IND vs NZ Test – कॅप्टन आणि बॅटर म्हणून अपयशी ठरलो! रोहित शर्माने घेतली लाजिरवाण्या पराभवाची जबाबदारी

 

न्यूझीलंड विरुद्ध व्हाईट वॉश पत्करावा लागल्यानंतर हिंदुस्थानी संघावर प्रचंड टीका होत आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये हिंदुस्थानने तीन सामन्यांच्या मालिकेत पहिल्यांदाच वाईटवॉश स्वीकारला. तर 2000 नंतर पहिल्यांदाच हिंदुस्थानच्या संघाला मायदेशातील मालिकेत एकही कसोटी सामना जिंकता आला नाही. फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही स्तरावरील हिंदुस्थानच्या खेळाडूंची कामगिरी सुमार राहिली. कर्णधार आणि बॅटर म्हणून रोहित शर्मा या मालिकेत अपयशी ठरला. न्यूझीलंड विरुद्ध झालेला हा पराभव हिंदुस्थानी संघाच्या चांगलाच जीवारी लागला असून रोहित शर्मा याने या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.

सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित शर्मा यांने पराभवाची जबाबदारी स्वीकारली. कर्णधार आणि बॅटर म्हणूनही मी अपयशी ठरलो. माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील हा कठीण काळ असल्याचे रोहित शर्मा म्हणाला.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माची बॅट शांतच राहिली. रोहित शर्माला एकही मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा लवकर बाद होत असल्याने हिंदुस्थानला चांगली सुरुवातही मिळाली नाही. याचा फटका प्रत्येक सामन्यात टीम इंडियाला बसला. रोहित शर्मा करा फटके खेळून बाद झाला. याबाबत त्याला विचारले असता त्याने आज आपला नैसर्गिक खेळ असल्याचे म्हटले.

सुरुवातीपासूनच माझा खेळ असा असून या बळावरच मी चांगली कामगिरी केली आहे. मात्र या मालिकेत काही खराब फटके खेळून मी बाद झालो हे नक्की. माझ्या तंत्रामध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. मात्र काही चुकत असल्यास त्यात बदल करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन असे रोहित शर्मा म्हणाला.

दरम्यान, वानखेडेवर झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी लढतीतही टीम इंडियाचे खेळाडू फिरकी चक्रात अडकले आणि रोहित सेनेला 25 धावांनी पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 147 धावांचे आव्हान हिंदुस्थानचा संघ पेलू शकला नाही. हिंदुस्थानचा संघ 121 धावांमध्ये बाद झाला. जवळपास अडीच दिवसांचा खेळ बाकी असताना हा कसोटी सामना संपला आणि तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने हिंदुस्थानला वाईट वॉश दिला.

माफक आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानला तिसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला. या मालिकेत लौकिकास साजेशी कामगिरी करू न शकलेला रोहित शर्मा 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली, सर्फराज खान, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल अशी रांग लागल्याने हिंदुस्थानचा डाव पाच बाद 29 असा संकटात सापडला. यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांनी अर्धशतकीय भागीदारी करत हिंदुस्थानच्या विजयाच्या अशा पल्लवीत केल्या. यादरम्यान ऋषभ पंतने अर्धशतक ठोकले.

दुसऱ्या बाजूने रवींद्र जडेजा बास झाला आणि त्या पाठोपाठ पण तरी माघारी परतला. त्यामुळे हिंदुस्थानचा पराभव दृष्टीपथात दिसू लागला. वॉशिंग्टन सुंदर ने एक बाजू लावून धरल्याने आणि काही काळ आर अश्विनने त्याला साथ दिल्याने हिंदुस्तान सामना जिंकेल असे वाटत होते. मात्र एक खराब फटका खेळून अश्विन बाद झाला आणि त्या पाठोपाठ आकाशदीप घरी परतला. त्यानंतर एजाज पटेलने सुंदरचा त्रिफळा उडवत न्यूझीलंडला सामना जिंकून दिला.

पहिल्या डावात पाच विकेट घेणाऱ्या एजाज पटेल यांने दुसऱ्या डावातही विकेटचा षटकार ठोकला. तर ग्लेन फिलिप्स याने तीन तर मॅट हेन्द्रीयाने एक विकेट त्याला उत्तम साथ दिली. दोन्ही डावात मिळून 11 विकेट घेणाऱ्या एजाज पटेल याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर विल यंग याला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.