रोखठोक – व्यापाऱ्यांचे राज्य; महाराष्ट्राचे शौर्य! देश कोठे निघालाय!

ब्रिटिशांचे राज्य हे व्यापाऱ्यांचे राज्य होते. ते गेले. गुजरातच्या एका ‘बनिया’ने त्यांना ‘चले जाव’चा आदेश दिला. त्याच गुजरातमधल्या व्यापाऱ्यांचे राज्य पुन्हा देशावर आले. ईडी व सीबीआय ही त्यांची तागडी व अवजारे आहेत. व्यापाऱ्यांचे राज्य येते तेव्हा शौर्य व स्वाभिमानाचा ऱ्हास होतो. महाराष्ट्राला आता आपला बाणा दाखवावा लागेल!

भारतीय जनता पक्षाचे लोक हे व्यापारी आहेत. व्यापारी हा धाडसी नसतो. पंतप्रधान मोदी एकदा म्हणाले होते, “गुजरातचे व्यापारी हे आपल्या जवानांपेक्षा जास्त धाडसी असतात. ते जास्त धोका पत्करतात.” मोदी हे ज्या राज्यातून येतात त्या राज्यातील किती टक्के लोक भारताच्या सैन्यदलात आहेत. शेअर बाजार, जमीनजुमला, धंदा यात धोका पत्करणे वेगळे व प्रत्यक्ष रणभूमीवर देशासाठी जोखीम पत्करणे वेगळे. “हातात तलवार आणि कुडीत प्राण आहे तोपर्यंत झांसी माझी आहे,” असे आत्मबलिदान करणारे लोक बहुसंख्येने महाराष्ट्रात जन्माला आले. भारतीय जनता पक्षाचा सध्याचा चेहरा गुजराती वळणाचा आहे. म्हणजे व्यापारी आहे. व्यापारी देशासाठी कधीच बलिदान करीत नाही. तो पैशांची ‘रिस्क’ घेतो. म्हणजे जुगाराप्रमाणे व्यवहार करतो. मोदी-शहा हे पूर्णपणे व्यापारी आहेत व त्यांनी सभोवती व्यापारी मंडळ निर्माण केले. महात्मा गांधी हे बनिया होते, पण ते स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. गुजरातमध्ये ते जन्माला आले, पण जसे त्यांना कळू लागले तसे ते सावध झाले. त्यांनी गुजरात सोडण्याचा निर्णय घेतला. “गुजरातमधील व्यापार मंडळात राहून मला स्वातंत्र्याचा विचार व लढा करता येणार नाही,” असे त्यांनी जाहीर केले व त्यांनी गुजरात सोडले ते कायमचेच.

व्यापाऱ्यांचे राज्य!

