रोखठोक – वाराणशीत मोदींची ‘काशी’, गंगा विष पचवून वाहते आहे!

गंगा मातेने नरेंद्र मोदी यांना दत्तक घेतले त्या काशीत दोन दिवस होतो. मोदी हे निवडणुकीत जेमतेम बचावले. काशीत त्यांच्याविषयी रोष आहे. वाराणशीची सर्व आर्थिक सूत्रे गुजरात्यांच्या हाती आहेत व काशीच्या जनतेच्या हाती काहीच उरले नाही. गंगा शुद्धीकरणावर साधारण 22 हजार कोटी खर्च झाले. पण गंगा सर्व विष पोटात घेऊन वाहते आहे. खरी काशी नगरी, जुनी मंदिरे यावर बुलडोझर फिरले, पण काशी नगरी विकासापासून लांबच आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक पंतप्रधान जिंकले, मोदी हरले.

वाराणशीतून वाहणाऱ्या गंगा नदीने आपल्याला दत्तक घेतले आहे, ‘माँ गंगाने मुझे गोद लिया है!’ असे आपले पंतप्रधान मोदी सांगतात, त्या गंगेच्या घाटावर दोन दिवस होतो व गंगेने दत्तक न घेतलेले हजारो भाविक गंगास्नान करून तेथे पवित्र होताना पाहिले. गंगा ही कुणा एकाची संपत्ती नाही, ती सगळ्यांची आहे हे मी वाराणशीत अनुभवले. श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येक जातीधर्माच्या श्रद्धाळूंची आहे. मोदी निवडणुकीत आले व गेले. वाराणशी हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ. 2014 ते 2022 अशा तीन निवडणुका ते लढले. वाराणशीत निवडणूक लढल्याने 80 लोकसभा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशात मोठे समर्थन मिळेल व काशीमुळे हिंदूंचा नेता अशी प्रतिमा उजळून निघेल असे मोदींना वाटले. पण 2014 व 2019 साली जे झाले ते 2024 ला झाले नाही व माँ गंगाने आपल्या दत्तक पुत्रास निराश केले. वाराणशी लोकसभा मतदारसंघात मोदी यांचा विजय झाला, पण ते जेमतेम काठावर जिंकले. मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे अजय राय यांनी 4,60,457 मते घेतली. मोदी वाराणशीत बच कर निकले, असे श्री. राहुल गांधी म्हणतात. मोदी या वेळी जिंकणे शक्यच नव्हते. पहिल्या चार फेऱ्यांत ते मागेच पडले. प्रशासनाच्या मदतीने पंतप्रधान जिंकले, पण मोदी हरले असे सांगणारे लोक वाराणशीत भेटले. वाराणशी हे काशी विश्वेश्वराचेच आहे, ते मोदींचे नाही. 2029 ला मोदी वाराणशीतून लढण्याचे धाडस दाखवणार नाहीत.

