
मोदी यांच्या काळात सत्य बोलण्यावर बंदी आहेच. आता बोलण्यावर आणि हसण्यावरही बंदी आली काय, असा प्रश्न पडतो. एका व्यंगात्मक गाण्यावरून महाराष्ट्रात तोडफोड झाली. हिंसाचार आणि कुणाल कामराला ठार करण्याची भाषा सुरू आहे. महाराष्ट्रातील किंवा भारतातील राजकारणी म्हणजे प्रेषित नाहीत. प्रेषितांचे व्यंगचित्र काढले म्हणून फ्रान्ससह अनेक देशांत दंगली उसळल्या. महाराष्ट्रात कोणी स्वत:ला प्रेषित समजत आहेत काय?
मैं बहुत कुछ सोचता रहता हूं
पर कहता नहीं,
बोलना भी है मना,
सच बोलना तो
दर किनार!
– दुष्यंत कुमार
भारतात सत्य बोलण्यावर अलीकडच्या काळात बंदी होतीच, आता बोलण्यावरही बंदी येताना दिसत आहे. लोक बोलत नाहीत. लोक आरडाओरड करतात नाहीतर हाती काठय़ा घेऊन तोडफोड करतात. हे चित्र विचलित करणारे आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातली आरडाओरड औरंगजेबापासून सुरू झाली ती कामेडियन कुणाल कामरापर्यंत येऊन थांबली. आफ्रिकेतील काही देशांत आजही वंशयुद्ध आणि टोळीयुद्ध चालते. तसेच हे घडताना दिसले. आपण सगळेच किती असहिष्णू झालो आहोत याचा हा नमुना.
काही वर्षांपूर्वी बराक ओबामा भारतात आले. त्यांनी भारताला सहिष्णुतेवर `लेक्चर’ दिले. त्या वेळी भारतातला एकही प्रतिष्ठित नागरिक उभा राहिला नाही व त्याने ओबामा यांना सांगितले नाही की, “साहेब, भारताची जगात ओळख सहिष्णू अशीच आहे. तुम्ही आम्हाला सहिष्णुतेचे धडे कृपया देऊ नका.”
आता वाटते, ओबामा खरे तेच बोलले होते. भारतातून सहिष्णुता तडीपार झाली आहे.
औरंगजेबाच्या कबरीचे राजकारण संपल्यावर नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील समर्थकांनी रात्रीच्या अंधारात कुणाल कामरा या स्टाण्डअप कामेडियनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो सापडला नाही तेव्हा तो जेथे कार्पाम करतो त्या स्टुडिओवर हल्ला केला व ते कलाकारांचे व्यासपीठ उद्ध्वस्त केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर एक राजकीय व्यंगात्मक गाणे रचले म्हणून शिंदे यांचे लोक भडकले. त्यांच्या भावना भडकल्या. शिंदे यांच्या भाषेत आक्शनला रिआक्शन झाली. शिंदे यांचे हे बोलणे अगदीच हास्यास्पद आहे. शिंदे यांच्यासाठी जे लोक कामराच्या स्टुडिओवर चाल करून गेले ते सर्व लोक भाडोत्री आहेत. कालपर्यंत हे लोक मूळ शिवसेनेसाठी हाणामाऱया करीत होते. आज ते शिंदेंसाठी करतात. शिंदेंची सत्ता नसेल तेव्हा ते दुसरा मालक शोधतील. यात भावना वगैरे आल्या कोठून? सगळा पैशांचा आणि सत्तेचा खेळ.
नुकसान कोणी केले?
एकनाथ शिंदे यांचे सगळ्यात जास्त नुकसान त्यांच्या सभोवतीचे बिनडोक लोकच करीत आहेत. बिनडोक सेनेचे ते नेते झाले आहेत. कुणाल कामरा प्रकरणात ते स्पष्ट दिसले.
कामराने ठाण्यातील रिक्षावाल्याचा त्रास केंद्रस्थानी ठेवून एक व्यंगगीत रचले व गायले. त्यात तो दाढीधारी रिक्षावाला गद्दारी करून आपल्या लोकांना घेऊन गुवाहाटी येथे जातो असे लिहिले. गाण्याचे शब्द त्यांच्या काळजात आरपार घुसले, ते नक्की काय आहेत?