देशावर सध्या गुजरात्यांचे म्हणजे व्यापाऱ्यांचे राज्य आहे ते पैशाच्या आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या जोरावर, पण सोमवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार भाषण केले व गुजराती व्यापार मंडळाचा पर्दाफाश केला तेव्हा मोदी-शहा आतून लटपटले आहेत हे स्पष्ट दिसले. युद्धाशी सामना करण्याचे धैर्य या लोकांत नाही. मोदी मणिपुरात गेले नाहीत. मोदी कश्मीरात जाणे टाळतात. चीनने लडाखची भूमी ताब्यात घेतली. मोदी चीनला डोळय़ास डोळा भिडवून दम देऊ शकत नाहीत. मोदी यापुढे राहुल गांधींपुढेही टिकणार नाहीत. मराठय़ांचे शौर्य हे शंभर नंबरी आहे. राणोजी शिंदे यांचे ज्येष्ठ पुत्र जयाप्पा शिंदे यांचा खून विजे सिंग याने मारेकरी घालून केला. हा विश्वासघात होता. थोरल्या बंधूंचा हृदयद्रावक शेवट दत्ताजी शिंद्याला कळताच तो धावत आला आणि शोक करू लागला. सैन्यात एकच गोंधळ उडाला. जयाप्पा मोठय़ा हिमतीचा होता. जखमी होऊन तो पडला होता. डोळे उघडून पाहतो तो धाकटा बंधू दत्ताजी शोक करीत असलेला त्याला दिसला. तेव्हा या शूर वीराने त्याला धीर दिला – “वैरी युद्धास आला आणि तू रांडेसारखा रडतोस? हे क्षात्र धर्मास शोभणारे नाही. माझी चिंता करू नका. तुम्ही रणावर जाऊन शत्रूचा पराभव करावा.” या भाषणाने दत्ताजीला ईर्षा चढली व त्याने शत्रूशी लढाई करून विजे सिंगाचा पराभव केला. विजय प्राप्त करून दत्ताजी भावापाशी आला, तो जयाप्पाचे निधन झाले होते. असे दत्ताजी व जयाप्पा मराठय़ांच्या इतिहासात पानोपानी मिळतील. वीर सावरकरांना दोन जन्मठेपेंची शिक्षा ठोठावण्यात आली. सावरकर विचलित न होता ब्रिटिश न्यायमूर्तींना उद्देशून म्हणाले, “तुम्ही जी परमावधीची शिक्षा ठोठावली ती निमूटपणे सोसण्याला मी तयार आहे. आमची प्रिय मातृभूमी शाश्वतीच्या विजयाप्रत पोहोचवायची ती हालअपेष्टा व स्वार्थत्याग या मार्गानेच पोहोचेल अशी माझी श्रद्धा.” वीर सावरकरांसारखे योद्धे व्यापारी नव्हते व डरपोक नव्हते.

पानिपतावर

पानिपताच्या युद्धात मराठय़ांची एक सबंध पिढीच्या पिढी कापली गेली. चांदी, सोने, हिरे, माणके, पाचशे हत्ती, पन्नास हजार घोडे, एक हजार उंट अशी पुष्कळ संपत्ती मराठय़ांच्या छावणीतून अब्दालीस मिळाली, पण त्या पानिपतातूनही मराठे सावरले व त्यांनी पुढे अटकेपार झेंडे फडकवले. देशासाठी मरणे व लढणे हाच मराठी माणसांचा उद्योग. तो आजही सुरूच आहे. मोदी व शहा या राजकीय व्यापाऱ्यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांचे पक्ष व चिन्ह विश्वासघाताने काढले. त्यांना वाटले हे दोन्ही नेते हतबल होतील व शरण येतील. मोदी-शहांच्या या मनसुब्यांवर ठाकरे-पवारांनी पाणी ओतले. ‘जुने जाऊ द्या मरणा लागुनी’ या उक्तीप्रमाणे नवे चिन्ह, पक्ष घेऊन या दोन्ही नेत्यांनी अक्षरश: युद्ध केले व महाराष्ट्रात मोदी-शहांचा पराभव केला. 1975 मध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली. त्याचे रडगाणे मोदी-शहा आजही गात आहेत. छाती पिटत आहेत, पण उघडपणे आणीबाणी जाहीर करण्याची हिंमत इंदिरा गांधी यांनी तेव्हा दाखवली, पण सध्याचा भाजप पन्नास वर्षांपूर्वीचे रडणे विसरत नाही हा त्यांच्या मनाचा कमजोरपणा. 25 जून रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावरून भारतीय सैन्याला विद्रोह करण्याचे आवाहन केले गेले. भारतात अराजक माजवण्याची ही सुरुवात झाली. पोलिसांनी सरकारचे आदेश पाळू नयेत असे विरोधी नेते जाहीरपणे बोलू लागले. ही देशाविरुद्ध उघड बंडाची चिथावणी होती. याचा गैरफायदा देशाचे परकीय शत्रू घेण्याची भीती होती. त्यामुळे इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा करण्याची हिंमत दाखवली. त्या आणीबाणीस खुला पाठिंबा देण्याची हिंमत तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवली. मोदी व शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरून आज मते मागतात, पण ज्या आणीबाणीच्या नावाने मोदी-शहा आज छाती पिटत आहेत त्या आणीबाणीचे समर्थक बाळासाहेब ठाकरे होते.

