
रेल्वे प्रवासात हरवलेला प्रवाशांचा मोबाईल शोधून देण्याकामी आता रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) तत्पर राहणार आहे. दूरसंचार विभागाच्या सीईआयआर पोर्टलच्या मदतीने आरपीएफचे जवान प्रवाशांचा हरवलेला मोबाईल शोधून देणार आहेत. लोकल ट्रेन व एक्स्प्रेसमध्ये मोबाईल हरवण्याचे वा चोरी होण्याचे प्रकार वारंवार घडतात. गायब झालेल्या मोबाईल पह्नचा शोध चटकन लागत नाही. ही अडचण लक्षात घेत प्रवाशांचा मोबाईल शोधून देण्यासाठी आरपीएफने दूरसंचार विभागाशी हातमिळवणी केली आहे. दूरसंचार विभागाच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटेटी रजिस्टर (सीईआयआर) पोर्टलसोबत यशस्वी भागीदारी केली आहे. नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वेमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रमाला यश आल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने संपूर्ण देशभर आरपीएफ आणि सीईआयआर पोर्टलमार्फत मोबाईल शोधमोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.