अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सातत्याने सुरूच आहे. बुधवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 86.33 रुपयांवर बंद झाला. दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णय घेतले. त्याचे पडसाद जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटत आहेत. त्यामुळे आगामी काळातही रुपयाची घसरण कायम राहण्याची शक्यता आहे.

गेल्या काही महिन्यांपासून रुपयाचे सातत्याने अवमूल्यन सुरू आहे. मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 86.58 रुपयांवर बंद झाला. बुधवारी बाजार उघडताच ही घसरण कायम होती. रुपया 86.56 पर्यंत घसरला. बाजार बंद होताना रुपया किंचित 0.25 पैशांनी सावरला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 86.33 रुपयांवर बंद झाला. डॉलरच्या तुलनेत इतर चलनांचीही घसरण आज पहायला मिळाली.

रुपयाची आणखी घसरण होऊ शकते – रघुराम राजन

आगामी काळात रुपयाची आणखी घसरण होऊ शकते. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत बहुतांशी चलनांचे अवमूल्यन होत आहे. त्यामुळे रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने चलन बाजारात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी मांडले.