महाराष्ट्रात भाजप व त्यांच्या मित्र गटांना मोठे बहुमत मिळूनही राज्य पुढे जाताना दिसत नाही, याचे कारण मुख्यमंत्री फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यातला विसंवाद. पुन्हा मुख्यमंत्री केले नाही या धक्क्यात शिंदे अजून झुलत आहेत व पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी धडपडत आहेत, हे फडणवीस ओळखून आहेत.
आपले `लाडके’ मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व भाजपपुरस्कृत उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे सध्या फारसे संबंधच राहिलेले नाहीत याची प्रचिती देणारे प्रसंग रोज घडत आहेत. त्यामुळे जनतेचे मनोरंजन सुरू आहे. त्यात भाजप कोटय़ातील मंत्री श्री. गणेश नाईक यांनी शिंदे यांच्या ठाणे जिल्हय़ात नियमित जनता दरबार घेणार असे जाहीर करून `कहर’च केला आहे व त्यामुळे नवी वादाची ठिणगी पडली. यावर शिंद्यांच्या लोकांनी दंड थोपटले व सांगितले की, तसे असेल तर आम्ही नाईक पालकमंत्री असलेल्या पालघर जिल्हय़ात जाऊन दरबार भरवू. राज्याचे सरकार किती बेचव आणि अळणी आहे व आपापसातील मारामाऱयांमुळे प्रशासन व जनतेचे किती हाल होत आहेत त्याची फिकीर कुणालाच नाही. शिंदे गटाचे एक त्यातल्या त्यात बरे आमदार विमान प्रवासात भेटले. त्यांनी त्याही पुढची माहिती देऊन गोंधळ वाढवला. “शिंदे हे स्वत:ला अपमानित केल्याच्या दु:खातून बाहेर पडायला तयार नाहीत. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिंदे व फडणवीस यांची तोंडे दोन दिशांना होती. आता फडणवीस त्याचे उट्टे काढत आहेत. कारण शिंदे यांच्या हातात काहीच राहिलेले नाही.”
“मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळालेले नाही याच दुखवट्यात शिंदे अजून आहेत काय?” – मी.
“ते त्याच्याही पलीकडच्या समाधी अवस्थेकडे पोहोचले आहेत. शून्यात गेले आहेत.” – आमदार.
“शिंदे यांना धक्का बसला आहे काय?” – मी.
“ते मनाने कोलमडले आहेत.” – आमदार.
“का? काय झालं?” – मी.
“निवडणुका तुमच्याच नेतृत्वाखाली लढवू व 2024 नंतरही पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री असाल, चिंता करू नका. निवडणुकीत सढळ हस्ते खर्च करा, असे आश्वासन अमित शहा यांनी शिंदे यांना दिले होते. शिंदे यांनी प्रचंड पैसा निवडणुकीत टाकला, पण शहा यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही व आपली फसवणूक झाली असे शिंदे यांना वाटते” – आमदार महोदय.
या आमदाराने पुढे माहिती दिली ती महत्त्वाची. “शिंदे व त्यांच्या लोकांचे फोन टाप केले जात आहेत असे शिंदे यांना खात्रीने वाटते व दिल्लीच्या एजन्सी आपल्या हालचालींवर पाळत ठेवून असल्याचा शिंदे यांना संशय आहे, पण शिंदे यांची पुरती कोंडी आता झाली आहे.”
महाराष्ट्रातले राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे हे दर्शविणारी ही हवेतली चर्चा आहे. शेवटी काय, तर भाजप कोणाचाच नाही.