मोदी का घाबरले?

या वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांत एक झाले. मोदी व शहांसमोर बहुसंख्य खासदारांनी त्यांच्या भाषणात निर्भयपणे सांगितले, ‘ईडी आणि सीबीआय हीच तुमची हत्यारे आहेत. ती नसतील तर तुमच्यात दम नाही. तुम्ही डरपोक शिरोमणी आहात.’ हे खरेच आहे. लोकसभेत प. बंगालच्या महुआ मोईत्रा बोलायला उभ्या राहिल्या तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी सभागृहातून पळ काढला. मोदी यांना उद्देशून महुआ म्हणाल्या, “मि. मोदी, थांबा. माझे भाषण ऐकून जा. माझ्या कृष्णनगर मतदारसंघात तुम्ही दोन वेळा आलात, पण मी विजयी झाले. कृष्णनगरला आपल्याला भेटता आले नाही. तुम्ही माझे भाषण ऐकून जा.” पण श्रीमती मोईत्रा यांचे भाषण ऐकण्याची हिंमत पंतप्रधान मोदी दाखवू शकले नाहीत. कारण त्यांचे सरकार कुबड्यांवरचे आहे. तसे त्यांचे शौर्यही ईडी व सीबीआयच्या कुबड्यांवरचे आहे. मोदी-शहांच्या हाती ईडी, सीबीआय नसेल तर ते काहीच करू शकणार नाहीत. शौर्य वगैरे तर पुढचा विषय. भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकला. दिल्लीत मोदींच्या निवासस्थानी या संघाला आमंत्रित केले. तेव्हा मागच्या रांगेत अमित शहा यांचे पुत्र जय शहा दिसले. भारतीय क्रिकेटची सूत्रे सध्या अमित शहांच्या पुत्राकडे आहेत व याच काळात क्रिकेटचा सर्वाधिक व्यापार व जुगार झाला. क्रिकेट संघाचा सत्कार करताना पंतप्रधान मोदी यांचे अवसान असे की, जणू जिंकण्याचा गुरुमंत्र त्यांनीच दिला. तिकडे लडाखची भूमी चीनने ताब्यात घेतली आहे. त्यामुळे विजयाचे नगारे तेथे वाजवून चिन्यांना हाकलायला हवे, पण लडाख व चीनच्या बाबतीत ठणठण गोपाला. महाराष्ट्राने या वेळी शौर्य दाखवले व मोदींचे बहुमत रोखले. महाराष्ट्र हे शूरांचे राज्य. गुजरातच्या व्यापारी राज्यकर्त्यांनी येथेही दलाली व डरपोकपणाचे बीज टाकले. तरीही महाराष्ट्र ताठ उभा आहे. बंड पुकारणारा महाराष्ट्र देश आहे हे दिल्लीने विसरू नये. 22 ऑक्टोबर 1879 रोजी पुण्याच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात वासुदेव बळवंतांचा खटला उभा राहिला तेव्हा वासुदेवांनी जे उद्गार काढले तेच मराठी माणसांचा राष्ट्राभिमान व शौर्य आहे. वासुदेव म्हणतात, “ज्या भूमीच्या पोटी मी जन्मलो तिच्याच पोटी ही सारी लेकरे झाली. त्यांनी उपाशी मरावे आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरीत राहावे, हे मला पाहावले नाही आणि म्हणूनच मी ब्रिटिश सरकारविरुद्ध बंड पुकारले.” असे निर्भयपणे त्यांनी कोर्टाला सांगितले व आपल्या उज्ज्वल देशभक्तीची ग्वाही दिली!

…तर मोदी-शहा व त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीने हे लक्षात घ्यावे की, “हाच महाराष्ट्र आहे!”

twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]