रोखठोक – सिंधुदुर्गावर शिवरायांची विटंबना; मराठी मन पेटले का नाही?

सिंधुदुर्ग किल्ला भर समुद्रात चारशे वर्षे उभा आहे, पण गंजलेल्या खिळ्यांमुळे किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळाच कोसळला. महाराष्ट्रासाठी हे चित्र मन विषण्ण करणारे आहे. महाराष्ट्र हळहळला, पण शिवरायांच्या अपमानाविरुद्ध पेटून का उठला नाही?

‘सिंधुदुर्ग तो विजयदुर्ग तो ती अंजनवेल,

दर्यावर्दी मर्दुमकीची ग्वाही सांगेल.’

राम गणेश गडकऱ्यांनी आपल्या ‘महाराष्ट्र गीता’त दर्यावर्दी जीवनाची मर्दुमकी गाताना सिंधुदुर्गालाच शौर्याचे प्रतीक मानले. त्या सिंधुदुर्गाच्या ‘जंजिरे’ राजकोटवरील छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा अक्षरश: कोसळून पडला. छत्रपतींच्या पुतळ्याचे ते उद्ध्वस्त अवशेष पाहून महाराष्ट्राच्या हृदयाची शकले झाली. औरंगजेबाने महाराष्ट्रावर स्वारी करताना मंदिरे तोडली, देवांच्या मूर्ती तोडल्या व ते भग्न अवशेष पाहून महाराष्ट्र पेटून उभा राहिला. शिवरायांच्या पुतळ्याचे अवशेष पाहून महाराष्ट्र अस्वस्थ झाला, पण पेटून का उठला नाही? असा प्रश्न पडतो. पुतळ्यांच्या विटंबना होताना आपण सगळेच पाहतो, पण येथे प्रत्यक्ष शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना खुद्द महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून व्हावी यासारखे दुर्दैव ते कोणते! महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची लाट उसळली आहे. सर्वच कामांत पैसे खाल्ले जातात. भ्रष्टाचार करून पैसे खाण्यासाठी मुख्यमंत्री शेकडो कोटींचा निधी आपल्या माणसांना देतात. ‘लाडक्या ठेकेदारांना काम द्या व कमवा’ अशी नवी योजनाच मुख्यमंत्र्यांनी सुरू केली. त्या योजनेतून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजही सुटले नाहीत. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पुतळ्यास भ्रष्टाचाराने पोखरले व तो पुतळाच कोसळून पडला. सिंधुदुर्ग किल्ल्याने केलेला आाक्रोश महाराष्ट्राचे काळीज चिरत आहे.

विषय मोठा आहे!

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित नाही. येथेही सत्ताधाऱ्यांच्या लाडक्या माणसांनी पैसे खाल्ले. हा विषय गंभीर आहे. 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान मोदी यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पुतळ्याचे अनावरण केले. लोकसभेची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी श्रीमान मोदींकडून पुतळ्याचे अनावरण व्हावे यासाठी शिल्प व पुतळ्याभोवतीचे सुशोभीकरण घाईघाईने करून घेतले. शिवपुतळा परिसराच्या सुशोभीकरणावरच पाच कोटींहून जास्त खर्च केले. 15 फूट उंच चबुतरा व 28 फुटांचा पुतळा असे ते भव्य चित्र तेव्हा दिसले, पण सगळेच काम व उभारणी इतकी तकलादू होती की, लोकसभा निवडणुकीआधी उभारलेला पुतळा निवडणूक निकालानंतर लगेच कोसळला व सरकार म्हणते, जोरदार हवेने पुतळा पडला. प्रतापगडावर 1957 मध्ये उभारलेला शिवरायांचा पुतळा जोरदार समुद्री वारे, वादळे झेलत उभाच आहे. गिरगावच्या समुद्रावर 1933 मध्ये लोकमान्य टिळकांचा उभारलेला पुतळा समुद्राच्या लाटा झेलत उभा आहे, 1961 साली समुद्रातच गेटवे ऑफ इंडियावर उभारलेला शिवरायांचा पुतळा समुद्राचे तुफान व लाटा झेलत उभाच आहे, पण मोदी-फडणवीसांनी उभे केलेले  शिवरायांचे पुतळे पडले. यांना मुंबईच्या अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक उभे करायचे होते व त्याचे समुद्रातील पूजनही अशाच पद्धतीने गाजावाजा करीत मोदींच्या हस्ते केले. त्या अरबी समुद्रातील स्मारकाची अद्याप एकही वीट रचली गेलेली नाही व आता सिंधुदुर्गावरील महाराजांचा पुतळा कोसळून पडला. 400 वर्षांपूर्वी उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचा एकही चिरा इतक्या वर्षांनंतर ढासळलेला नाही, पण आता उभा केलेला शिवरायांचा पुतळा त्याच किल्ल्यावर कोसळला. भ्रष्टाचार, बेफिकिरी व राजकीय साठमारीचा फटका छत्रपतींना बसला. राजकोटावर घाईघाईने उभारलेला शिवरायांचा पुतळा हा राजकीय फायद्यासाठीच होता. त्यातील ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले व सिंधुदुर्गातील लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारात वापरले हे आता स्पष्ट झाले. याच पैशांतून कुडाळ, मालवण, कणकवलीत मते विकत घेण्यात भाजपचे पुढारी व मंत्री पुढे होते. त्या भ्रष्ट मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या सिंधुदुर्गाच्या पालकमंत्र्यांनी आधी राजीनामा द्यायला हवा. सिंधुदुर्ग किल्ल्यावर त्यांनी पुन्हा पाय ठेवू नये. त्यांच्या भ्रष्टाचाराचा फटका छत्रपतींनाच बसला.

