रोखठोक – समोसे, जिलेबी आणि बांगड्या

उत्तर प्रदेशात कावड यात्रा निघते ती श्रावणात. हा श्रावण वेगळाच आहे. यात्रेच्या मार्गातील सर्व दुकानदारांनी मालक व नोकरांची नावे बाहेर लिहावीत हे फर्मान सुटले. हिंदू-मुसलमानांत नव्या फाळणीचे हे धोरण. लोकसभा पराभवानंतर गोंधळलेल्या भाजपची ही विकृती दिसते. मग समोसे, जिलेबी, बांगड्यांचे काय करावे, याचे उत्तर मिळेल काय?

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या अंतर्गत गोटातील युद्ध सुरू झाले ते अद्यापि थांबले नाही. आपणच कसे हिंदुत्वाचे चौकीदार याची चढाओढ आपापसातच सुरू आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी विरुद्ध अमित शहांचा गट यांच्यात सध्या युद्ध सुरू झाले आहे. भाजपचे हिंदुत्व म्हणजे फक्त हिंदू आणि मुसलमानांत दंगली घडविण्यापुरते मर्यादित आहे. हे जातीय झगड्याचे हिंदुत्व उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांनी हद्दपार केले. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील दारुण पराभव भाजपच्या जिव्हारी लागला. त्यामुळे हिंदुत्वाचे नवे प्रयोग ते करू लागले आहेत. कावड यात्रेच्या निमित्ताने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी एक नवे फर्मान जारी केले. त्यानुसार यात्रेच्या मार्गावर जे धाबे, हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या, फळांची-फुलांची दुकाने आहेत त्यांच्या मालकांनी स्वत: व काम करणाऱ्या नोकरांसह सर्व नावे बाहेर लावावीत, म्हणजे यात्रेकरूंचे पावित्र्य राखले जाईल. कावड यात्रेकरूंनी कोणत्या टपरीवर फलाहार करायचा, हे तो हिंदू की मुसलमान हे ठरवून केला जाईल. देशाला विभाजनाच्या दिशेने नेणारा हा निर्णय आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेत सांगायचे तर, “हे शेंडी-जानव्याचे, घंटा बडवणारे हिंदुत्व आहे.” लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर भाजप इतक्या खालच्या पातळीवर घसरून पडला आहे.

याचे काय करावे?

हिंदूंनी हिंदूंच्या दुकानात जावे व मुसलमानांनी मुसलमानांच्या दुकानात खानपान करावे, हा विचार एखाद्या सडक्या मेंदूतूनच येऊ शकतो. ही धार्मिक फाळणीची सुरुवात आहे. पंतप्रधान मोदी यांनी एकदा सांगितले आहे, “माझे बालपण मुस्लिम परिवारात गेले. मी त्यांच्यातच वाढलो आणि मोठा झालो. माझ्या शेजारी मुस्लिम कुटुंबे राहत होती. ‘ईद’च्या वेळी आम्ही घरात जेवण बनवत नसू. कारण शेजारच्या मुस्लिम परिवारातून आमच्याकडे जेवण येत असे.” त्याच मोदींच्या काळात दुकानांवर, हॉटेल्सवर जात-धर्मानुसार नावे लावण्याचे फर्मान सुटले. कावड यात्रेवरील रस्त्यावरील हॉटेल्समधील मुस्लिमांची नावे बाहेर लावतील, पण या देशाच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात मुसलमानांचे ‘नाव’ आहे, ते कसे पुसणार? कसे ते पहा.

उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे काचेचा मोठा उद्योग आहे. 90 टक्के काचेच्या बांगड्या येथेच बनतात. या फॅक्टरीचे अनेक मालक व कारागीर मुसलमान आहेत. बांगड्या हिंदू धर्मात सौभाग्याचे प्रतीक आहेत. कोटय़वधी हिंदू माता-भगिनी गर्वाने याच बांगड्या आपल्या हातात घालतात. अशा या बांगड्या हिंदू कारागिराने बनवल्या की मुसलमानाने, हे कसे समजणार? त्या बांगड्या आता घालायच्या की नाहीत?

लुंगी, गमछा, बनारसी साडी, चिकनचे कुर्ते, तांडा टेरिकॉटचे शर्ट हे कपडे लखनऊ ते पूर्वांचलपर्यंत बनतात. हे बनवणारे 90 टक्के ‘बुनकर’ मुसलमान आहेत. त्यामुळे करायचे काय?

मुंबईच्या ‘अरबी’ समुद्राचेही नाव आता बदलावे लागेल.

भारतात मोठ्या प्रमाणात गहू पिकवला जातो आणि खाल्ला जातो. ‘नेमप्लेट’ फर्मानामुळे गव्हावर संकट येऊ शकते. कारण गहू हे पीक भारतातले नाही. गव्हाचा शोध दहा हजार वर्षांपूर्वी तुर्की, जार्डन, सीरियाच्या सीमावर्ती प्रदेशात लागला व हे तीनही आज मुस्लिम देश आहेत. तेथून पुढे गहू भारतात आला, पण गव्हाचे कूळ हे मुसलमानी राष्ट्रांत आहे. त्यामुळे भाजपचे लोक गव्हावर बहिष्कार टाकतील?

पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना समोसे आवडतात, पण समोसे हा खाद्य प्रकार ‘हिंदू’ नाही. समोसा इराणची डिश आहे. पंधराव्या शतकात मुघल आक्रमकांच्या बरोबर अफगाणिस्तानमार्गे समोसा हिंदुस्थानात पोहोचला. 16 व्या शतकात पोर्तुगीजांनी आपल्याबरोबर भारतात बटाटे आणले. नंतर ते बटाटे समोशात भरले जाऊ लागले. गुजरात प्रांतात व उत्तरेत समोसे जास्त पचवले जातात. त्या समोशावरही आता नेमप्लेट लावायची काय?

जिलेबीवरही बहिष्कार टाकावा लागेल. जिलेबीचा शोधही इराणमध्ये लागला. इराणमध्ये ‘जुलुबिया’ म्हणून ती प्रसिद्ध आहे. पाचशे वर्षांपूर्वी तुर्की  आक्रमणकारी जिलेबीस आपल्याबरोबर भारतात घेऊन आले. जिलेबीचा खपही गुजरातेत जास्त आहे.

पेट्रोल, डिझेल भारतात अरब व मुस्लिम देशांतून येते. त्यामुळे यापुढे भाजपच्या हिंदुत्ववाद्यांना घरात कोळसे व लाकडे वापरून चुली पेटवाव्या लागतील.

वैष्णवदेवी, अमरनाथ, केदारनाथ यात्रेच्या दरम्यान हिंदूंना ‘दर्शन’ घडविणारे सर्व साथी मुसलमान आहेत. फूल, प्रसाद, फळांचे दुकानदार मुसलमान आहेत. अनेक वर्षे हे नाते टिकून आहे.

सक्रांत काळात ‘पतंग’ बनवणारे मुसलमान आहेत.

हिंदूंच्या लग्न सोहळ्यात लागणाऱ्या मेहंदीचे निर्माण व बनारसी साड्या बनविणारे कारागीर मुसलमान आहेत.

विकृत मनोवृत्ती

भाजपचे ‘नेमप्लेट’ छाप हिंदुत्व म्हणजे गोंधळलेल्या विकृत मनोवृत्तीचे प्रदर्शन आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला मुसलमान समाजाने मतदान केले नाही. त्यामुळे भाजपच्या हिंदुत्ववाद्यांचा राग समजू शकतो, पण कालच्या महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीत एम.आय.एम., समाजवादी पार्टीच्या मुस्लिम आमदारांची मते कोणत्या हिंदुत्ववादी पक्षाने आपल्या तागडीत ‘ठोक’ भावात तोलून घेतली, तेसुद्धा देवेंद्र फडणवीस वगैरे नव्या हिंदुहृदयसम्राटांनी स्पष्ट करावे. श्री. नारायण राणे यांच्या आमदार पुत्राने फडणवीस यांना ‘हिंदुहृदयसम्राट’ असे संबोधून वीर सावरकरांपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत सगळ्यांचाच अपमान केला. विदर्भातील हिंदूंनीच फडणवीस यांना नाकारले हे लक्षात घेतले पाहिजे.

न्यायालयाची स्थगिती

उत्तर प्रदेश, उत्तराखंडमधील ‘नेमप्लेट’ प्रकरणास आता सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, पण यानिमित्ताने भाजपच्या विकृत हिंदुत्वाचे मनसुबे उघडे पडले. देशात दंगली घडवून आगी लावायच्या व देशात पुन्हा एकदा फाळणीसदृश स्थिती निर्माण करायची ही मोदी व त्यांच्या परिवाराची योजना दिसते. देशात 18 कोटी मुसलमान आहेत हे खरे, पण मोदींनी बहुमत गमावले ते हिंदूंमुळेच. अनेक हिंदूबहुल भागात मोदीकृत ढोंगी हिंदुत्वाचा पराभव झाला. गेल्या काही दिवसांत राष्ट्रीय सुरक्षेबाबत ‘पोट’ विकणारे जे पकडले गेले, त्यांचा थेट संबंध भाजप किंवा संघाशी आहे. ते दुर्दैवाने हिंदू आहेत. देशद्रोहय़ांना धर्म नसतो हे समजून घेतले पाहिजे. स्वातंत्र्याच्या लढय़ात मुसलमानांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यानंतर ब्रिगेडियर उस्मानपासून अब्दुल हमीदपर्यंत व प्रत्येक युद्धात मुसलमान जवानांचे हौतात्म्य कामी आले. त्या शहीद मुसलमान जवानांच्या नेमप्लेटही जागोजागी लावा. कारगील युद्ध झाले तेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्या युद्धातही पाचशेहून जास्त मुसलमान जवान शहीद झाले. जम्मू-कश्मीरात आजही मुसलमान पोलिसांना अतिरेकी गोळ्या घालत आहेत. मोदी हे पाकव्याप्त कश्मीर भारतात आणून त्यावर अखंड हिंदुस्थानची नेमप्लेट लावणार होते, पण चीन लडाखमध्ये घुसले व मोठ्या भागावर चीनची नेमप्लेट लागली. मोदींचे अंधभक्त व इतर कावड यात्रेच्या मार्गावर हिंदू-मुसलमानांची ‘नावे’ लावत फिरत आहेत. देश प्राचीन युगात नेण्याचे ज्यांना मान्य आहे त्यांनी अशा हिंदुत्वाच्या घंटा वाजवत बसावे.

twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]