आरटीईची प्रवेश प्रक्रिया आजपासून

RTE

आरटीईअंतर्गत दुर्बल, वंचित घटकांतील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळांमध्ये मंगळवार, 14 जानेवारीपासून 25 टक्के ऑनलाइन प्रवेश दिला जाणार आहे. मुंबईतील 327 शाळांमध्ये 6 हजार 53 जागा उपलब्ध झाल्या असून या मुलांना इयत्ता आठवीपर्यंत मोफत शिक्षण असेल. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ‘(आरटीई) अंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या 25 टक्के प्रवेश प्रक्रियेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. या प्रक्रियेंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. बालकांच्या पालकांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यासाठी 14 जानेवारी 2025 ते दिनांक 27 जानेवारी 2025 या कालावधीपर्यंत सुविधा student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25 टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता इच्छुक पालकांनी या कालावधीत आपल्या पाल्यांचे अर्ज भरावेत, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.