असामान्य किल्ला

सिंधुदुर्ग किल्ला असामान्य आहे. मराठी अमदानीला सिंधुदुर्ग ही मिळालेली ठेव खुद्द श्री शिवछत्रपतींची. शिवाजी महाराजांनी तो बांधला इतकेच नव्हे, तर किल्ल्याच्या प्रत्येक बुरुजाची आखणी त्यांनी स्वत: केली. 25 नोव्हेंबर 1664 रोजी स्वहस्ते मुहूर्त करून त्यांनी किल्ल्याची पहिली ‘शिला’ बसवली. “घरात जैसा उंदीर तैसा आमच्या राज्यास सिद्दी” असे छत्रपती शिवराय नेहमी म्हणत. पश्चिम किनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी या धोरणी राजाने 13 जलदुर्ग बांधले. त्यापैकी सिंधुदुर्ग हा सर्वात अभेद्य. आपल्या आरमारासह मोहिमेवर असताना छत्रपतींनी मालवणजवळचा हा खडक पाहिला. “चौऱ्याऐंशी बंदरी ऐसी जागा नाही” असे शिवरायांनी म्हटले व आज्ञा केली की, या कुरटे बेटावर “बिलंद किल्ला बांधून बसवा.” शिवरायांच्या पदस्पर्शाने हा सारा परिसर पुनीत झाला. मराठी राज्याच्या छत्रपतींनी आपल्या हातापायाचे ठसेही या किल्ल्यावर उमटविले, अशी लोकांची श्रद्धा आहे. एका बुरुजाजवळच्या दोन घुमटांत शिवाजीराजांच्या हाताचा व पायाचा एकेक ठसा अजूनही दाखवला जातो. चुन्यात उमटविलेले हे ठसे म्हणजे महाराष्ट्राच्या श्रद्धा आहेत. समुद्राच्या लाटा छत्रपतींचे चरण रोज धूत असतात व त्या चरणांवर महाराष्ट्र डोके ठेवतो हे दृष्यच विलोभनीय वाटते.

गंजलेले खिळे!

सिंधुदुर्ग किल्ला 400 वर्षे उभा आहे, पण गंजलेल्या खिळ्यांमुळे किल्ल्यावरील छत्रपतींचा पुतळा उन्मळून पडला. हा संकेत चांगला नाही. राज्यात भ्रष्टाचार, राजकीय व्यभिचार किती बोकाळला आहे त्याचा हा नमुना. महाराष्ट्र चारही बाजूने लुटला जातोय. स्वराज्य रक्षणासाठी महाराजांनी सुरतवर स्वारी केली व सुरत लुटले. महाराष्ट्राचे ‘सुरत’प्रेमी राज्यकर्ते छत्रपती शिवरायांच्या नावानेच लूट करीत आहेत. त्याच लुटीतून बांधण्यात आलेल्या सिंधुदुर्गातील राजकोटावरील  ज्या चौथऱ्यावर महाराज उभे होते, तो चौथराच डळमळला आणि महाराष्ट्राचे वैभव, मानसन्मान, शौर्यच जणू कोसळले.

ही काय वेळ आली महाराष्ट्रावर?

शिवरायांची इतकी घोर विटंबना होऊनही महाराष्ट्र थंडपणे पाहत बसला. मराठी मन पेटले का नाही? असे आता म्हणावेसे वाटते. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील या घटनेनंतर भाजपचे वर्तन हे महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे नव्हते. सिंधुदुर्गातील भाजपच्या गुंडांनी भ्रष्ट ठेकेदारीचे समर्थन केले व विरोधकांना किल्ल्यावर जाण्यापासून रोखले. पत्रकारांना धमक्या दिल्या. महाराजांच्या पवित्र वास्तूसमोर शिवराळ भाषा वापरली व या सर्व कृत्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी समर्थन केले. महाराष्ट्राने हे सर्व उघडपणे पाहिले. अशा विकृत राज्यकर्त्यांना जोडे मारून हाकलायला हवे. या दुर्घटनेच्या निषेधार्थ सरकार विरोधातील महाविकास आघाडीचे ते ‘जोडे मारो’ आंदोलन पार पडले, पण तरीही एक खंत आहेच, शिवरायांच्या अपमानानंतर महाराष्ट्र उसळला का नाही?

twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]