2024 च्या निवडणुकीत भारताच्या निवडणूक आयोगाचे वर्तन सरळ पक्षपाती होते. भाजपची घोडदौड 110 ते 120 वरच थांबणार होती. आयोगाच्या पक्षपातामुळे 240 चा आकडा गाठता आला. धनुष्यबाण, घड्याळ ही चिन्हे गोठवायलाच हवी होती, पण फुटिरांना ही चिन्हे देण्याचे काम आयोगाने केले. मशाल, तुतारी वाजवणाऱ्या माणसालाही आव्हान उभे करण्याचा प्रयत्न झाला. कुंपणानेच शेत खाल्ले असेच हे घडले.
पैसा, गुन्हेगारी आणि घोटाळे या तीन भयानक चक्रातून भारतीय निवडणुका बाहेर याव्यात, असे प्रत्येकाला वाटत असते. ते यावेळीही घडू शकले नाही, असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते.
नरेंद्र मोदी यांचा भाजप अल्प मतात आला व दोन कुबड्यांच्या मदतीने मोदी पंतप्रधान झाले. मुंबईसह देशात किमान 60 ते 70 ठिकाणी अनेक प्रकारचे तांत्रिक घोटाळे करून भाजपने विजय मिळवले. तसे झाले नसते तर भाजप 110 ते 120 पर्यंतच थांबला असता व मोदी पंतप्रधान झाले नसते. या सगळ्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे. मुंबईतील (उत्तर पश्चिम) मतदारसंघात शिवसेनेचे अमोल कीर्तिकर हे विजयी झाले. मात्र शेवटच्या दोन फेऱ्यांत साधारण सातशे मतांवर दरोडा टाकला व पोस्टल मतांच्या फेरमोजणीचे नाटक करून फक्त 48 मतांनी शिंदे गटाचे वायकर यांना विजयी घोषित करण्याचा पराक्रम या क्षेत्रातील निवडणूक अधिकाऱ्यांनी केला. संपूर्ण देशात हे प्रकरण गाजते आहे व देशाचा निवडणूक आयोग तोंडावर बोट ठेवून नेहमीप्रमाणे मौन बाळगून बसला आहे. देशभरातील निकाल पाहता 500 ते 1000 मतांच्या फरकाने भाजपने 130 च्या आसपास जागा जिंकल्या. या विजयावर संशय आहे. कमी फरकाने जिंकलेल्या जागांवर मतमोजणीच्या शेवटच्या फेऱ्यांत घोटाळे झाले व अशा जागांवर अमित शहांचे विशेष लक्ष होते. ज्या जागा काठावर आहेत त्या अशा पद्धतीने खेचून आणायच्या योजना जणू आधीच ठरल्या होत्या. (500-1000 चे मताधिक्य लोकसभेत नगण्य आहे. म्हणजे भाजप केवळ 110 जागांवरच जिंकला आहे.)
आयोगाचे चमत्कार
निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात केलेले चमत्कार पाहण्यासारखे आहेत. शिंदे गटास बेकायदेशीरपणे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने दिले. अनेक मतदारसंघांत मोठ्या संख्येने ’धनुष्यबाणा’ला मतदान झाले. त्यांना उद्धव ठाकरे यांना मतदान करायचे होते, पण सवयीनुसार त्यांनी धनुष्यबाणाला केले हे आता समोर आले. हा सर्व घोळ भारताच्या विद्वान निवडणूक आयोगाने मुद्दाम घातला. कारण तो निष्पक्ष राहिलेला नाही. या निवडणुकीत अनेक ठिकाणी असेही घडवून आणले गेले की, ’मशाल’ चिन्हाच्या खाली असे उमेदवार ठेवले की ज्यांचे चिन्ह मशालीसारखे आहे. उदा. टॉर्च, उसाच्या तीन कांड्या. जेणेकरून ग्रामीण मतदारांत चिन्हाबाबत गोंधळ होईल. मतदारांत गोंधळ उडवून मतदान घडवायचे. मतदारास ज्याला मत द्यायचे आहे त्याला ते देऊ द्यायचे नाही. गोंधळ उडवून दुसऱ्याच निशाणीवर शिक्का मारण्याची मानसिकता निर्माण केली जात असेल तर येथे निवडणूक आयोगाने जबाबदारीने वागायला हवे. उद्धव ठाकरे यांच्याबाबत आयोगाने पक्षपात केला. धनुष्यबाण चिन्ह गोठवून निवडणुका घेणे हा पर्याय होता. मात्र आयोगाने जणू ठरवूनच उद्धव ठाकरेंकडून धनुष्यबाण काढून घेतला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले. या तुतारीस मतदान करताना गोंधळ व्हावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघांत अपक्ष म्हणून उमेदवार उभे करून त्यांना पिपाणी-ट्रम्पेट वाद्य ही चिन्हे पद्धतशीर मिळवून दिली. पिपाणी-ट्रम्पेटचा उल्लेख ’तुतारी’ असा निवडणूक आयोगाने केला व या सर्व मतदारसंघांत ’तुतारी’ला