मोदींची काशी

मी वाराणशीत याआधी गेलो, पण पंतप्रधान मोदी नेतृत्व करीत असलेल्या वाराणशीत नवे काय घडले? विकास झाला काय? या प्रश्नांची उत्तरे नकारात्मक आहेत. श्री. मोदी यांच्या अंगात नाना कळा आहेत, पण त्या कळांचा वाराणशीला काहीच फायदा झाला नाही. वाराणशीच्या विमानतळाचा चेहरा बदलला व विमानतळापासून प्रत्यक्ष वाराणशी शहरापर्यंत एका पुलाचे निर्माण झाले. त्यामुळे ट्राफिकशिवाय वाराणशीला पोहोचता येते. प्रत्यक्ष काशीत मुख्य मंदिरासाठी कारिडॉर उभे केले व त्यासाठी शेकडो पुरातन मंदिरे व जुन्या घरांवर बुलडोझर फिरवण्यात आले. अनेक प्राचीन मंदिरांवर बुलडोझर फिरवताना स्थानिकांनी विरोध केला तेव्हा ही मंदिरे पाडण्यासाठी सर्व यंत्रसामग्री गुजरातमधून मागवण्यात आली. मंदिरांवर बुलडोझर फिरवले व त्या मंदिरातील अनेक प्राचीन मूर्तींचे काय झाले, त्या प्राचीन मूर्ती नक्की कोठे गेल्या याचा शोध आजही लागला नाही. ही सर्व मंदिरे व त्यातील मूर्ती काशीच्या संस्कृतीशी एका आध्यात्मिक नात्याने जोडल्या होत्या. सरस्वतीपासून लक्ष्मीपर्यंत अनेक मूर्ती या पडझडीत अदृश्य झाल्या. स्थानिक लोक सांगतात, “ढिगारे उचलण्यासाठी स्थानिक वाहतूकदार तयार नव्हते. तेव्हा ढिगारे उचलण्यासाठी गुजरातचे वाहतूक ठेकेदार आणले. त्या ढिगाऱ्यांतून या सर्व प्राचीन मूर्ती गेल्या.” त्या मूर्तींचे स्मगलिंग झाले असावे अशी शंका येथील स्थानिकांना आहे. मोदी यांच्या दहा वर्षांच्या काळात वाराणशीत नवे काहीच घडले नाही. 7 तारखेला सकाळी तासभर पाऊस पडला व त्या एका तासाच्या पावसाने पंतप्रधान मोदींचे वाराणशी तुंबले व रस्ते, गल्ल्यांत गुडघाभर पाणी झाले. ते पुढचे आठ तास तसेच राहिले. दहा वर्षांत वाराणशीतले रस्ते, गल्ल्या त्याच राहिल्या. नवे उद्योग नाहीत. उलट मंदिरे उद्ध्वस्त केल्याने एका वर्गाचा होता तो रोजगार गेला. पुन्हा वाराणशीतल्या प्रत्येक कामाचा ठेका आता गुजराती लोकांनाच दिला जातो. गंगेतील बोटींचे काँट्रक्ट, रस्ते, पर्यटनासंदर्भातील कामे फक्त गुजराती लोकांनाच दिली जातात. स्थानिकांना जे होते तेही मिळायचे बंद झाले. मोदी काळात वाराणशीच्या सर्व आर्थिक नाड्या गुजरात्यांच्या हाती गेल्या व त्या संतापाचा उद्रेक 2024 च्या लोकसभा निवडणुकीत झाला. पंतप्रधान मोदी थोडक्यात बचावले, ते हरणारच होते हे आता वाराणशीचे लोक उघडपणे बोलतात.

सर्वत्र भ्रष्टाचार

मोदी काळात वाराणशीत भ्रष्टाचाराची गंगा जास्त वाहू लागली. वाराणशीला जपानी शहर ‘क्येटो’ करण्याची घोषणा मोदींनी केली होती, पण क्येटो झालेच नाही. वाराणशीचे अहमदाबाद नक्कीच झाले. क्येटोप्रमाणे स्मार्ट सिटीत वाराणशीचे रूपांतर करायचे म्हणून जपानच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत जे भव्य उत्सव गंगाकिनारी साजरे केले त्याचे काय झाले? गंगा शुद्धीकरणासाठी केलेल्या सर्व घोषणा गंगेतच वाहून गेल्या. ‘नमामि गंगे’ या गंगा शुद्धीकरण प्रकल्पावर गेल्या 10 वर्षांत 22 हजार कोटी रुपये खर्च झाले, पण गंगेचे पाच टक्के पाणीही शुद्ध झाले नाही व 22 हजार कोटी रुपये मर्जीतल्या ठेकेदारांच्या खिशात गेले. भारतीय करदात्यांच्या खिशातला हा पैसा असा वाहून गेला. माता गंगेशी केलेली ही सरळ सरळ बेइमानीच आहे. वाराणशी परिसरातील आठ गावे पंतप्रधान मोदी यांनी दत्तक घेतली, पण या सर्व गावांत आजही अंधकार आहे. शाळा, रस्ते, इस्पितळे यांपैकी काहीच झाले नाही. मग वाराणशीत येऊन मोदींनी केले काय? वाराणशीच्या जनतेला मिळाले काय? गंगेच्या प्रवाहातील गढूळपणा वाढला व त्यात राजकीय पापांची प्रेते वाहत आहेत इतकेच!