कामराने ‘दिल तो पागल है’चे पारोडी गीत त्याच्या शोमध्ये गायले.
त्यात शिंदे यांचे नाव कोठेच नाही.
“ठाणे की रिक्शा,
चेहरे पे दाढी,
आंखोंपर चश्मा हाये।
एक झलक दिखलाए
कभी, गुवाहाटी में छिप जाए।
मेरी नजर से तुम देखो,
गद्दार नजर वो आए
मंत्री नहीं है वो, दल बदलू है
और कहा क्या जाए,
जिस थाली में खाए
उसमें छेद कर जाए।
मंत्रालय से ज्यादा
फडणवीस की गोद में
मिल जाए।
या गाण्यातला आशय नवा नाही. याला `सटायर’ म्हटले जाते. गेल्या चारेक वर्षांपासून गद्दारी आणि खोके या विषयावर महाराष्ट्रात विनोदी गाण्यांचा आणि जोक्सचा पाऊस पडला आहे. विधानसभा निवडणुकीत गद्दारीवरील गाणी प्रचारात आणली. त्यावर कुणाच्याच भावना भडकल्या नाहीत, पण कामराच्या गाण्याने त्या भडकल्या. शिंदेंच्या लोकांनी कामराच्या स्टुडिओवर हल्ला केला व त्यामुळे रिक्षावाल्यांचे गद्दारीवरचे गाणे कोटय़वधी लोकांपर्यंत पोहोचले. जे काम विधानसभेतील प्रचारात झाले नाही ते शिंदे व त्यांच्या लोकांनी केले. त्याबद्दल मूळ शिवसेनेने शिंदे यांच्या भाडोत्री लोकांचे आभार मानायला हवेत. मूर्ख राजकारण्यांना विनोद कळत नाही. विनोद हा जीवनाचा विरंगुळा आहे. विनोद आणि व्यंग नसते तर माणसाचे जगणे कठीण झाले असते. माणसांचे खळखळून हसणे मोदींच्या अमृत काळात बंद पडले आहे. त्यामुळे विनोदी लेखक व कलाकारांवर हल्ले होत आहेत.
विडंबनाचा धसका
काव्य स्वर्गात निर्माण होते आणि विनोद पृथ्वीवर उत्पन्न होतो. विनोदाची पुढची पायरी विडंबन. उपहास हा विडंबनाचा आत्मा असल्यामुळे ते अनेकदा प्रखर भासते. समाजातील फसवणूक, लांडय़ालबाडय़ा, राजकारण्यांचा ढोंगीपणा, केवळ पैसा व सत्ता मिळविण्यासाठी रचलेले निष्ठावंतांचे सोंग चव्हाट्यावर आणण्यासाठी विडंबनाचा फार उपयोग होतो. आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्र लढय़ात विडंबनाचे हत्यार चालवले व महाराष्ट्राचे शत्रू लटपटले. महाराष्ट्रातील लोकांना फसवण्याचा उद्योग गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. त्या फसव्यांना `झटका’ देण्याचे काम कुणाल कामराच्या व्यंगकाव्याने केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते. त्यांचा कुंचला म्हणजे वाघाचा पंजा होता. त्या पंजाच्या फटकाऱयांनी अनेकांना घायाळ केले. डेव्हिड लो हा व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुखांचा आदर्श. बाळासाहेब नेहमी सांगत, “शंभर अग्रलेखांची ताकद एका टोकदार व्यंगचित्रात असते.” दुसऱया महायुद्धाच्या वेळी डेव्हिड लो याच्या व्यंगचित्रांमुळे हिटलर बेजार झाला होता. शेवटी त्याने आपल्या सैन्याला आदेश दिला, “व्यंगचित्रकार डेव्हिड लो याला `जिवंत किंवा मुडदा’, जसा मिळेल तसा माझ्यासमोर घेऊन या.” हिटलर जसा डेव्हिड लो याला घाबरला, त्याप्रमाणे मोदी व त्यांचे समर्थक कुणाल कामरासारख्या व्यंगकलाकारांना घाबरलेले दिसतात. शिंदे व त्यांच्या लोकांनी कामरा याला `जिंदा वा मुर्दा’ ताब्यात घ्यायचे ठरवले आणि मुख्यमंत्री फडणवीस हा तमाशा सहन करीत आहेत.
