आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून मी निवृत्ती घेतली असली. आणखी काही काळ एकदिवसीय अन् कसोटी क्रिकेटमध्ये खेळत राहीन असे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले.
रविवारी एका कार्यक्रमात त्याने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळण्याची आपली योजना उघड केली आहे. ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओद्वारे खेळाडूंचे अभिनंदन करताना रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला होता. रोहित शर्मा टी-20 वर्ल्ड कपपासून विश्रांतीवर आहे. या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेत होणाऱ्या वनडे मालिकेतूनही तो विश्रांती घेण्याची शक्यता आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी आता एकदिवसीय स्वरूपात खेळवली जाणार आहे. ही स्पर्धा आगामी वर्षी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पाकिस्तानमध्ये होणार आहे. याचबरोबर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे. यामध्ये, जून 2023 ते जून 2025 दरम्यान आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये अक्वल दोन स्थानी राहिलेले संघ अंतिम फेरीत आमनेसामने येतील. या स्पर्धेत सध्या टीम इंडिया 68.51 गुणांसह अक्वल, तर ऑस्ट्रेलिया 62.50 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. त्यामुळे टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झालेला रोहित शर्मा आणखी किती काळ एकदिवसीय व कसोटी क्रिकेट खेळणार हे त्याच्या फिटनेस व फॉर्मवर अवलंबून असेल.