
कसोटी, एकदिवसीय असो किंवा टी-20 क्रिकेट देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी सर्वोच्च आणि सर्वात महत्त्वाचे होते. कसोटी, टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेट हे तिन्ही फॉरमॅट माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि सारखेच असल्याचे मत व्यक्त करत कसोटी क्रिकेटपासून मन अजून भरले नसल्याचे संकेतही हिंदुस्थानचा कर्णधार रोहित शर्माने दिले.
इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी रोहितने एका मुलाखतीदरम्यान हे विधान केले. इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत हिंदुस्थानचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे संघाचा अत्यंत महत्त्वाचे भाग असतील. इंग्लंड दौऱयासाठी बुमराह, शमी आणि इतर गोलंदाज 100 टक्के तंदुरुस्त असायला हवेत. जर आमचा संघ पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर इंग्लंडमध्ये आमची मालिका नक्कीच चांगली होईल. इंग्लंडमध्ये आमच्यासाठी हे एक चांगले आव्हान असेल.
बुमराह 2024-25 च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पाचव्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व करताना जखमी झाला होता. दुसरीकडे, शमीने त्याचा शेवटचा कसोटी सामना 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झालेल्या दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत असताना शमी हिंदुस्थानच्या शेवटच्या ऑस्ट्रेलिया दौऱयाला मुकला. आयपीएल 2025 नंतर टीम इंडिया 20 जूनपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. आगामी कसोटी मालिका ही आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी हिंदुस्थानसाठी पहिलीच मालिका असेल.