ब्लूमबर्ग’ने वर्तवली आहे.
शेअर बाजारही धडाम
एकीकडे रुपयाची घसरण सुरू असताना दुसरीकडे शेअर बाजारही धडाम झाला आहे. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स तब्बलस 650 अंकांनी गडगडला आणि 77,200 वर पोहोचला. निफ्टीतही मोठी घसरण पहायला मिळाली. निफ्टी 200 अकांनी कोसळून 23,350 वर पोहोचला आहे. सततच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
आयात महागणार
रुपयाची ऐतिहासिक घसरण होत असल्याने आणि रुपया नीचांकी पातळीवर पोहोचल्या हिंदुस्थानसाठी आयात महागणार आहे. परदेशात फिरणे आणि शिक्षण घेणेही महाग होणार आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 50 होते तेव्हा अमेरिकेतील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना 50 रुपयांना 1 डॉलर मिळत होता. आता 1 डॉलरसाठी विद्यार्थ्यांना 87.94 रुपये खर्च करावे लागतील. त्यामुळे शिक्षण शुल्कापासून ते निवास, भोजन आणि इतर गोष्टी महाग होणार आहेत.