होणारे मतदान गोंधळामुळे पिपाणी व ट्रम्पेटला झाले. माढा, बीड, दिंडोरी, सातारा, बारामती अशा मतदारसंघांत हे घडले. सातारा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांचा विजय पक्का होता, पण ते 32 हजारांच्या फरकाने हरले. शिंदे यांची मते कमी व्हावीत म्हणून त्यांच्या विरोधकांनी ’पिपाणी’ चिन्हावर एकाला उभे केले व त्या उमेदवाराने साधारण 37 हजार मते घेतली. ही सर्व मते ’तुतारी’चीच असावीत. दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार भास्करराव भगरे हे एक सामान्य शिक्षक. भगरे गुरुजी म्हणून जे या भागात प्रसिद्ध. मतपत्रिकेत त्यांच्या नावापुढे भास्कर भगरे ’गुरुजी’ असावे अशी केलेली विनंती भारताच्या निवडणूक आयोगाने फेटाळून लावली. त्याच वेळी याच मतदारसंघातील मतपत्रिकेवर बाबू भगरे ’सर’ असे नाव झळकले. त्यांचे शिक्षण तिसरी इयत्ता. त्यांच्या नावापुढे ’सर’ लावण्यास निवडणूक आयोगाने मान्यता दिली व खऱ्या शिक्षकास ’गुरुजी’ लावण्याचा अधिकार नाकारला. या नकली गुरुजींना ’पिपाणी’ चिन्ह बहाल केले व त्याच पिपाणीचे तुतारी व हेच भगरे गुरुजी म्हणून प्रचार यंत्रणा राबवून या बाबू भगरे यांनी 1,03,632 (लाखांवर मते) मिळवली. हे बाबू भगरे कोण हे कोणास माहीत नाही. एका गटाने त्यांचा उमेदवारी अर्ज भरून घेतला व या भगरे सरांना थेट गोव्याच्या पंचतारांकित हॉटेलात नेऊन ठेवले. अशिक्षित बाबू भगरे ’सर’ यांना लाखावर मते मिळाली ती खऱ्या तुतारीची. मतदारांचा असा गोंधळ उडवून व चकवा देऊन मतदान केले जाते व त्यात निवडणूक आयोग सहभागी होतो. निवडणूक आयोगाची तटस्थता व निष्पक्षपणा संपल्याचा हा पुरावा आहे. मतदारांनी जेथे मतदान करायचे तेथेच ते होणे गरजेचे आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असे आपले आपण सांगायचे व प्रत्यक्ष मतदारांचा गोंधळ उडवून मते मिळवायची, ही लोकशाही पोकळ आहे.
कीर्तिकर पॅटर्न
अमोल कीर्तिकर यांचे प्रकरण हे निवडणूक यंत्रणेचा आदर्श घोटाळा आहे. कमी फरकाने भाजपने जिंकलेल्या जागांचा ’पॅटर्न’ कीर्तिकरांप्रमाणेच असावा हे आता स्पष्ट झाले. हरलेल्या जागा शेवटच्या फेरीनंतर ’पोस्टल बॅलट’चा घोटाळा करून जिंकता येतात. त्यासाठी निवडणूक यंत्रणा हाताशी हवी हे भाजप व महाराष्ट्रातील शिंदे गटाने दाखवून दिले. बनावट नावे, बनावट चिन्हे यावर मते मिळविण्यात आली व हे सर्व भारताचा निवडणूक आयोग उघड्या डोळय़ाने पाहात राहिला. भारतातील लोकशाहीचे सुवर्ण युग संपले असे म्हणायचे काय? मतदारांनी मोदी व शहांना बहुमत मिळू दिले नाही. निवडणूक आयोगाने पडद्यामागून सूत्रे हलवली नसती तर भाजपच्या आणखी किमान 100 जागा कमी झाल्या असत्या व जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा विजय झाला असता. भारताच्या निवडणूक आयोगाने ते घडू दिले नाही असे एकंदरीत दिसते. निवडणूक आयोगाने संविधानाने नेमून दिलेले कर्तव्य पालन केले नाही. तसे भारतीय संविधानाच्या रखवालीची जबाबदारी असणाऱ्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकशाहीतील सर्व संकेतांचा भंग केला. मोदी हे सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले तेव्हा राष्ट्रपती मुर्मू या आनंदित झाल्या व दही-साखरेची वाटी घेऊन पुढे आल्या. त्यांनी मोदी यांना ’दही-साखरे’चा घास भरवला. हे चित्र लोकशाही संविधान मानणाऱ्यांना विचलित करणारे आहे. मोदींनी दही-साखर गपकन गिळली. जणू लोकशाहीच गपकन गिळावी तशी!
भारतीय संविधान व लोकशाहीचे रखवालदारच घोटाळे करीत आहेत. कुंपणच शेत खात आहे. नव्हे कालच्या निवडणुकीत कुंपणाने शेत गिळले!
Twitter : @rautsanjay61
Gmail : [email protected]