आर आर पाटील यांनी केसाने गळा कापला, अजित पवार यांचे वादग्रस्त विधान

माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला, तेव्हा आर आर पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले होते आणि माझा केसाने गळा कापला असे वादग्रस्त विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच आबा पाटील गुटखा आणि तंबाखु खायचे त्यांना मी रोखायचो असेही अजित पवार म्हणाले.

सांगलीत एका सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की त्यावेळी माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला. विरोधकांनी आकडा एवढा मोठा सांगितला की लोकांनाही विश्वास वाटायचा की खरंच एवढा मोठा घोटाळा झाला असावा. या प्रकरणाची एक फाईल झाली. ही फाईल गृहखात्याकडे गेली आणि आबा पाटील यांनी शेरा लिहिला की या प्रकरणाची ओपन इन्क्वायरी करावी आणि सही केली. हा प्रकार म्हणजे केसाने गळा कापण्यासारखा आहे. 2014 च्या निवडणुकीपुर्वी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा आम्ही पाठिंबा काढला आणि राष्ट्रपती राजवट लागली. तेव्हा राज्यपालांनी या फाईलवर सही करण्यास नकार दिला आणि पुढील जे सरकार येईल ते कारवाई करतील असा पवित्रा घेतला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले त्यांनी मला घरी बोलावलं आणि ही फाईल दाखवली. त्यावर खरंच आबा पाटील यांनी सही केली होती असे अजित पवार म्हणाले.

तंबाखु खाणारे आबा पाटील

आबा पाटील यांना तंबाखु आणि गुटखा खाण्याची सवय होती असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच आपण त्यांना सतत तंबाखु खाऊ नका असा सल्ला द्यायचो पण त्यांनी ऐकले नाही असेही अजित पवार म्हणाले.