Pahalgam Terror Attack – अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकवणं हा आपला धर्म; पहलगाम हल्ल्यावर मोहन भागवत यांचं विधान

अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकवणं हा आपला धर्म, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर संताप व्यक्त करत ते असं म्हणाले आहेत.

मोहन भागवत म्हणाले की, “रावणाचा वध त्याच्या कल्याणासाठी झाला. देवाने त्याला मारले. ही हिंसा नाही तर अहिंसा आहे. अहिंसा हा आपला धर्म आहे, पण अत्याचार करणाऱ्यांना धर्म शिकवणे ही अहिंसा आहे. आपण कधीही आपल्या शेजाऱ्यांना नुकसान पोहोचवत नाही. यानंतरही जर कोणी चुकीचा मार्ग स्वीकारला तर, प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे. राजा आपले काम करेल.”

भागवत म्हणाले, “हा हल्ला म्हणजे धर्म आणि अधर्म यांच्यातील लढाई आहे. लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारण्यात आले आणि त्यांना मारण्यात आले. हिंदू असे कधीच करणार नाहीत. हा आपला स्वभाव नाही. द्वेष आणि शत्रुत्व आपल्या संस्कृतीत नाही, पण शांतपणे नुकसान सहन करणे हे देखील आपल्या संस्कृतीत नाही. आपल्या हृदयात वेदना आणि राग आहे. वाईटाचा नाश करण्यासाठी आपल्याला आपली ताकद दाखवावी लागेल.” ते म्हणाले, “रावणाने आपला विचार बदलण्यास नकार दिल्याने त्याचाही वध करण्यात आला होता. कोणताही पर्याय उरला नव्हता. रामाने त्याला मारले, पण त्यालाही सुधारण्याची संधी देण्यात आली होती.”