44 दिवस 17 तासांत कश्मीर ते कन्याकुमारी धाव, तामसवाडीच्या तरुणाची गिनीज बुकात नोंद

निफाड तालुक्यातील तामसवाडी येथील वैभव शिंदे या 26 वर्षीय तरुणाने 44 दिवस 17 तासांत कश्मीर ते कन्याकुमारी अंतर धावत पूर्ण केले. त्याच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली आहे.

शेतकरी कुटुंबातील वैभव मराठा विद्या प्रसारक संस्थेचा माजी विद्यार्थी आहे. शाळा, महाविद्यालयामध्ये त्याने विविध स्पर्धांमध्ये यश मिळवले. मात्र दुखापत झाल्याने काही काळासाठी तो धावण्यापासून दुरावला होता. महाराष्ट्रातून अद्याप असा विक्रम कोणीही केला नसल्याची माहिती दिल्लीतील प्रशिक्षिका सुफीया खान यांनी त्याला दिली. त्यानंतर डिसेंबर 2021 पासून त्याने नाशिकचे सायकलीस्ट डॉ. महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज तीन तास सराव सुरू केला.

तीन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर 11 नोव्हेंबर 2024 रोजी श्रीनगरच्या लाल चौकातून त्याने मोहिमेला सुरुवात केली. थंडी, ऊन, वाऱयाची तमा न बाळगता त्याने कन्याकुमारीपर्यंतचे 4 हजार 112 किलोमीटर अंतर 44 दिवस 17 तासांत पूर्ण केले. तो दररोज 90 ते 100 किलोमीटर धावत असे. या मोहिमेदरम्यान त्याने 12 पेक्षा जास्त राज्ये, 110 हून अधिक शहरांमधून प्रवास केला. त्याला अनेक शेतकऱयांनी दूध, जेवण देत माणुसकीचे दर्शन घडवले. यापूर्वी हरयाणातील संजय कुमार आणि रतन कुमार या दोघांनी सन 2019 मध्ये 52 दिवस 4 तास 40 मिनिटांत हे अंतर पार केले होते. महिलांमध्ये दिल्लीच्या सुफीया सुफी यांनी 87 दिवसांमध्ये हे अंतर पूर्ण केल्याची नोंद आहे. हे विक्रम वैभवने मोडीत काढल्याने नाशिकचे नाव देशपातळीवर झळकले आहे. मविप्र सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले आहे.