महाराष्ट्रात गायींना राजमान्यता मिळाली. त्यांना राज्यमातेचा दर्जा दिला. त्याच महाराष्ट्रात मेंदुज्वराने तडफडणाऱया मुलांना ‘लस’ मिळत नाही. आरोग्य खाते भ्रष्टाचाराने पोखरले आहे. आरोग्य खात्याला भ्रष्टाचाराने गिळले. त्यामुळे मुलांचे प्राण कोण वाचवणार?
दिनांक 2 ऑक्टोबर. सकाळी 11 वाजता मलबार हिलच्या ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर जे घडले ते चित्र महाराष्ट्राला काळिमा फासणारे आहे. तापाने (मेंदुज्वर) फणफणलेल्या मुलांना घेऊन असंख्य ‘माता’ सह्याद्री अतिथीगृहाबाहेर पोहोचल्या. त्या मुलांना सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर रस्त्यावर ठेवून ‘माता’ आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागल्या. ‘सह्याद्री’त देशाचे गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री शिंदे यांच्यात राजकीय बैठक सुरू होती व त्या मातांना मुख्यमंत्र्यांना भेटायचे होते. कारण तापाने फणफणलेल्या मुलांना ‘लस’ मिळत नाही. सरकार मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत हेळसांड करीत आहे. मुले तडफडत आहेत. त्यांचे प्राण वाचवा, असे सांगण्यासाठी ‘माता’ सह्याद्रीवर पोहोचल्या, पण त्यांना पायरीवरच रोखले गेले. “मोठे रस्ते बांधताय, पुतळे उभारताय, मेट्रो आणि बुलेट ट्रेन आणताय. विकासाच्या गप्पा मारताय, पण आमच्या मुलांच्या तापावर धड इलाज होत नाहीत. त्यांना लस मिळत नाही,” अशी वेदना ‘सहय़ाद्री’च्या बाहेर एका मातेने मांडली. ती वेदना अस्वस्थ करणारी आहे. निवडणूक कार्यात गुंतलेल्या देशाच्या गृहमंत्र्यांना या वेदनेची दखल घ्यावी असे वाटले नाही. मुलांपेक्षा त्यांना गायी महत्त्वाच्या वाटल्या. आता सरकारने गायींना राज्यमातांचा दर्जा दिला. गायी जगवण्यासाठी निधी मंजूर केला. लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपयांची मदत सुरू केली. आरोग्य खात्यापासून शिक्षणापर्यंतचा सर्व निधी लाडक्या बहिणी व गायींच्या संवर्धनासाठी वळवला. त्यामुळे महाराष्ट्राचे आरोग्य व्यवस्थेचे स्मशान झाले व तापाने फणफणलेल्या मुलांना घेऊन माता-भगिनी ‘सह्याद्री’च्या बाहेर उभ्या ठाकल्या.
भ्रष्टाचार कोठेही
‘सह्याद्री’बाहेर तापाने फणफणलेल्या मुलांकडे सरकारने लक्ष दिले नाही. कारण सरकार भ्रष्टाचारात व राजकारणात गुंतून पडले आहे. ‘सह्याद्री’बाहेर तापाने फणफणलेल्या मुलांचे आंदोलन हे महाराष्ट्रातील माणुसकीचे अधःपतन आणि दारिद्र्याचे दृश्य आहे. मुलांना औषध व लस मिळत नाही. काही मुलांचे मृत्यू त्यात झाले व हे लोक गायींना वाचविण्यासाठी पैसे खर्च करीत आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना ताबडतोब बडतर्फ करावे व सदोष मनुष्यवधाचा खटला भरावा असा कारभार राज्याच्या आरोग्य खात्यात सुरू आहे. आरोग्य खात्यात डॉक्टर, नर्सच्या बदल्या-बढत्या व नेमणुकांत भ्रष्टाचार आहे. सिव्हिल सर्जन, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नेमणुका करून घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात व ते पैसे वसूल करण्यासाठी लहान मुलांना तापाने फणफणून तडफडत मरावे लागते. आरोग्य खात्यातील ‘लुटी’चे नवेच प्रकरण आता समोर आले.
तानाजी युवा बहुउद्देशीय संस्थेचे विदर्भातील लोक मला भेटले. “सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री तानाजी सावंत यांनी 3190 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. आरोग्य खात्यातील या टेंडर महाघोटाळ्याचे प्रकरण गंभीर आहे, पण मुख्यमंत्री व गृहमंत्री हे दोघेही तानाजी सावंत यांना वाचवीत आहेत,” असे या लोकांनी सांगितले. हे प्रकरण काय आहे?
