प्रचारासाठी वाहनांचा लवाजमा; आरटीओ तिजोरीत 85 हजार जमा!

सिंधुदुर्ग जिह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांनी प्रचारासाठी प्रचारथासह वेगवेगळ्या वाहनांची परवानगी आरटीओ कार्यालयातून घेतली होती. यातून आरटीओ कार्यालयाला तब्बल 85 हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

उमेदवार आपली ओळख, आपला अजेंडा अधिक प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचविण्याच्या अनुषंगाने वाहनावर वेगवेगळ्या प्रचाररथ तयार करत असतात. तसेच गावागावांत प्रचारासाठी विविध वाहने फिरत असतात. परंतु प्रचारासाठी वापरण्यात येणारे वाहन सुस्थितीत असणे अपेक्षित आहे. याची तपासणी करण्याचे काम उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने केले जाते. निवडणुकीत प्रचारासाठी तब्बल 62 वाहनांची परवानगी घेतली. यातून कार्यालयाला 85 हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. शहरामध्ये प्रचार करण्यासाठी रिक्षाला प्राधान्य दिले जात होते. तसेच रॅली किंवा शक्तिप्रदर्शन करण्यासाठी ट्रकला, लहान वाहने यांना मागणी होती.

प्रचार वाहनांची कागदपत्र तपासून परवानगी दिली जाते. या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी 62 वाहनांची परवानगी घेतली होती. यातून कार्यालयाला 85 हजारांचा महसूल प्राप्त झाला आहे.

n नंदकिशोर काळे, सहाय्यक परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग

परिवहनला 85 हजारांचे उत्पन्न

प्रचाररथासाठी व गावागावांत फिरण्यासाठी उमेदवारांनी 62 वाहनांची परवानगी घेतली. यातून 85 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. ग्रामीण भागासह शहरी भागात वाहनांवर एलईडी स्क्रीन लावून प्रचार करण्यात आला. या एलईडीवर आपण कोणती कामे केली व निवडून आल्यावर कोणती कामे करणार आहोत हे दाखवत होते.

मान वळेल तिकडे प्रचाररथ

जिह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात आली. नियोजित गावासाठी प्रचाराची परवानगी देण्यात आली; परंतु काही प्रचाररथ चालकांनी मान वळेल तिकडे प्रचाररथ फिरविले. उमेदवारांचा अजेंडा प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंदाच्या निवडणुकीत अद्ययावत प्रचाररथाचा वापर करण्यात आला होता. मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आकर्षक एलईडी लावल्या होत्या.

अशी आहे शुल्क आकारणी

प्रचारासाठी फिरणाऱ्या वाहनांची कागदपत्रे व वाहनांची तपासणी करून परवानगी देण्यात येते. प्रत्येक वाहनाचे दर वेगवेगळे असतात. रिक्षासाठी 500 रुपये, तर लहान वाहनांसाठी 1000 रुपये तर मोठया वाहनासाठी 2 हजार रुपयापर्यंतचे शुल्क आकारण्यात येते.