शिंदेंवर दबाव
महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीत आज शिंदे व त्यांचे लोक कोठेच दिसत नाहीत. मुख्यमंत्री म्हणून शिंदेंवर झोत होता तो संपला आहे व मुख्यमंत्री फडणवीस आपल्याला विचारीत नाहीत या दु:खात स्वत: शिंदे अखंड डुंबले आहेत. फडणवीस व शिंदे यांच्यात वरवरचे बोलणे आहे व मंत्रिमंडळांच्या बैठकांनाही उपमुख्यमंत्री शिंदे हजर राहत नाहीत हे सत्य आहे. दु:खाचा कडेलोट झाला की, उपमुख्यमंत्री शिंदे हेलिकाप्टरने साताऱयातील दरेगाव गाठतात व डोके थोडे शांत झाले की, ठाण्याला परत येतात, पण डोके शांत झाले तरी त्यांचे मन:स्वास्थ्य सुधारत नाही.
एकनाथ शिंदे यांचे मन:स्वास्थ्य आता इतके बिघडले आहे की, ते आता आमदारांवरच चिडचिड करतात असा खुलासा त्यांच्याच एका प्रिय आमदाराने केला. शासकीय बैठकांना शिंदे दोन तास उशिरा पोहोचतात. दि. 30 रोजी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक वर्ल्ड ट्रेड सेंटरला झाली. त्या बैठकीत शिंदे किमान अडीच तास उशिरा पोहोचले. त्यांचे कामात मन रमत नसल्याचे हे लक्षण. शिंदे हे बैठकांना उशिरा पोहोचतात व त्यामुळे सगळय़ांचाच खोळंबा होतो अशी पार भाजपच्या आमदारांनी आता मुख्यमंत्र्यांकडे केली.
फडणवीस हे आज सरकारचे प्रमुख आहेत व शिंदे हे कालपर्यंत त्याच सरकारचे प्रमुख होते व आता दोघांचे पटत नाही. “मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये फार मोठे मतभेद नाहीत.” असे भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्याने मला अलीकडेच सांगितले. (म्हणजे लहानसहान मतभेद आहेत. उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यातही फार मोठे मतभेद नव्हते. असलेच तर ते लहानसहान मतभेद असतील, पण पुढे काय झाले ते देशाने पाहिले.) चित्र असे आहे की, शिंदे यांच्या बहुतेक आमदारांत आता चलबिचल आहे. त्यातील एक मोठा गट थेट भाजपात जाऊन देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व स्वीकारण्याच्या तयारीत आहे. दुसरा गट शिंदेंवर दबाव आणीत आहे. झाले गेले विसरून पुन्हा स्वगृही परतू, या चर्चा जोरात आहेत, पण केंद्रीय तपास यंत्रणांच्या भयामुळे नेते निर्णय घेत नाहीत व गुलियन बारी सिन्ड्रोमच्या आजाराप्रमाणे हातापायांना आणि मेंदूलाही मुंग्या आल्याचा भास या सगळय़ांना होतो आहे. हे चित्र गमतीचे आहे. शिंदे गटातले मोजके लोक मंत्री झाले व उरलेले पैसा व ठेकेदारीच्या उबेवर जगत आहेत. शिंदे या सगळय़ांचे नेतृत्व किती काळ करू शकतील?
