IPL 2025 – जिंकणारा सामना गमावण्याची राजस्थानची हारट्रिक, अखेर बंगळुरूचा घरच्या मैदानावर विजय; राजस्थानचे आव्हान जवळजवळ संपुष्टात

राजस्थानला 12 चेंडूंत अवघ्या 18 धावांची गरज होती. बंगळुरूला सलग चौथ्यांदा आपल्या घरच्या मैदानावर माती खावी लागणार, असे चित्र ध्रुव जुरेलने उभारले होते. पण जॉश हेझलवूडने आपल्या शेवटच्या षटकांत केवळ एक धावच दिली नाहीतर जुरेल आणि आर्चर यांची विकेट काढत राजस्थानच्या तोंडात असलेला विजयाचा घास बंगळुरूला हिसकावून दिला. हेझलवूडच्या भन्नाट माऱयाने बंगळुरूला आपल्या घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवून दिला. आजच्या पराभवामुळे राजस्थानचे आयपीएलमधील आव्हान जवळजवळ संपुष्टांत आले आहे.

विजयासाठी 206 धावांचा पाठलाग करणाऱया राजस्थानला यशस्वी जैसवालने 19 चेंडूंत 49 धावांची खेळी करत खणखणीत सुरूवात करून दिली. त्यानंतर नितीश राणा, रियान पराग यांनी उपयुक्त खेळ्या केल्या आणि ध्रुक जुरेलने 47 धाका ठोकत संघाला विजयाच्या दारात पोहोचवले होते. पण शेवटच्या क्षणी राजस्थान पुन्हा एकदा अपयशी ठरली. 12 चेंडूंत 18 धावा असताना अवघ्या 3 धावांत 4 विकेट गमावत राजस्थानने जिंकलेला सामना गमावला. बंगळुरूने 11 धावांच्या विजयासह आपल्या घरच्या मैदानावर पहिला विजय नोंदवला. 33 धावांत 4 विकेट टिपणारा हेझलवूड विजयाचा शिल्पकार ठरला.

राजस्थानचे गोलंदाज अपयशी

फिल सॉल्ट आणि किराट कोहलीची जोडी मैदानात उतरली, पण गेल्या दोन डावांत या जोडीला दमदार सलामी देता आली नव्हती. मात्र आज सॉल्टने 26 धावा करताना 61 धावांची सलामी दिली. सॉल्टला या डावातही मोठी खेळी करता आली नसली तरी कोहलीने मात्र आपले सातत्य कायम राखले. राजस्थानच्या गोलंदाजांना आजही फारसे यश लाभले नाही. कोहली-पडिक्कलने राजस्थानच्या गोलंदाजांचा पुरेपूर समाचार घेत संघाला 200 धावांच्या दिशेने नेले.

कोहलीचा कारनामा

विराट कोहलीचा आयपीएलमधला फॉर्म दिवसेंदिवस बहरत चालला आहे. गेल्या चार सामन्यातील तिसरे अर्धशतक झळकावताना कोहलीने राजस्थानच्या गोलंदाजीला चांगलेच चोपून काढले. त्याने फिल सॉल्टसह 61 धावांची तर देवदत्त पडिक्कलबरोबर 95 धाकांची भागी रचत बंगळुरूच्या डावाला द्विशतकाच्या दिशेने नेले. विराटने स्पर्धेतील आपले पाचवे अर्धशतक साजरे करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. आता विराटने या मोसमात 9 सामन्यात 392 धावा केल्या असून त्याच्यापुढे फक्त साई सुदर्शन (417)फलंदाज आहे. आजच्या खेळीमुळे विराट कोहली लवकरच ऑरेंज कॅपवरही आपले नाव लिहू शकतो.