आरोग्य खात्यातील औषध खरेदी व इतर सामग्रीच्या खरेदीचे 3190 कोटी रुपयांचे टेंडर आरोग्यमंत्री सावंत यांनी स्वतःच भागीदार असलेल्या BSA Corporation Ltd. कंपनीला दिले. या कंपनीला आरोग्य सेवा पुरविण्याचा कोणताही अनुभव नाही. अटी व शर्तीत ही कंपनी बसत नाही. तरीही चार कंपन्या व संस्थांना डावलून आरोग्यमंत्र्यांनी स्वतःच भागीदार असलेल्या कंपनीस काम दिले. त्यामुळे आरोग्य खात्याची सर्व खरेदी आता आरोग्य मंत्र्यांचीच कंपनी करणार. मंत्र्यांच्या मर्जीतल्या BSA Corporation Ltd. कंपनीला कुठलाही अनुभव नाही. तरीही आरोग्य विभागाच्या रुग्णालयातील मशीन्स व यंत्रणेची निगा राखण्याचे काम या अनुभवशून्य कंपनीला दिले. हा भ्रष्टाचार आहेच, पण रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा अघोरी प्रकार आहे. आता यापुढची थक्क करणारी माहिती अशी की, जे टेंडर आता 3190 कोटी रुपयांचे होते ते टेंडर दोन वर्षांपूर्वी फक्त 70 कोटी रुपयांचे होते. ते कित्येक हजार पटीने वाढवले. मुळात आरोग्य विभागाकडे निधी शिल्लक नाही. तरीही 3190 कोटींचे टेंडर दहशतीने मंजूर केले जाते. ज्या कामास प्रशासकीय मान्यता नाही ते काम आरोग्य खात्याचे मंत्री स्वतःच्या फायद्यासाठी मिळवतात, ही बाब गंभीर आहे. या कंपनीचे मालक बाबासाहेब कदम आहेत व तानाजी सावंत यांचे ते भागीदार आहेत. कदम यांच्याशी आपले कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत हे सिद्ध करण्याची जबाबदारी आरोग्य मंत्र्यांची आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात रुग्णवाहिकेअभावी अनेकांचे मृत्यू झाले. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात रुग्णवाहिका नाहीत. पण रुग्णवाहिकांच्या नावावर गेल्या तीन वर्षांत कोट्यवधी रुपये आरोग्य खात्याने लुटले. मर्जीतील ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी चौपट दरवाढीने 12 हजार कोटींचे रुग्णवाहिका टेंडर ‘सुमित पासिलिटीज’ व स्पेनच्या एलएसजी या कंपन्यांना दिले. बी.डी.जी. कंपनीही त्यात आहे. पण या कंपन्यांनी आतापर्यंत एकाही रुग्णवाहिकेचा पुरवठा केला नाही. आतापर्यंत 40 कोटी रुपये या ठेकेदारांना मिळाले, पण रुग्णवाहिका आल्या नाहीत. या सर्व कंपन्या नक्की कोणाच्या व हा पैसा कोणाच्या खिशात जात आहे? आरोग्य खात्यातील या ठेकेदारीने अनेकांना प्राणास मुकावे लागले. कोरोना काळातील खिचडी, कोविड सेंटरचा तपास करणाऱयांना आरोग्य खात्यातील या घोटाळय़ाचा तपास करावा असे वाटत नाही?
अमानुष प्रकार!
70 कोटींचे टेंडर अचानक 3190 कोटींचे होते. राज्याच्या तिजोरीत पैसे नसताना हे घडते. राज्यातील 67 रुग्णालयांतील Mechanized Cleaning Service चे हे काम व त्यातला भ्रष्टाचार म्हणजे महाराष्ट्राच्या आरोग्य खात्यातला अमानुष प्रकार आहे. रुग्णवाहिकेच्या नावावर लुटमार सुरू आहे ती वेगळी! प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आणि मुख्यमंत्री लाडक्या बहिणी व गायींचे रक्षण करायला निघाले आहेत.
आदिवासी पाड्यांवरील दवाखाने बंद आहेत. तेथे डॉक्टर्स नाहीत. रुग्णवाहिका नाहीत. गर्भवतींना चादरीच्या झुल्यात बसून तालुक्याच्या ठिकाणी न्यावे लागते. त्यात बाळ आणि बाळंतिणीचा अनेकदा मृत्यू होतो. इस्पितळांची व्यवस्था भयानक आहे. स्वच्छता नाही. तेथे जेवणही निष्कृष्ट दर्जाचे. अनेक इस्पितळांत पोस्टमॉर्टेमची व्यवस्था नाही. लहान मुलांवर तापाचे उपचारही होत नाहीत. मुलांना घेऊन माता मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मलबार हिलवर पोहोचतात तेव्हा अमित शहांबरोबर राजकीय बैठकीत गुंतलेले मुख्यमंत्री त्या मातांना भेटत नाहीत. गायींना निधी, पण तापाने फणफणलेल्या मुलांना औषधे व लस नाही. कारण आरोग्य खात्याचे 3190 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या आरोग्य मंत्र्यांच्या कंपनीत गेले.
महाराष्ट्रात गरीबांची थट्टा सुरू आहे.
ती सध्या तरी थांबेल असे दिसत नाही.
twitter – @rautsanjay61
Gmail- [email protected]