सत्ताधारी भाजपा युतीला महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? हर्षवर्धन सपकाळ यांचा संतप्त सवाल

हास्यकलाकार कुणाल कामराने त्यांच्या कार्यक्रमात कोणाचेही नाव घेतले नाही तरीही ‘चोराच्या मनात चांदणे’ या म्हणीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ती टीका स्वतःवर ओढवून घेत तोडफोड केली. हल्ला करणारे सरकारमधील घटक पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांचा सरकार, संविधान, कायदा व गृहविभागावर विश्वास नाही का, त्यांना कायदा हातात का घेतला. शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी मांडलेला हा उच्छाद पाहून सत्ताधारी पक्षाला महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? असा प्रश्न संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

गांधी भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कुणाल कामरा प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीचा निषेध केला. कुणाल कामरांचा कार्यक्रम ज्या स्टुडिओत झाला तो त्यांचा नाही, या ठिकाणी विविध सांस्कृतीक कार्यक्रम होत असतात, सर्व प्रकारच्या विचारांचे लोक येथे कार्यक्रम करतात. भाजपा नेते व मंत्री आशिष शेलार यांच्या सत्काराचा कार्यक्रमही येथेच झाला. हा स्टुडिओ एका स्वातंत्र्य सैनिकाचा आहे, देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांनी लग्न केले नाही, स्वातंत्र्यानंतर त्यांनी लग्न केले. हा स्टुडिओ नफेखोरी न करता उपलब्ध करुन दिला जातो. अनेक कलाकारांनी या व्यासपीठावर आपली कला सादर केली आहे, त्या सांस्कृतीक केंद्रावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला तसेच एका स्वातंत्र्य सैनिकाच्या संपत्तीवरचा हा हल्ला आहे. हा प्रश्न केवळ अभिव्यक्तीचा नाही तर लोकांनी कसे जगावे याचाही आहे. या तोडफोडीत स्टुडिओचे 25 लाखांचे नुकसान झाले आहे ते सरकारने भरून द्यावे. हा सर्व प्रकार होत असताना पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली हे अतिशय गंभीर आहे.

नागपूरच्या दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तशीच वसुली एकानाथ शिंदे व त्यांच्या दंगेखोरांकडून सरकार वसूल करणार का, याचे उत्तर द्यावे. नागपूर दंगलीतील आरोपी फहीम खानच्या घरावर सरकारने बुलडोझर चालवला आहे. फडणवीसांच्या मंत्रीमंडळातील मंत्री नितेश राणे यांनी चिथावणीखोर, भडकाऊ विधाने केली आहेत मग फडणवीस नितेश राणेंच्या घरावर बुलडोझर चालवणार का, असा प्रश्नही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.