रोखठोक – मोदी शेवटी कुबड्यांवर आले

लोकसभा निवडणुकांच्या निकालांनी एक गोष्ट स्पष्ट केली ती म्हणजे लोकशाही अमर आहे. भारतात लोकशाही मारणाऱ्यांचा माज शेवटी उतरवला जातोच. चारशेपारचा नारा देणाऱ्या मोदी-शहांच्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी साधे बहुमतही मिळवता आले नाही व एनडीएच्या नावाने कुबड्या घेऊन सरकार स्थापनेची वेळ त्यांच्यावर आली. हे सरकार टिकणार नाही.

भारतीय लोकशाहीचे चारित्र्य घसरणीला लागले आहे हे लोकसभा निवडणुकांनी दाखवून दिले. “चारित्र्याचे मोल किती आहे?” हे एकाच वाक्यात सांगायचे तर “चारित्र्याचे मोल महाभारताएवढे आहे” असेच उत्तर द्यावे लागेल. लोकसभा निवडणूक निकालानंतर महाभारताचे चारित्र्यहनन मोठय़ा प्रमाणात सुरू झाले. 18 व्या लोकसभेची निवडणूक झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या भाजपचा दारुण पराभव जनतेने केला. 2014 आणि 2019 प्रमाणे मोदी यांना सरकार स्थापनेसाठी साधे बहुमत मिळवता आले नाही. देशाच्या जनतेने सत्तेतील पासिस्ट प्रवृत्तींचा पराभव केला. भाजपला 234 जागाच मिळाल्या व बहुमताच्या आकडय़ापासून 40 जागा दूर ठेवले. नरेंद्र मोदींचा हा पराभव आहे. तरीही मोदी यांनी आता ‘एनडीए’चे सरकार म्हणून तिसऱ्यांदा शपथ घ्यायचे ठरवले. मोदी हा देवाचा माणूस (असा त्यांचा दावा), पण देवाचा माणूस सत्तेशिवाय जगू शकत नाही व बहुमताचे कडबोळे बांधून मोदी सिंहासन प्राप्तीसाठी राष्ट्रपती भवनात दाखल झाले. मोदी पंतप्रधानपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतील, पण गेल्या दहा वर्षांत त्यांनी हजारदा जनतेला दिलेली ‘वचने व शपथा’ मोडल्या आहेत त्याचे काय?