`भारत जोडो’त कुणाल
कुणाल कामराने राहुल गांधी, मनमोहन सिंग यांच्यावरही विडंबन केले, पण तोच कुणाल राहुल गांधींच्या `भारत जोडो’ यात्रेत गांधींबरोबर चालताना दिसला. राहुल गांधींनीही राग मनात ठेवला नाही. याला सहिष्णुता म्हणतात. ही सहिष्णुता मारली जात असताना जे लोक शांत बसतात ते हुकूमशाही बळकट करण्यास मदत करतात. शिंदे यांच्या लोकांनी कुणाल कामराला ठार मारण्याची धमकी दिली व गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री फडणवीस सांगतात, “कुणाल कामराने शिंदे यांची माफी मागावी.” मग तुमच्याकडे असलेले गृहखाते काय कामाचे? दंगलखोरांना मुक्त रान देऊन आपण कामराला माफी मागायला सांगत आहात. शिंदे व त्यांच्या लोकांनी तीन वर्षांत जे स्वार्थी राजकारण केले, त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली. शिंदे व त्यांच्या लोकांनीच महाराष्ट्राची माफी मागायला हवी.
शिमगा
महाराष्ट्रात शिमगा हा सण आवडीने खेळला जातो. शिमग्यात आपल्या विरोधकांच्या नावाने शिवराळ बोंबा मारणे, त्यांच्यातील व्यंग शोधून चिखलफेक करणे असले सनातनी आणि हिंदुत्ववादी प्रकार होतात. कुणाल कामराने त्याच `सनातनी’ पद्धतीने शिमगा केला. यावर नकली हिंदुत्ववादी दंगल करण्यापर्यंत भडकावेत? नागपुरात दंगल झाली. त्या दंगलीत झालेले नुकसान दंगलखोरांकडून वसूल करू असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. आता मुंबईतील ज्या हाबिटॅट स्टुडिओवर दंगलखोरांनी हल्ला केला व नासधूस केली ते साधारण 45 लाखांचे नुकसान याच दंगलखोरांच्या म्होरक्यांकडून वसूल केले पाहिजे. नागपूरचे दंगलखोर वेगळे व कामराचा स्टुडिओ तोडणारे दंगलखोर वेगळे, असा भेद करता येणार नाही. कायदा सगळय़ांसाठी सारखाच असायला हवा. नागपूरची दंगल हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असेल तर मुंबईतली स्टुडिओ तोडण्याची दंगलदेखील कलंकच म्हणायला हवी, पण श्री. फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना उघडे पाडू इच्छितात. महाराष्ट्राचे वातावरण शिंदे व त्यांचे लोक बिघडवत असल्याचे फडणवीस यांना लोकांना दाखवायचे आहे. त्यामुळे ते कायद्याची भाषा करीत नाहीत व कामराने शिंदेंची माफी मागावी अशी अलोकशाही भाषा ते करतात. देवेंद्र फडणवीस हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे मानायला तयार नाहीत असेच दिसते. कंगना राणावत या महिलेच्या बेताल वक्तव्यांना पाठिंबा देताना त्यांना हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवले, पण कुणाल कामरा प्रकरणात ते स्वातंत्र्य मानत नाहीत. कंगना राणावतने मुंबईची तुलना तेव्हा पाकिस्तानशी केली म्हणून लोक भडकले. पण फडणवीस कंगनाच्या समर्थनासाठी उतरले. हा दुटप्पीपणा आहे. नरेंद्र मोदी यांची एकाधिकारशाही, एकनाथ शिंदेंची झुंडशाही व फडणवीस यांची बनवाबनवी यांच्या ठिकऱया कुणाल कामराच्या दीड मिनिटाच्या व्यंगकाव्याने उडवल्या!
भाजप व त्यांच्या टोळ्यांचे ढोंग युद्धाच्या मैदानात टिकले नाही. कुणाल कामराने ते दीड मिनिटात संपवले. भाजपची झुंडशाही पोकळ पायावर उभी आहे हे कामराने दाखवले. पुन्हा कामरा गुडघे टेकायला तयार नाही. तो बलिदानासही तयार आहे.
अशा माणसाचे शिंदे-फडणवीस काय वाकडे करणार!
कामराने दीड मिनिटात हुकूमशाहीच्या खुर्चीखाली स्फोट केला… उखाड दिया!
Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]