अजित पवार धोरणी
एकनाथ शिंदेंपेक्षा अजित पवार यांची स्थिती बरी. अजित पवार यांनी त्यांच्या मर्यादा ओळखल्या आहेत व फडणवीस यांच्याशी त्यांचे नाते अधिक मजबूत आहे. सध्या अजित पवारांना काहीच व्हायचे नाही. त्यामुळे त्यांना अमित शहांच्या यादीतले जंटलमेन व्हायचे आहे. भाजपबरोबर गेल्याने अजित पवार यांनी `ईडी’ची कारवाई टाळली. एक हजार कोटींची जप्त केलेली संपत्ती सोडवून घेतली व पुन्हा `बोनस’ म्हणून उपमुख्यमंत्रीपद मिळाले. या व्यवहारात अजित पवार खूश आहेत. अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचे नाही व मुख्यमंत्री होण्यापेक्षा सुरक्षित बाहेर राहिलेले बरे हे धोरण पवारांनी स्वीकारले. पुन्हा धनंजय मुंडे यांचाही बचाव होत आहे, पण शिंदे यांचे तसे नाही. ठाकरे मंत्रिमंडळात असतानाही त्यांना मुख्यमंत्री व्हायचेच होते व फडणवीस मंत्रिमंडळात असतानाही त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनायचे आहे. हा धोका फडणवीस यांनी ओळखला आहे. शिंदे यांच्या सोबत असलेले किमान 21 आमदार हे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मानतात व फडणवीस यांच्या सूचनेनुसारच ते सुरतला गेले हे सत्य शिंदेही जाणतात. त्यामुळे शिंदे गट आजही एकसंध नाही. शिंदे हे स्वत:च डळमळीत झाल्याचे स्पष्ट जाणवते व समोर येऊन लढण्याचे बळ त्यांच्यात अजिबात नाही. शिंदे यांना सध्या अमित शहांचे पाठबळ आहे. ते वरवरचे व कामापुरते आहे. ते नसेल तेव्हा शिंदे यांचे नेतृत्व संपलेले असेल. अमित शहांचा रस शिंदे यांच्यात नसून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपविण्यात व मुंबईवर पूर्णपणे ताबा मिळविण्यात आहे. शिंदे यांची मदत त्यांना त्यासाठी हवी. शहांचे काम झाले की, शिंदेंचे काम तमाम होईल हे नक्की. शिंदे यांच्या पक्षाकडे (चोरलेल्या) कोणतेही धोरण नाही. पैशांच्या व उरल्यासुरल्या सत्तेच्या बळावर त्यांचे फोडाफोडीचे राजकारण सुरूच आहे. पुन्हा ते शिवसेनाच फोडतात. काँग्रेस-राष्ट्रवादीत ते घुसत नाहीत. कारण मालक अमित शहांनी त्यांना तेच काम दिले आहे. मात्र ते करत असताना त्यांच्या पायाखालची सतरंजी भाजपचे लोकच ओढत आहेत. आज सतरंजी ओढत आहेत. उद्या पायच कापतील. शिंदे व अजित पवार यांच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक त्या त्या खात्यात मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून बसणार व मंत्र्यांना मुबलक पैसे खाणे त्यामुळे बंद होईल. शिंदे त्यावर काय करणार? रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून वाद आहेत व गडचिरोलीचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले. त्यामुळे खाण उद्योग भयमुक्त झाला. शिंदे यांनी ठाणे व मुंबईचे पालकमंत्रीपद एकाच वेळी स्वत:कडे ठेवले. त्यात आर्थिक हितसंबंध जास्त आहेत. ठाण्यातला शिंद्यांचा एकछत्री कारभार यापुढे चालणार नाही. कारण भाजपने ठाणे जिल्हय़ातील गणेश नाईक यांना मंत्री व पालघरचे पालकमंत्री करून शिंदे यांची ठाण्यातली मक्तेदारी मोडली. शिंदे यांना हे आव्हान ठरेल. गणेश नाईक हे शिवसेना-भाजपच्या पहिल्या मंत्रिमंडळात होते तेव्हा शिंदे हे ठाण्यात नगरसेवक होते. त्यामुळे गणेश नाईक हे शिंदे यांना जुमानणार नाहीत. ते ठाण्यातच जनता दरबार भरवतील व शिंदे यांच्या डोक्याला मुंग्या आणतील. महाराष्ट्रात हा असा उघड संघर्ष सुरू आहे व तो संपेल असे वाटत नाही. बहुमत असूनही सरकार व राज्य अस्थिर आहे. तलवार चालवणारे त्याच तलवारीच्या घावाने संपतात. शिंदे यांच्यावर तलवारीचे घाव सुरू झाले आहेत. महाराष्ट्र मात्र निराश, निर्नायकी अवस्थेला पोहोचला आहे!
या साठमारीत महाराष्ट्र मेला काय, जगला काय, अमित शहांना त्याचे काय? इतिहास एकनाथ शिंदे व अजित पवार यांना माफ करणार नाही हे नक्की.
@rautsanjay61