सभ्यता गुंडाळली

भारतीय जनता पक्षाने देशाच्या राजकारणातील सर्व सभ्यता व संस्कृती गुंडाळून ठेवली आणि त्याचा प्रत्यय निवडणूक प्रचारात आला. मोदी ‘रामभक्त’ आहेत. त्यांनी रामाचे मंदिर उभे केले, पण रामायण-महाभारताचा विचार स्वीकारला नाही. सत्तेवरील व्यक्ती अध:पतित झाल्या, भ्रष्ट बनल्या. सज्जनांचा उपदेश त्यांच्या कानावरून जाऊ लागला म्हणजे आधी त्यांच्या साऱ्या कुलाचा, देशाचा नाश होतो व मग ते पदभ्रष्ट होतात आणि जगात त्यांची अपकीर्ती होते. भाजप व मोदी यांच्या बाबतीत तेच घडले आहे. लोकसभा निकालाने मोदी व त्यांच्या लोकांचे पाय जमिनीवर येतील असे वाटले होते, पण बहुमत नसतानाही मोदी नितीश कुमार, चंद्राबाबू, चिराग पासवान यांच्या कुबडय़ा घेऊन सरकार बनवीत आहेत. नितीश कुमार यांच्या ‘जदयु’ पक्षाला 12 व चंद्राबाबूंच्या तेलुगू देसमला 16 जागा मिळाल्या. त्यामुळे या दोघांच्या अटी मानून मोदी सरकार बनवतील, पण चालवू शकतील काय? 5 जून रोजी मी दिल्लीत होतो. मोदींनी बोलावलेल्या बैठकीस नितीश व चंद्रा हे दोन बाबू उपस्थित होते. मोदी यांना पाठिंबा द्यायच्या बदल्यात या दोन्ही बाबूंना जे हवे ते दिले जाईल काय? चंद्राबाबू यांना लोकसभा अध्यक्षपद, गडकरींकडे असलेले बांधकाम, रस्ते उभारणी व ऊर्जा मंत्रालय हवे, तर नितीश कुमारांना गृह, संरक्षण, परिवहन अशी खाती हवीत. शिवाय रेल्वे खातेही बिहारकडे असावे व ते चिराग पासवान यांच्या पक्षाकडे असावे अशी नितीश कुमारांची भूमिका आहे. मोदी व शहा यांचा प्राणच ओरबाडून घेण्याचा हा प्रकार आहे. शिवाय इतर लहान पक्षांच्या गरजा पूर्ण कराव्या लागतील. या सगळय़ा व्यवहाराची मोठी किंमत उद्या देशाला चुकवावी लागेल. मोदींची सत्ता टिकविण्यासाठी देशाला हा भार सहन करावा लागेल हे मान्य केले तर मोदी व भाजपच्या राजकारणातून ‘नैतिकता’ या शब्दाची पुरती वाट लागली असेच म्हणावे लागेल. राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर जी तीन प्रमुख पात्रे आहेत, त्यातील एक चिराग पासवान. त्यांचे पाच खासदार बिहारातून निवडून आले. रामविलास पासवान यांचे ते चिरंजीव. रामविलास पासवान हे अनेक वर्षे एनडीएबरोबर राहिले. त्यांचे अकाली निधन झाले. आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार आटोपून चिराग दिल्लीतील जनपथावरील निवासस्थानी पोहोचले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. सीपीडब्ल्यूडी विभागाने निर्घृणपणे पासवान यांच्या बंगल्यातील सर्व सामान बाहेर काढून अक्षरश: फेकले होते. त्यात रामविलास यांच्या पुतळय़ाची मोडतोड झाली. चिराग यांनी बंगला आणखी काही काळ राहावा म्हणून भाजपच्या अनेक मंत्र्यांना फोन केले. नड्डाही त्यात होते, पण त्यांचा फोन घेण्याचे सौजन्य कोणी दाखवले नव्हते. याच चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष मोदी-शहांनी फोडला व त्यांच्या काकांच्या हाती दिला. चिराग यांचे चिन्ह, पक्ष, सर्व काही हिरावून घेतले. ते पासवान आज मोदींचे सरकार पुन्हा अवतरावे म्हणून बजरंग बलीच्या भूमिकेत दिल्लीत वावरत आहेत. नितीश कुमार यांच्याविषयी न बोललेलेच बरे. त्यांचे राजकीय चारित्र्य उघडे आहे. चंद्राबाबू नायडू यांच्यासाठी ‘एनडीए’चे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत, अशी गर्जना अमित शहा यांनी आंध्रात जाऊन केली होती. नायडू हे फसवणारे, शब्द न पाळणारे गृहस्थ असल्याचे अमित शहांचे बोलणे होते, तर 2019 साली नायडू यांनी मोदी यांना ‘लोकशाहीचे मारेकरी’ म्हटले. मोदी हे अत्यंत पद्धतशीररीत्या देशाच्या घटनात्मक संस्था मोडीत काढीत आहेत. त्यामुळे भारतीय लोकशाही धोक्यात असल्याची भीती श्री. नायडू यांनी व्यक्त केली. मोदी यांच्या हुकूमशाही कचाटय़ातून सीबीआय, रिझर्व्ह बँक आणि घटनात्मक संस्था, निवडणूक आयोगही सुटलेला नाही असे नायडू यांचे जाहीर बोल होते. मोदी-शहांचा निवडणूक आयोग ईव्हीएम मशीनचा घपला करून निवडणुका जिंकत असल्याचा त्यांचा आरोप खळबळजनक होता. आता तेच चंद्राबाबू हे मोदी-शहांचे सरकार बनावे यासाठी पुढाकार घेत आहेत. लोकशाहीने कायमचे डोळे मिटावेत अशा या घटना दिल्लीत घडत आहेत.

