एकदा निवृत्ती पत्करली म्हणजे पत्करली. माझा निर्णय अंतिम आहे. टी-20 क्रिकेटमध्ये परत येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी योग्य वेळी निवृत्ती जाहीर केली असल्याचे सांगत सध्या निवृत्तीचा निर्णय हास्यास्पद बनवल्याचे मत हिंदुस्थानी कर्णधार रोहित शर्माने मांडले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक देशांचे खेळाडू आधी निवृत्ती जाहीर करतात आणि मग पुन्हा ती मागेही घेतात. हल्ली हे वारंवार होतेय. मात्र हिंदुस्थानात असे घडलेले नाही. आधी निवृत्तीचा निर्णय, मग यू टर्न. त्यामुळे एखादा खेळाडू निवृत्त झाला की नाही हेच कळत नाही. पण मी माझा निर्णय योग्य वेळेला जाहीर केला आहे. त्यामुळे माझी पुन्हा आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये परतण्याची कोणतीही इच्छा नसल्याचे रोहितने स्पष्ट केले.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने आपली आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेतली होती. बेन स्टोक्ससुद्धा वन डे आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झाला होता आणि त्याने गेल्या वर्षी वन डे वर्ल्ड कप खेळण्यासाठी निवृत्ती मागे घेतली होती.