
गेल्या महिन्याभरापासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला असून यावरून नागपूर दंगली ही घडली होती. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी भाजपचे कान टोचत म्हटलं होतं की,” औरंगजेबाचा मुद्दा सध्याच्या घडीला संयुक्तिक नाही. संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही.” याच मुद्यावरून आता पुन्हा एकदा संघाने भाजपचे कान टोचले आहेत. या मुद्यावर बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी म्हणाले आहेत की, औरंगजेबाचा विषय अनावश्यक आहे.
माध्यमांशी संवाद साधताना भैय्याजी जोशी म्हणाले की, “औरंगजेबाचा विषय अनावश्यक आहे. त्याचा मृत्यू इथे झाला तर त्याची कबर इथेच असणार. काही लोकांची श्रद्धा असेल तर ते तिथे जातील. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. त्यांनी तर अफजलखानाचीही कबर किल्ल्यावर बनवली आहे. हे हिंदुस्थानच्या उदारतेचं, सर्वसमावेशकतेचं प्रतीक आहे.”
संघाने भाजपचे कान टोचले… औरंगजेबाचा मुद्दा सध्याच्या घडीला संयुक्तिक नाही