अंदाज चुकले

इंडिया आघाडीस 234 जागा मिळाल्या. 125 जागाही या सगळय़ांना मिळून जिंकता येणार नाहीत अशी भाषा मोदी करीत होते. त्या इंडियाने मोदींचे बहुमताचे पंखच कापले व त्यांना जमिनीवर आणले. महाराष्ट्र व उत्तर प्रदेशमुळे मोदींचे स्वप्न भंगले. अखिलेश यादव यांनी श्रीरामाच्या भूमीतच मोदींना रोखले. 80 पैकी 42 जागा अखिलेश व राहुल यांच्या युतीने जिंकल्या. अयोध्या असलेले फैजाबाद व रामभक्तांसाठी श्रद्धेचे स्थान असलेले ‘चित्रकूट’ या दोन्ही ठिकाणी मोदी-भाजपचा पराभव जनतेने केला. मोदी हे काशीचे नरेश असल्याच्या आविर्भावात वावरतात. त्या काशीतच मतदारांनी मोदींचा नैतिक पराभव केला. पाच लाखांचे मताधिक्य जेमतेम दीड लाखावर आले. हा पराभव नाही तर काय? स्वत:ला देवत्व बहाल करून लोकांना भोंदू बनवणाऱ्यांचा खेळ त्यामुळे काशीतच आटोपला. रामाचा व्यापार गेल्या दहा वर्षांत झाला. तो रामाच्या नगरीतच प्रत्यक्ष श्रीरामाने बंद पाडला. मोदी यांच्या काळात वाराणसीचे गुजरात झाले. येथील व्यापार, उद्योगाच्या सर्व नाडय़ा गुजराती व्यापाऱ्यांकडे गेल्या. रस्ते, हॉटेल्सचे ठेके फक्त गुजरात्यांकडे पद्धतशीर गेले. वाराणसीच्या मतदारांनी या भोंदूगिरीचा बदला घेतला. मोदी यांचा राजकीय अवतार त्यामुळे संपल्यातच जमा आहे. त्यांचे खोटे बोलणे, खोटे रडणे, खोटे हसणे या सगळय़ात जनता कंटाळली व लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पायाखालची बहुमताची सतरंजीच ओढली हे सत्य आहे.

मंत्र्यांचा पराभव

मोदी सरकारातील 17 मंत्र्यांचा दारुण पराभव झाला. यात स्मृती इराणी आहेत. अमेठीत राहुल गांधी यांचा ‘पीए’ के. एल. शर्मा यांनी हा पराभव केला. महाराष्ट्रात रावसाहेब दानवे, भारती पवार व कपिल पाटील हे तीन मंत्री लोकांनी आपटले. उज्ज्वल निकम यांना भारतीय जनता पक्षाने मुंबईत उभे केले व काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी त्यांना पाडले. प्रकाश आंबेडकर स्वत: अकोल्यात पराभूत झाले. भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष मदत करू पाहणारे नेते व त्यांचे पक्ष या निवडणुकीत लोकांनी फेकून दिले. उत्तर प्रदेशात मायावतींचे राजकारणच संपले असा निकाल लोकांनी दिला. जेथे मोदी-शहांनाच लोकांनी झिडकारले तेथे इतरांचे काय? महाराष्ट्रात महाविकास आघाडीने 30 जागा जिंकून देवेंद्र फडणवीसांचे ‘मी परत येईन’ नाटक बंद पाडले. अजित पवारांपासून एकनाथ शिंदेंपर्यंत व मोदी-शहांपासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येकाने धडा घ्यावा असा हा निकाल. मोदी पुन्हा शपथ घेतील, पण त्यांना कुबडय़ा घेऊन राष्ट्रपती भवनात जावे लागेल. या नव्या रचनेत अमित शहांकडे गृहखाते राहील काय? याच गृहखात्याच्या गैरवापराने नरेंद्र मोदींचे नुकसान झाले व लोकांच्या दृष्टीने ते खलनायक ठरले. भविष्यात अमित शहांविरोधात पक्षातच आवाज उठेल असे चित्र आहे. बहुमत गेल्याने लोकांची भीती मेली आहे. बहुमत गमावलेल्या भाजपने मोदी यांना सहन करू नये, असा आवाज महाराष्ट्रातच उठण्याची शक्यता जास्त आहे.

असे घडले तर महाभारताच्या चारित्र्याला पुन्हा उभारी येईल!

twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]