गंगा मातेचा जुमला

पंतप्रधान मोदी यांनी हिंदूंचे पवित्र स्थान काशी व माता गंगेचाही ‘जुमला’च केला. “माँ गंगा ने मुझे बुलाया है!” असे मोदी यांनी 2014 साली सांगितले व “माँ गंगा ने मुझे गोद लिया है!” असे त्यांनी 2024 ला जाहीर केले, पण 2024 ला माँ गंगाने त्यांना नाकारले व काशी सोडण्याचा इशारा दिला तो लोकसभा निकालाने. भाजपचा आणि हिंदुत्वाचा सगळ्यात मोठा ब्राण्ड असलेले मोदी मतमोजणी सुरू असताना पहिल्या चार-पाच फेऱ्यांत पिछाडीवर पडले. त्यानंतर येथील मतमोजणीच थांबवली. बराच काळ मतमोजणी केंद्रावरची लाईट गेली व एकच गोंधळ उडाला. मोदी हरत आहेत हे चित्र निर्माण झाले. प्रशासन दबावाखाली आले. शेवटी मोदींना दीड लाखाच्या फरकाने विजयी घोषित केले. काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष अजय राय यांनी मोदी यांच्या विरुद्ध लढवलेली ही निवडणूक गाजली. मोदी एकतर्फी जिंकतील व वाराणशी मोदींचेच ही अंधश्रद्धा अजय राय यांनी मोडून काढली. भाजपचे सर्व खेळ उलटवून राय हे शेवटपर्यंत मैदानात टिकून राहिले. श्री. अजय राय यांच्याशी वाराणशीतील त्यांच्या निवासस्थानी भेट झाली. काशीच्या संस्कारी पद्धतीने त्यांनी स्वागत केले. खास ‘काशी चाट’ खाऊ घातले. कपाळावर मंत्रोच्चारांत चंदनाचा टिळा लावला.

“हा आमच्या काशीचा संस्कार आहे. तो कुणालाच पुसता येणार नाही,” असे श्री. राय म्हणाले.

“निवडणूक जोरदार झाली, पण तुम्ही स्वतःच ढिले पडलात. नाहीतर मोदी यांच्याबाबतीत वेगळा निकाल लागला असता, असे काशीचे लोक सांगताहेत.” मी.

“ते तितकेसे बरोबर नाही.” राय.

“कसे?”

“इकडे संपूर्ण राजकीय, प्रशासकीय यंत्रणा वापरली. विरोध करणाऱ्या प्रत्येकावर दबाव होता. त्यांच्या उद्योगधंद्यावर टाच आणली. भाजपात या, नाहीतर शांत बसा. काही केलंत तर महाग पडेल. हा प्रशासनाचा संदेश होता. आय.ए.एस., आय.पी.एस. घरी जाऊन धमक्या देत होते.” राय.

“मग तुम्ही काय केलंत?”

“आम्ही आमचे पत्ते शेवटपर्यंत उघडले नाहीत. जेथे आहात तेथे शांतपणे काम करा. आमच्या माणसांना आम्ही उघड केलं नाही. आम्ही चार लाख मतांचा टप्पा गाठतोय याचा त्यांना अंदाज आला असता तर त्यांनी इतर अघोरी उपायांचा अवलंब केला असता. आम्ही गमिनी काव्याने लढलो व मोदींची पीछेहाट केली.” राय.

“या निकालाचा संदेश काय?”

“काशीने मोदींना नाकारले आहे. त्यांचा पराभव झाला आहे. मोदींनी राजीनामा देऊन पुन्हा फेरनिवडणूक घ्यावी. मी त्यांचा पराभव करीन.” राय.

“मोदी यांची काशीत पीछेहाट का झाली?” मी.

