बदलापूरच्या आंदोलनाला राजकीय म्हणणारे राज्यकर्ते मूर्ख आणि नालायक! मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल

दोन चिमुकल्यांसाठी न्याय मागणार्‍या बदलापूरच्या आंदोलनाला राजकीय म्हणणारे राज्यकर्ते मूर्ख आणि नालायक आहेत, असा जोरदार हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला. कोणतेही आंदोलन झाले की ते राजकीय असल्याचे ठरवून मोकळे होता. त्या चिमुकल्या देशाच्या आहेत, देशभरात त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त होत असताना राज्यकर्त्यांनी अशी राजकीय भाषा वापरणे लाजिरवाणे आहे. एवढा द्वेषाने पछाडलेला गृहमंत्री आतापर्यंत पाहिला नाही, असा टोलाही जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. बदलापूर येथे चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जे उग्र आंदोलन झाले ते राजकीय होते, असा आरोप मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यावर जरांगे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. असा आरोप करणे म्हणजे रडकेपणा आहे. त्यापेक्षा सत्तेला लाथ मारायची धमक दाखवायला हवी. चिमुकलीसाठी न्याय मागणार्‍या उत्स्फूर्त आंदोलनाला राजकीय म्हणणारे राज्यकर्ते मूर्ख आणि नालायक आहेत, अशा शब्दांत त्यांनी फटकारले. अशा बेमुर्वत राजकारण्यांना जनताच धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी दिला. ज्यांनी लोकांचे रक्षण करायचे ते गृहखातेच द्वेषाने पछाडले आहे. एवढा द्वेषाने पछाडलेला गृहमंत्री आतापर्यंत पाहिला नाही, असेही ते म्हणाले.

29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलली
आगामी विधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी 29 ऑगस्ट रोजी राज्यातील मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आली होती. राज्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नसतानाही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. 29 तारखेला बैठक घेतली तर सरकारला आपले डावपेच कळतील. त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यानंतरच मराठा समाजाची बैठक घेण्यात येईल, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.