हिंदुस्थानातील क्रिकेटप्रेमींसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आनंदाची बातमी दिली आहे. वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणाऱया आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. गेले 14 महिने रोहित आणि विराट आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटपासून दूर होते. मात्र लवकरच ते स्वतःला सज्ज करण्यासाठी टी-20 क्रिकेट सामने खेळताना दिसतील. तसेच अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱया आगामी टी-20 मालिकेत खेळण्यासही उत्सुक असल्याचे समोर आले आहे. मात्र ते या स्पर्धेत दिसणार की नाही याबाबत अनिश्चितता असली तरी टी-20 वर्ल्ड कपमध्ये मात्र हे दोघे दिसणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे.
हिंदुस्थानचे कसोटीपाठोपाठ वन डेचे जगज्जेतेपद हुकल्यानंतर रोहित आणि विराटने त्याची भरपाई करण्यासाठी आपल्या कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात या दोघांनी टी-20 वर्ल्ड कप खेळून हिंदुस्थानचे जगज्जेतेपदाचे स्वप्न पूर्ण करावे, अशी समस्त क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. त्यामुळे वन डे वर्ल्ड कप संपताच त्यांनी टी-20 वर्ल्ड कपसाठी स्वताला फिट करावे आणि आपण वर्ल्ड कपमध्ये खेळणार असल्याचे जाहीर करावे, अशी मागणी कोटय़वधी हिंदुस्थानींनी गेल्या दीड महिन्यात व्यक्त केली आहे.
वन डे वर्ल्ड कपदरम्यान रोहित आणि विराटचा फॉर्म अफलातून होता. त्यांचा फिटनेसही लाजवाब आहे. या दोघांची झंझावाती फलंदाजी हिंदुस्थानचे जगज्जेतेपदाचे स्वप्न पूर्ण करू शकते, असा विश्वासही सर्वांना आहे. दोघांनी टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी स्वतःला फिट करावे आणि आपण खेळत असल्याचे बीसीसीआयला अधिकृतपणे कळवावे असा सल्लाही सूत्रांनी दिला होता. वन डे वर्ल्ड कपमध्ये रोहितचे नेतृत्व आणि कोहलीची सातत्यपूर्ण जबाबदारीने केलेल्या फलंदाजीचे साऱयांनीच कौतुक केले होते. तसेच दोघांनी टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळावे, अशी इच्छा खुद्द बीसीसीआयचीच असल्याचेही समोर आले होते.
येत्या 11 जानेवारीपासून अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी उत्सुक असलेल्या कोहली-शर्मामुळे बीसीसीआयला अंतिम 15 जणांची यादी करताना फार डोकेफोड करावी लागणार आहे. या मालिकेसाठी खूप कमी दिवस उरले आहेत. तसेच 25 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू होत असल्यामुळे टी-20 मालिकेत दोघांची निवड केली जाणार की नाही, याबाबत कोणतीही गोष्ट समोर आलेली नाही. मात्र आयपीएलदरम्यान किमान 30 खेळाडूंवर बीसीसीआयच्या निवड समितीची निवड असेल. टी-20 वर्ल्ड कपसाठी निवडला जाणारा संघही आयपीएलच्या कामगिरीवरच निवडला जाणार असल्याचे बीसीसीआयच्याच सूत्रांकडून कळले आहे.