“आपली फसवणूक झालीय असे काशीच्या जनतेला वाटते. त्यांच्या जीवनात काहीच फरक पडला नाही. काशीची सर्व सूत्रे आज गुजराती व्यापाऱ्यांच्या हाती आहेत व काशीचे लोक आपण फसवले गेलो या मनःस्थितीत आहेत. लोकांनी मतदानातून राग व्यक्त केला.” राय.

“राज्यात पुढे काय होईल?”

“काय होईल? योगींचे राज्यही जाईल व समाजवादी पार्टी, काँग्रेस आघाडीचे राज्य उत्तर प्रदेशात येईल. नक्की.”

अजय राय यांची प्रतिमा दबंग नेतृत्वाची आहे. काँग्रेसला उत्तर प्रदेशात हवा तसा नेता मिळाला, जो वाराणशीत मोदींशी टक्कर घेण्यासाठी उभा राहिला व त्यांनी मोदींना घाम फोडला. हा सर्व जणू गंगामाईचाच प्रसाद. भोलेबाबा सर्व पाहत आहे ही त्या नेत्याची श्रद्धा.

भीष्म कोण?

नरेंद्र मोदी स्वतःला माता गंगेचा दत्तक पुत्र म्हणवून घेतात. दत्तक पुत्राचे प्रयोजन काय? माँ गंगा निःसंतान नव्हती. माता गंगेस सात पुत्र होते. त्यातील सहा पुत्र गंगेने स्वतःच प्रवाहात सोडले. सातवे पुत्र देवव्रत म्हणजे भीष्म. त्यांचे रक्षण पिता राजा शांतनूने केले. ते भीष्म पुढे महान योद्धे झाले व गंगापुत्र म्हणून आजही श्रद्धेचे स्थान त्यांना आहे. त्या नात्याने मोदी हे भीष्माचे सावत्र भाऊच झाले असेच म्हणावे लागेल. भीष्म हे महाभारतात कौरवांच्या बाजूने उभे राहिले व सत्य मरत असताना गप्प बसले. द्रौपदीचे वस्त्रहरणही त्यांनी उघड्या डोळ्यांनी सहन केले. श्री. मोदीही आज असत्य व अधर्माच्या बाजूनेच उभे आहेत व या सगळ्यांची पापे धुणाऱ्या गंगेप्रमाणे गंगा छाप वाशिंग मशीन त्यांनी निर्माण केली, पण त्यामुळे रोज माता गंगेची बदनामी होत आहे. गंगेचे पावित्र्य व मांगल्य हीच भारतवर्षाची ओळख आहे. संध्याकाळच्या गंगाघाटावरच्या आरतीने आसमंत पवित्र होतो व गंगेच्या लाटा उसळू लागतात. हिंदूंनी त्यांची सर्व तीर्थे जणू गंगाकिनारी निर्माण केली. गंगेच्या आसपास अनेक नद्या वाहतात. अगदी हिमालयातूनही त्या उगम पावतात, पण इतर नद्यांच्या पाण्यात जे गुणधर्म नाहीत ते सर्व गंगेतच आढळतात. गंगा व गंगाजल हे विज्ञानाला मिळालेले आव्हान आहे. कोणत्याही नदीचे पाणी आपण जास्त काळ जतन करायचा प्रयत्न केला तर ते सडून जाईल, पण गंगाजल कधीच सडत नाही. घराघरांत गंगाजलाच्या बाटल्या वर्षानुवर्षे टिकून आहेत. गंगाजलाची शुद्धता शेवटपर्यंत कायम असते. गंगेच्या पोटात घाण सोडली जाते, किनाऱ्यावर प्रेते जाळली जातात, प्रेते तशीच सोडली जातात, पण गंगेच्या पोटात काहीच राहत नाही. मानवी हाडेही विरघळतात. हे फक्त गंगेतच घडते. गंगा सर्व विष पचवून वाहते आहे. लोक किनाऱ्यावर मोक्षाच्या आशेने आरतीसाठी उभे आहेत. मोदी वाराणशीत येऊनही त्यांच्या मनातले विष नष्ट झाले नाही व पापही संपले नाही!

twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]